ETV Bharat / state

Sonia Gandhi Balu Dhanorkar Family : 'गांधी कुटुंबीय तुमच्या सोबत', सोनिया गांधींनी दिला धानोरकर कुटुंबियांना धीर

author img

By

Published : Jul 8, 2023, 10:54 PM IST

दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या कुटुंबियांनी शुक्रवारी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी सोनिया गांधी यांनी, 'गांधी कुटुंबीय सदैव तुमच्या पाठीशी आहे', अशा शब्दात आमदार प्रतिभा धानोरकर यांना धीर दिला.

Sonia Gandhi Balu Dhanorkar Family
सोनिया गांधी बाळू धानोरकर कुटुंबीयांची भेट

चंद्रपूर : राज्यातील कॉंग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे 30 मे रोजी निधन झाले. ते रुग्णालयात असताना आणि त्यांच्या निधनानंतरही राहुल गांधी सतत धानोरकर कुटुंबीयांच्या संपर्कात होते. शुक्रवारी त्यांनी धानोरकर कुटुंबियांना भेटीसाठी दिल्लीला बोलावले होते. ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत आमदार प्रतिभा धानोरकर, त्यांचे दोन्ही पुत्र मानस धानोरकर आणि पार्थ धानोरकर, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर व प्रवीण काकडे उपस्थित होते.

सोनिया गांधींनी दिला धीर : आमदार प्रतिभा धानोरकर यांचे सांत्वन करताना सोनिया गांधी म्हणाल्या की, 'मी देखील अशा कठीण प्रसंगातून गेली आहे. राजीव गांधींचे निधन झाले तेव्हा राहुल तुमच्या मुलांपेक्षाही लहान होता. धीर सोडू नका. गांधी कुटुंबीय तुमच्या पाठीशी आहे, अशा शब्दात त्यांनी प्रतिभा धानोरकर यांना धीर दिला. या प्रसंगी राहुल गांधी देखील उपस्थित होते'.

'गांधी कुटुंबीय नेहमी पाठीशी राहील' : आमदार प्रतिभा धानोरकर यांनी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा सारा घटनाक्रम सांगितला. धानोरकरांच्या निधनानंतरची परिस्थितीही कथन केली. त्यावेळी सोनिया गांधी यांनी त्यांच्यावरही अशी वेळ आली होती, याची आठवण करुन दिली. त्यावेळी राहुल तुमच्या मुलांपेक्षाही खूप लहान होता. मलाही खूप त्रास झाला, असे त्या म्हणाल्या. तसेच गांधी कुटुंबीय नेहमी तुमच्या पाठीशी राहील. कोणतीही अडचण आल्यास थेट संपर्क साधा, असे त्यांनी सांगितले.

बाळू धानोरकर यांचा परिचय : खासदार बाळू धानोरकर यांचे 30 मे रोजी हरियाणातील गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात निधन झाले होते. त्यांनी वयाच्या अवध्या 48 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पित्ताशय आणि स्वादुपिंडामध्ये इन्फेक्शन झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बाळू धानोरकर हे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे खासदार होते. 2019 मध्ये त्यांनी येथे माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा पराभव केला होता. कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी धानोरकर अनेक वर्षे शिवसेनेत होते. त्यांनी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. 2014 ते 2019 दरम्यान ते चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार होते.

हेही वाचा :

  1. MP Balu Dhanorkar : सामान्य शिवसैनिक ते काँग्रेसचे खासदार; बाळू धानोरकर यांचा झंझावाती राजकीय प्रवास
  2. Balu Dhanorkar Death : खासदार बाळू धानोरकरांचे पार्थिव पंचतत्वात विलीन, लोटला जनसमुदाय
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.