ETV Bharat / state

जालन्यातील व्यापाऱ्याची 46 लाखांना फसवणूक; गुजरातमधून दोघांना अटक

author img

By

Published : Jun 10, 2021, 7:25 PM IST

Jalna trader cheated for 46 lakh
जालन्यातील व्यापाऱ्याची 46 लाखांना फसवणूक; गुजरातमधून दोघांना अटक

जालन्यातील एका व्यापाराला गुजरातमधील महाठगाने 46 लाखांना गंडा घातला होता. या प्रकरणी तालुका पोलिसांनी गुजरातमधून दोघांना ताब्यात घेऊन जालन्यात आणले आहे.

जालना - जालन्यातील सोलरचे साहित्य विकणाऱ्या एका व्यापाराला गुजरातमधील महाठगाने 46 लाखांना गंडा घातला होता. या प्रकरणी तालुका पोलिसांनी गुजरातमधून दोघांना ताब्यात घेऊन जालन्यात आणले आहे. पियुष दिलीप भाईसोलंकी आणि प्रतीक मुकेशभाई नाई, असे या आरोपींची नावे आहे. तर एक महिला फरार झाली आहे.

प्रतिक्रिया

46 लाखांचा गंडा -

मंठा चौफुली परिसरात वसुधा भरत भुतेकर यांचे सोलार प्रोजेक्ट सेल्स अँड सर्व्हिस नावाचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे युनिट आहे. या युनिटसाठी डिसेंबर महिन्यात गुजरात येथील एका व्यापाऱ्याकडून एक लाख 89 हजार रुपयांचे साहित्य खरेदी केले होते. हे साहित्य योग्य वेळी पाठवल्यामुळे दोघांचाही एक दुसऱ्यावर विश्वास बसला आणि नंतर गुजरातच्या व्यापाऱ्याने दुसऱ्या एका कंपनीचे कमी दरात साहित्य उपलब्ध करून देतो, असे सांगितले आणि त्याच्या खात्यावर 46 लाख रुपये वर्ग करण्यास सांगितले. त्यानंतर जालन्यातून 4 ते 10 मे दरम्यान गुजरातच्या व्यापाऱ्याला 46 लाख रुपये वर्ग करण्यात आले. हे पैसे मिळाल्यानंतर गुजरात येथील व्यापारी साहित्य पाठविण्याची टाळाटाळ करू लागला आणि पैसेही परत देत नव्हता. त्यामुळे वसुधा भुतेकर यांची फसवणूक झाल्याची खात्री पटली.
27 मेला गुन्हा दाखल -

पंधरा दिवस वाट पाहिल्यानंतरदेखील गुजरातमधून सोलर पॅनलचे साहित्य येत नसल्याचे लक्षात आल्यावर जालन्यातील सोलार ऊर्जा प्रकल्प उभारणीच्या संचालिका वसुधा भरत भुतेकर यांनी 27 मेला तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

6 तारखेला टीम रवाना -

गुन्ह्याचे गांभीर्य आणि रक्कम या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन तालुका पोलिसांनी लगेच याची दखल घेतली आणि 6 जून रोजी 5 जणांची टीम या तपास गुजराकडे रवाना झाली. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर या आरोपींचे मोबाईल लोकेशन ही घेण्यात आले होते. त्यानुसार गुजरातमधील अहमदाबाद येथे हे व्यापारी असल्याचे लक्षात आले. 6 जून रोजी जालन्यातून निघालेली टीम 7 जूनला अहमदाबादला पोहचली. तसेच 8 जून रोजी दिवसभर आरोपीचा शोध घेतल्यानंतर दोन आरोपी हाताला लागले. तर एक महिला या व्यवहारात कंपनीची भागीदार होती, ती फरार झाली आहे. दोन आरोपींना घेऊन तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस 9 जूनरोजी सकाळी जालन्यात परतले आहेत. गुजरात येथे कोणतीही कंपनी अस्तित्वात नाही, फक्त एक छोटेसे कार्यालय असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा - LIVE मालाड इमारत दुर्घटना : केंद्राकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाखांची मदत; पंतप्रधानांनी केलं दु:ख व्यक्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.