ETV Bharat / state

अन् संतापलेल्या कामगारांनी पंकजा मुंडेच्या साखर कारखान्याला ठोकले टाळे

author img

By

Published : Mar 10, 2021, 6:12 PM IST

वेतन रखडल्यामुळे कामगारांनी केला कारखाना बंद
वेतन रखडल्यामुळे कामगारांनी केला कारखाना बंद

एकेकाळी वैद्यनाथ कारखाना आशिया खंडात नावाजला गेला. परंतु, मागच्या काही वर्षांपासून व्यवस्थापनातील काही दोष, कायम पडणारा दुष्काळ यामुळे कारखाना अडचणीत आला आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनासाठी अनेक दिवस आंदोलन केले होते.

परळी वैजनाथ (बीड) : तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखानातील जवळपास ७०० पेक्षा अधिक कामगारांचे १९ महिन्यांपासून वेतन रखडले आहे. वारंवार मागणी करुनही कामगारांचे वेतन होत नव्हते. अखेर संतापलेल्या कामगारांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला टाळे ठोकले. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या कारखान्याच्या अध्यक्ष आहेत. जोपर्यंत पगार मिळेत नाही तोपर्यंत कारखाना सुरू करणार नसल्याची भूमिका कामगारांनी घेतली आहे. दरम्यान कामगार व अधिकारी यांच्यात बाचाबाची होऊन काही काळ तणावाचे वातावरण होते.

थकीत वेतनासाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी कायम ऊसतोड मजूरांच्या हिताचे राजकारण केले. पण, तत्कालिन परिस्थितीत राष्ट्रवादी - काँग्रेसला शह देण्यासाठी त्यांनी साखर कारखानदारीतही पाय ठेवले. मजूर आणि कारखानदारी यात सुवर्णमध्य साधण्याची किमयाही त्यांनी करुन दाखविली. एकेकाळी वैद्यनाथ कारखाना आशिया खंडात नावाजला गेला. परंतु, मागच्या काही वर्षांपासून व्यवस्थापनातील काही दोष, कायम पडणारा दुष्काळ यामुळे कारखाना अडचणीत आला आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनासाठी अनेक दिवस आंदोलन केले होते. दरम्यान, आताही कर्मचाऱ्यांचे १९ महिन्यांचे वेतन थकलेले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी दहा दिवसांपूर्वी कारखान्याचे कार्यकारी संचालक दिक्षतलू यांना निवेदन दिले.


पंकजा मुंडेंच्या भुमिकेकडे लक्ष
थकीत पगार १० दिवसांत खात्यात वर्ग करा, अन्यथा आम्ही कारखाना बंद करु असा इशारा दिला होता. दहा दिवस लोटूनही पगार न झाल्याने कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळपासूनच कारखाना बंद केला असून यात वजन काटा व सर्व कार्यालयाचे कर्मचारी, उत्पादन युनिटचे कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. या संपाबदल कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण पंकजा मुंडे यांनी अनेक अडचणीतून हा कारखाना यंदा सुरू केला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळालाही होता. मात्र, कर्मचाऱ्यांचे पगार मात्र थकीत आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांनी हे संपाचे हत्यार उपसले आहे.

कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी आमने सामने
दरम्यान अधिकारी व कर्मचारी यांच्या मध्ये बाचाबाची होऊन काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान कारखाना परिसरात पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पुरभे यांनी भेट दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.