खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या संशयिताची निर्घृण हत्या; मारेकऱ्यांनी गोळीबार करत चॉपरने केले वार

author img

By

Published : Sep 21, 2021, 10:31 PM IST

Dhammapriya Suralkar gun fire Nashirabad

खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या एका संशयित आरोपीची अज्ञात मारेकऱ्यांनी निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातील नशिराबाद येथे आज (मंगळवारी) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली ही घटना घडली. या घटनेत हत्या झालेल्या तरुणाचे वडील देखील गंभीर जखमी झाले आहेत.

जळगाव - खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या एका संशयित आरोपीची अज्ञात मारेकऱ्यांनी निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातील नशिराबाद येथे आज (मंगळवारी) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली ही घटना घडली. या घटनेत हत्या झालेल्या तरुणाचे वडील देखील गंभीर जखमी झाले आहेत.

घटनास्थळाचे दृश्य

हेही वाचा - जळगाव जिल्ह्यात डेंग्यूची साथ तीव्र; आरोग्य यंत्रणेची वाढली चिंता

धम्मप्रिय मनोहर सुरळकर (वय 19) असे या घटनेतील मृत तरुणाचे नाव असून, मनोहर दामू सुरळकर (वय 45) असे त्याच्या जखमी वडिलांचे नाव आहे. धम्मप्रिय व मनोहर सुरळकर हे भुसावळ शहरातील पंचशील नगरातील रहिवासी आहेत. ते आज सायंकाळी जळगावातून दुचाकीने भुसावळला घरी जात असताना मारेकऱ्यांनी त्यांच्यावर सशस्त्र हल्ला केला. त्यात धम्मप्रियचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नेमके काय घडले?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 ऑक्टोबर 2020 रोजी भुसावळ शहरातील पंचशील नगरात एका व्यक्तीचा खून झाला होता. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या खुनाच्या गुन्ह्यात धम्मप्रिय सुरळकर हा संशयित आरोपी होता. त्याला या गुन्ह्यात अटक होऊन, तो जळगाव उपजिल्हा कारागृहात होता. आज त्याला भुसावळच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. कारागृहातून सुटल्यानंतर तो वडिलांसह दुचाकीने जळगावातून भुसावळच्या दिशेने जात होता. नशिराबाद येथे महामार्गावर असलेल्या उड्डाणपुलाखाली त्यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळीबार केला. त्यात जखमी झाल्याने दोघे जण दुचाकीवरून जमिनीवर पडले. मारेकऱ्यांनी नंतर धम्मप्रिय याच्यावर चॉपरने वार करत त्याची निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर मारेकरी तेथून पळून गेले. मनोहर सुरळकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. ही घटना समोर आल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळी पोलिसांची धाव

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. सर्वात आधी मृत धम्मप्रिय याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात तर, जखमी मनोहर सुरळकर यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

टोळी युद्धातून घडले हत्याकांड?

पोलिसांच्या प्राथमिक तपासात या हत्याकांडाला पूर्ववैमनस्याची किनार असल्याची माहिती समोर येत आहे. टोळी युद्धातून हे हत्याकांड घडल्याचा संशय आहे. धम्मप्रिय याने ज्या व्यक्तीची हत्या केल्याचा संशय आहे, त्या व्यक्तीच्या निकटवर्तीयांचा या हत्येमागे हात असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, त्या दिशेने पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांकडून महामार्गाच्या आजूबाजूला असलेल्या दुकानांच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहेत. त्यातून काही धागेदोरे मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कुणालाही ताब्यात घेण्यात आले नव्हते.

हेही वाचा - 'हवे तर आमची किडनी घ्या, पण शहरातील रस्ते दुरुस्त करा'; जळगावकर नागरिकांचे मनपाला साकडे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.