Gokul Meeting Dispute : गोकुळ दूध महासंघाच्या सभेत गोंधळ, महाडिक गटाचा राडा

Gokul Meeting Dispute : गोकुळ दूध महासंघाच्या सभेत गोंधळ, महाडिक गटाचा राडा
Gokul Dudh Sangh : आज (शुक्रवार, १५ सप्टेंबर) गोकुळ दूध महासंघाची ६१ वी सर्वसाधारण वार्षिक सभा होत आहे.या सभेदरम्यान महाडिक गटाच्या सभासदांनी गोंधळ घातला. यावेळी शौमिका महाडिक यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे.
कोल्हापूर Gokul Meeting Dispute : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) ६१ व्या सर्वसाधारण सभेत गोंधळ पाहायला मिळाला. महाडिक गटाच्या सभासदांनी सभेपूर्वीच बॅरिकेड्स तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला.
काय घडलं : कोल्हापूरच्या गोकुळ शिरगावमधील पंचतारांकित वसाहतीच्या मैदानात आज गोकुळ दूध महासंघाची ६१ वी सर्वसाधारण वार्षिक सभा होत आहे. दुपारी एक वाजता सभा सुरू होणार होती. मात्र सभेपूर्वीच महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यांनी सुरक्षेसाठी लावण्यात आलेले बॅरिकेड्स तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकचं गोंधळ उडाला.
शौमिका महाडिक यांचा गंभीर आरोप : या दरम्यान शौमिका महाडिक यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केला. 'सभेत बसलेले निम्म्याहून अधिक सभासद बोगस आहेत. हे सभासद झेरॉक्स कॉपी घेऊन आले आहेत. इथेच झेरॉक्स वाटण्यात आल्याचं मला सांगण्यात आलंय. बाहेर जे खरे सभासद थांबलेले आहेत, ते अजूनही आत गेलेले नाहीत. बाहेर २ किलोमीटर दूरपर्यंत सभासदांची रांग लागलेली आहे. एका तासापासून ते थांबलेले आहेत. असं यापूर्वी कधीही घडलं नव्हतं', असा आरोप शौमिका महाडिक यांनी केला.
सतेज पाटील यांचं प्रत्युत्तर : शौमिका महाडिक यांच्या या आरोपाला सत्ताधारी सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. यावेळी बोलताना सतेज पाटील यांनी महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांचा गुंड असा उल्लेख केला. महाडिक गटाचे गुंड येथं येऊन दंगा करत आहेत. हे कोल्हापूरच्या आणि सहकाराच्या दृष्टीनं शोभनीय नाही. त्यांचे जे काही प्रश्न आहेत, त्याची उत्तरं संचालक मंडळ देईल. सभा कितीही वेळ लागला, तरी आमची सभा चालवण्याची तयारी असल्याचं सतेज पाटील म्हणाले.
सभेत दरवर्षीच होतो गोंधळ : गोकुळ महासंघाच्या सर्वसाधारपण सभेत दरवर्षी गोंधळ होण्याचा इतिहास आहे. गेल्या वर्षी २२ ऑगस्टला गोकुळची वार्षिक सभा झाली होती. त्या सभेतही अशाच प्रकारचा राडा पाहायला मिळाला होता. या सभेआधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली होती. या दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर शौमिका महाडिक आणि इतर विरोधी सभासदांनी सभात्याग केला.
हेही वाचा :
- Notice to Gokul Chairman : 'या' कारणामुळं गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांना नोटीस; विभागीय उपनिबंधकांनी मागवलाय खुलासा
- गोकुळच्या चेअरमनपदी अरुण डोंगळे यांची दुसऱ्यांदा निवड, 10 वर्षानंतर पुन्हा झाले संचालक
- Kolhapur Milk Producers Association: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळमध्ये अध्यक्ष बदलाच्या हालचाली; लेखापरीक्षणाचे उमटले पडसाद
