ETV Bharat / state

माजी महापौर रमेश जैन यांच्या कार्यालयाला शॉर्टसर्किटने आग; महत्त्वाची कागदपत्रे भस्मसात

author img

By

Published : Oct 9, 2020, 5:46 PM IST

Updated : Oct 9, 2020, 5:54 PM IST

आग दुर्घटना
आग दुर्घटना

अग्निशमन दलाच्या तासाभराच्या प्रयत्नानंतर २ बंबांनी ही आग आटोक्यात आणली. या आगीत महत्वाची कागदपत्रे जळाल्याची माहिती माजी महापौर रमेश जैन यांनी दिली.

जळगाव - शहरातील खान्देश विकास आघाडीचे नेते व माजी महापौर रमेश जैन यांच्या कार्यालयाला आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या आगीच्या घटनेत महत्वाची कागदपत्रे जळाली आहेत. हे कार्यालय शहरातील खान्देश मिल कॉम्लेक्स भागात आहे.

रमेश जैन यांच्या कार्यालयातील शिपाई समाधान हे नेहमीप्रमाणे आज सकाळी ९ वाजता कार्यालयात पोहोचले. त्यांनी विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी बटन दाबले. तेव्हा कार्यालयामधील संगणक कक्षात मोठा आवाज झाला. त्यांना शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे लक्षात आले. तोपर्यंत आगीने मोठा भडका घेतला होता. संगणक कक्ष प्लायवूडचा असल्याने ही आग जोरदार भडकली. अग्निशमन दलाच्या तासाभराच्या प्रयत्नानंतर २ बंबांनी ही आग आटोक्यात आणली. या आगीत महत्वाची कागदपत्रे जळाल्याची माहिती रमेश जैन यांनी दिली. याबाबत माहिती देताना रमेश जैन म्हणाले, की कोरोनामुळे मी ऑफिसमध्ये जाणे टाळत आहे. किती नुकसान झाले, हे मात्र नक्की सांगता येणार नाही.

माजी महापौर रमेश जैन यांच्या कार्यालयाला शॉर्टसर्किटने आग
दरम्यान, माजी महापौर जैन यांचे कार्यालय शहराच्या मध्यवर्ती असल्याने आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. या घटनेसंदर्भात पंचनामा करण्यात आला आहे. आगीच्या घटनेची शहर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.
Last Updated :Oct 9, 2020, 5:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.