ETV Bharat / state

बदनापूर : अप्पर दुधना प्रकल्पात 6 फूट पाणी

author img

By

Published : Jul 29, 2020, 8:26 PM IST

अप्पर दुधना प्रकल्पात 6 फूट पाणी
अप्पर दुधना प्रकल्पात 6 फूट पाणी

तालुक्यासाठी जीवनदायिनी असलेले सोमठाणा येथील अप्पर दुधना प्रकल्पात जुलै अखेरपर्यंत जवळपास ६ फूट पाणी आल्यामुळे यंदा हा प्रकल्प भरण्याची आशा निर्माण झाली आहे. पाटबंधारे विभागाने आतापासून पाटांची दुरुस्ती केली तर, अनेक कोरडवाहू शेतकऱ्यांना या पाण्याचा उपयोग होऊ शकतो.

बदनापूर (जालना) - तालुक्यासाठी जीवनदायिनी असलेले सोमठाणा येथील अप्पर दुधना प्रकल्पात जुलै अखेरपर्यंत जवळपास ६ फूट पाणी आल्यामुळे यंदा हा प्रकल्प भरण्याची आशा निर्माण झाली आहे. यंदा मोठया प्रतीक्षेनंतर पाटाला पाणी येण्याची आशा परिसरातील शेतकऱ्यांना आहे. धरणक्षेत्र परिसर व पाटांमध्ये काटेरी झाडांची वाढ आणि इतर मोडतोड झाली आहे. पाटबंधारे विभागाने आतापासून पाटांची दुरुस्ती केली तर, अनेक कोरडवाहू शेतकऱ्यांना या पाण्याचा उपयोग होऊ शकतो.

बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथे दुधना नदीवर अप्पर दुधना प्रकल्प आहे. या प्रकल्पावरच बदनापूर तालुक्यातील शेती अवलंबून असते. हा प्रकल्प ३१ जानेवारी १९६५ ला पूर्णत्वास गेला. या प्रकल्पामुळे बदनापूर तालुक्यातील सिंचनाचा मोठा प्रश्न निकाली निघाला होता. मात्र त्यानंतर कमी होत गेलेल्या पर्जन्यमानामुळे हा प्रकल्प अपदावानाचे भरत होता. हा प्रकल्प पूर्णपणे भरल्यास बदनापूर तालुक्यातील मोठया प्रमाणात पिण्याचा पाण्याबरोबरच सिंचनाचा प्रश्न सुटतो. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यास या कालव्याद्वारे जवळपास 15 किलोमीटर असलेल्या अंबडगावपर्यंत पाणी जात असल्यामुळे मोठया प्रमाणात शेतीच्या सिंचनाचाही प्रश्न निकाली निघतो. मागील कित्येक वर्षापासून हा प्रकल्प भरलेलाच नाही. मागील पाच ते सात वर्षापासून या प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा रहात आलेला आहे. यंदा मात्र तालुक्यात मृग नक्षत्रापासून पावसाने बरसात सुरू केली आहे.

तालुक्यातील काही मंडळात अतिवृष्टी होऊन कित्येक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून निघाल्या आहेत. या शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे आहे. मात्र, बदनापूरसाठी महत्त्वाचा असलेल्या निम्न दुधना प्रकल्पातही मोठया प्रमाणात पाण्याची आवक सुरू झालेली आहे, ही बाब सुखद आहे. मागील दहा ते बारा वर्षानंतर पहिल्यांदा या प्रकल्पात जुलै अखेरपर्यंत जवळपास ६ फूट पाणी साठा साचला आहे. या प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता 15 फूट असून अशीच आवक राहिल्यास हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरणार आहे. सोमठाणा धरणात पाणी साठा नसल्यामुळे मागील एक ते दोन वर्षात विविध सामाजिक संघटना व महसूल प्रशासनाने जवळपास 5 हजार ब्रास गाळ या धरणातून काढला आहे. यामुळे यंदा पाणी साठ्यातही वाढच होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यास रब्बी हंगामातील गहू व ज्वारीसाठी या धरणातून पाटाद्वारे पाणी सोडण्यात येते. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना रब्बीतील गहू, हरभरा व ज्वारी पिके घेता येतात. तसेच पाटाने पाणी आल्यामुळे विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होऊन सिंचनाचा प्रश्न निकाली निघतो.असे असले तरी पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षित भूमिकेमुळे आणि मागील पाच ते सात वर्षांपासून प्रकल्पात पाणीच नसल्यामुळे या पाटांची (कालवा) अवस्था खराब आहे. या पाणलोट क्षेत्रात व पाटांमध्ये मोठमोठी काटेरी झाडे उगवली असून काही ठिकाणी पाटांचे नुकसानही झालेले दिसून येत आहे. पाटबंधारे विभागाने तत्काळ या पाटाची दुरुस्ती केली तर, येणाऱ्या रब्बी हंगामासाठी कोरडवाहू शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाची सोय होणार असल्यामुळे या विभागाने ही दुरुस्ती करून घेण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

दरम्यान बुधवारपर्यंत (दि. २९ जुलै)या प्रकल्पाबरोबरच बदनापूर तालुक्यातील वाल्हाच्या तलावात ४० टक्के, आनवा येथील प्रकल्पात ८० टक्के तर राजेवाडी येथील प्रकल्पात ८५ टक्के पाणी साठा असल्यामुळे या वर्षी तरी पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.