ETV Bharat / state

भंडाऱ्यात बिबट्याचे कातडे विकण्याचा प्रयत्न; 6 आरोपींना अटक, दोन उच्चशिक्षित

author img

By

Published : Jul 2, 2020, 5:59 PM IST

Trying to sell leopard skin
भंडाऱ्यात बिबट्याचे कातडे विकण्याचा प्रयत्न

साकोली येथील चार व्यक्ती बिबट्याचे कातडे नागपूर येथील लोकांना विकण्याच्या प्रयत्नात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी बनावट खरेदीदार बनून सापळा रचला.

भंडारा - साकोली तालुक्यामध्ये बिबट्याचे कातडे विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहा लोकांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या आरोपींकडून बिबट्याचे कातडे आणि जबडा जप्त करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये बिबट्याचे कातडे विक्री करण्याची ही पहिलीच घटना आहे. विशेष म्हणजे या आरोपींमध्ये दोन उच्चशिक्षित तरुणांचा समावेश आहे.

साकोली येथील चार व्यक्ती बिबट्याचे कातडे नागपूर येथील लोकांना विकण्याच्या प्रयत्नात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी बनावट खरेदीदार बनून सापळा रचला. या आरोपींनी बिबट्याच्या कातड्याची किंमत पाच कोटी सांगितली होती. शेवटी 3 कोटींमध्ये हा सौदा ठरवला आणि आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना खरेदीसाठी पाठवले. मात्र आरोपींनी संपूर्ण दिवसभर पोलिसांना चकवा दिला.

भंडारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा - नालासोपाऱ्यात तलवारी घेऊन गुंडांचा राडा, एकास अटक

तरिही पोलिसांनी धीर न सोडता त्यांच्याशी सतत संपर्क केला. शेवटी आरोपींनी बनावट खरेदीदार असणाऱ्या पोलिसांना सायंकाळी बोदरा ते पिंडकेपार रस्त्यावर बोलवले. आरोपींनी कातडी दाखवताच पोलिसांनी दुर्योधन सिताराम गहाणे (32 रा. खामगाव (बु.) ता.साकोली, 2) पंकज ईश्वर दिघोरे (25 रा. सुभाष वार्ड, कोंढा) लक्ष्मीकांत शेषमंगल नान्हे (29 वर्षे रा. रुक्मिणीनगर खात रोड, भंडारा) योगेश्वर श्रीकृष्ण गहाणे (41 रा. सिरेगाव, ता. साकोली) या चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी या चारही लोकांची चौकशी सुरु केली तेव्हा त्यात आणखीन एक सत्य पुढे आले. लॉकडाऊनच्या काळात साकोली येथील रंजित छगन रामटेके (26) आणि चंद्रशेखर छगन रामटेके (40) दोघेही राहणार खैरी पिंडकेपार या भावांनी आपल्या उसाच्या वाडीत तारांच्या कंपाऊंडला विद्युत प्रवाह सोडला होता. हाच विद्युत प्रवाह लागून या बिबट्याचा मृत्यू झाला होता, असे समजले. त्यानंतर त्याचे चामडे वेगळे करून ती विकण्याची जबाबदारी या चार आरोपींनी घेतली होती. या आरोपींमध्ये एक आरोपी हा उच्चशिक्षित असून एम. टेक. झालेला आहे तर दुसरा आरोपी हा बीएससी आहे. केवळ पैशाच्या हव्यासापोटी या आरोपींनी बिबट्याचे चामडे विकण्याची जबाबदारी घेतली होती.

हेही वाचा - सावधान! सर्दी, उलटी, जुलाब, मळमळ होत असेल तर असू शकतो कोरोना

पोलिसांनी या आरोपींकडून 25 लाख रुपयांचे बिबट्याचे कातडे, तीन दुचाकी, 4 मोबाइल फोन आणि 1 लाख किंमतीचा बिबट्याच्या जबडा असे एकूण 27 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. या सहाही आरोपींना पुढील कारवाईसाठी वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.