ETV Bharat / state

नक्षलग्रस्त पातागुडम गावाला एकनाथ शिंदेंची भेट, गावकऱ्यांना मंत्र्यांचे पहिल्यांदाच दर्शन

author img

By

Published : Aug 3, 2020, 2:30 PM IST

minister rajnath shinde visit to patagudam naxlite village in gadchiroli
minister rajnath shinde visit to patagudam naxlite village in gadchiroli

नगरविकास मंत्री शिंदे यांनी पातागुडम पुलाची पाहणी केल्यानंतर छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या संवेदनशील परिसरातील गावांना भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. नक्षलवाद्यांच्या त्रासाला बळी पडलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

गडचिरोली - नगरविकास मंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी राज्याच्या शेवटच्या टोकावरील अतिसंवेदनशील पातागुडम गावाला गोपनीयरित्या भेट दिली. माओवाद्याच्या हालचाली असलेल्या या परिसरात आजपर्यंत कुणीही मंत्री आले नव्हते. शिंदे यांच्या रुपात गावकऱ्यांना पहिल्यांदा मंत्र्यांचे दर्शन झाले. इतकेच नव्हे तर एकनाथ शिंदे यांनी काही आदीवासीच्या घरात जाऊन त्याच्याशी संवादही साधला.

तत्पूर्वी त्यांनी पातागुडम पोलीस ठाण्याला भेट देऊन तेथील जवानाच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. नक्षलवाद्याशी लढणाऱ्या जवानाच्या अतिदुर्गम भागात आरोग्यासह इतर समस्या लवकर सोडवण्याचे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिंदे यांनी पातागुडम पुलाची पाहणी केल्यानंतर छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या संवेदनशील परिसरातील गावांना भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. नक्षलवाद्यांच्या त्रासाला बळी पडलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. राज्य सरकार त्यांच्या पाठिशी खंबीर उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली. पात्तागुडम येथील पोलीस स्थानकाला भेट देऊन तेथील पोलीस, एसआरपीएफ, बीएसएफ जवानांसाठी उभारण्यात आलेल्या वसतिगृह तसेच तेथील कॅन्टीन व इतर व्यवस्थापनाची पाहणी केली. तसेच तेथील गावकऱ्यांशीही संवाद साधून त्यांच्या अडचणी जिल्हा प्रशासनाला सोडविण्यासाठी निर्देश दिले.

यावेळी त्यांनी तेलंगणा सीमेवरील मेडिगट्टा प्रकल्पाची पाहणी करुन महाराष्ट्रातील प्रकल्पासाठी गेलेल्या भूभागाची हवाई मार्गे पाहणी केली. रस्ते, इतर प्रलंबित कामे पूर्ण करून या भागातील लोकांना रोजगार व हाताला काम दिल्यास नक्षलवाद कमी होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, तहसिलदार सिरोंचा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे, मुख्याधिकारी विशाल पाटील, नायब तहसीलदार हमीद सय्यद, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वलके उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.