ETV Bharat / state

जळगावात महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर 'हॉकर्स'चा हल्ला

author img

By

Published : Feb 3, 2021, 7:35 PM IST

महानगरपालिका
महानगरपालिका

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर अनधिकृत हॉकर्सने हल्ला केल्याची घटना बुधवारी (दि. 3 फेब्रुवारी) दुपारी शहरातील मास्टर कॉलनी परिसरात घडली आहे.

जळगाव - महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर अनधिकृत हॉकर्सने हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. 3 फेब्रुवारी) दुपारी शहरातील मास्टर कॉलनी परिसरात घडली. मास्टर कॉलनीत दर बुधवारी भरणाऱ्या बाजारात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करत असताना हा प्रकार घडला. हॉकर्सच्या सुमारे 40 ते 50 जणांच्या जमावाने महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर हल्ला करत, जप्त केलेले साहित्य, हातगाड्या बळजबरीने हिसकावून घेत पळ काढला. या प्रकरणी महापालिका प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

शहरातील मास्टर कॉलनी परिसरात दर बुधवारी बाजार भरतो. हा बाजार अनधिकृत असून, याला महापालिका प्रशासनाने परवानगी नाकारलेली आहे. या बाजारात जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील अनेक व्यावसायिक येऊन आपली दुकाने थाटतात. भाजीपाला तसेच संसारोपयोगी साहित्याची या ठिकाणी विक्री केली जाते. या बाजारासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार बुधवारी (दि. 3 फेब्रुवारी) दुपारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे एक पथक कारवाईसाठी या ठिकाणी आले होते. पथक बाजारात दाखल होताच काही हॉकर्स गोंधळ घालू लागले. पथकातील कर्मचाऱ्यांनी काही हॉकर्सचे साहित्य जप्त केल्यानंतर वाद वाढला. त्यानंतर हॉकर्सची गर्दी वाढली. त्यांनी महापालिकेच्या पथकाशी हुज्जत घालायला सुरुवात केली. याच वेळी शाब्दिक वाद टोकाला गेल्याने काही हॉकर्सनी पथकातील कर्मचाऱ्यांवर थेट हल्ला केला.

जप्त केलेले साहित्य हॉकर्सने बळजबरीने हिसकावले

अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने काही हॉकर्सचे साहित्य जप्त करून ते ट्रॅक्टरमध्ये भरले होते. परंतु, हॉकर्सने दादागिरी करत पथकाला न जुमानता जप्त केलेले साहित्य बळजबरीने हिसकावून घेत बाजारातून पळ काढला. कारवाईसाठी गेलेल्या पथकात 8 ते 10 कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मात्र, हॉकर्सची संख्या 40 ते 50 असल्याने त्यांचे प्रयत्न अपुरे पडले.

घटनेनंतर उपायुक्तांनी घेतली धाव

मास्टर कॉलनीत अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकावर हॉकर्सने हल्ला केल्याची घटना माहिती झाल्यानंतर उपायुक्त संतोष वाहुळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अतिक्रमण काढण्याची कारवाई करताना महापालिकेच्या वतीने चित्रीकरण केले जाते. त्यातून कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या हॉकर्सची ओळख पटवली जाणार असून, त्यानंतर पोलीस कारवाई केली जाईल, अशी माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिली.

हेही वाचा - 152 कोटींचा निधी दिल्याने जळगाव जिल्ह्यात खेडी-भोकर पुलाचा प्रश्न मार्गी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.