ETV Bharat / state

अंबेजोगाईच्या ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती, प्लांटची राज्यमंत्री तनपुरे यांनी केली पाहणी

author img

By

Published : Apr 25, 2021, 10:12 AM IST

अंबेजोगाईच्या ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती
अंबेजोगाईच्या ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती

अंबेजोगाईला हा जनरेशन प्रकल्प सुरू झाल्यानंतर दरदिवशी दीडशे सिलिंडर ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. या प्रकल्प पाहणीनंतर तनपुरे यांनी अंबेजोगाईचे शासकीय रुग्णालय व लोखंडी सावरगाव येथील जम्बो कोविड सेंटरला भेट दिली.

अंबेजोगाई - सध्या राज्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. त्याप्रमाणे अंबेजोगाईमध्येही स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली होती. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी थर्मल पॉवरचा प्लांटचा वापर करून अंबेजोगाईच्या रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती सुरू करण्यात येणार आहे. शनिवारी त्या प्लांटची ऊर्जा व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पाहणी केली.

अंबेजोगाईला हा जनरेशन प्रकल्प सुरू झाल्यानंतर दरदिवशी दीडशे सिलिंडर ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. या प्रकल्प पाहणीनंतर तनपुरे यांनी अंबेजोगाईचे शासकीय रुग्णालय व लोखंडी सावरगाव येथील जम्बो कोविड सेंटरला भेट दिली. यावेळी कोरोनाबाधित रुग्णावर होत असलेले उपचार आणि त्यासाठी येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात त्यांनी चर्चा करत त्या अडचणी तत्काळ सोडवण्याच्या सूचना प्रशासनला दिल्या.

लोखंडी गावचे कोविड सेंटर अंधारातच

यावेळी मंत्री तनपुरे यांनी सावरगाव येथील कोरोना केअर सेंटरला भेट दिली असता, काही समस्या असल्याचे समोर आले. या कोरोना सेंटर परिसरात रात्रीच्यावेळी उजेडाची सोय नसल्याच्या तक्रारी आल्या. ऑक्सिजनची टाकी असलेल्या परिसरात विद्युत दिवे नाहीत. त्यामुळे कोणी माथेफिरू धोका निर्माण करू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली. तसेच बाहेरील बाजूस जंगल परिसर असल्याने रात्री रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेर आश्रयाला थांबणे धोक्याचे ठरू शकते, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली. यावर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अंबेजोगाई नगर परिषदेच्या सीओ साबळे यांना बोलावून तत्काळ लोखंडीच्या कोविड सेंटर परिसरात पथदिवे बसवण्याची कार्यवाही करा, असे निर्देश दिले.

विद्युत यंत्रणा रामभरोसे
स्वा रा ती ग्रा शासकीय रुग्णालय गेली तीस वर्षांपासून कार्यरत आहे. गेले दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी पासून या रुग्णालय व महाविद्यालयाच्या इमारतीत विद्युत पुरवठा होतो, या कामासाठी कनिष्ठ अभियंता नियुक्त होता. मात्र अनेक वर्षांपासून सदरील पदावर कोणीही अभियंता येत नाही. याची माहिती घेत आता तातडीने कायमस्वरूपी अभियंता लवकर देण्याची व्यवस्था करू असेही आश्वासन राज्यमंत्री तनपुरे यांनी दिले.

जनरेशन प्लांटची केली पाहणी
मेडिकल परिसरात उभा केलेल्या ऑक्सिजन जनरेशन प्लांटची माहिती थर्मल पॉवरचे मुख्य अभियंता मोहन आवाड यांनी दिली. राज्यमंत्री तनपुरे यांनी या प्लांट मधून तयार झालेला ऑक्सिजन रुग्णांना दिला तर त्याचे साईड इफेक्ट नाहीत, याचीही खात्री करून पुरवठा करा, असेही निर्देश दिले.

यावेळी आमदार संजय दौंड, माजी आमदार पृथ्वीराज साठे, प्रभारी नगराध्यक्ष पापा मोदी,रुग्णालयाचे डीन डॉ शिवाजीराव सुक्रे, उपजिल्हाधिकारी शरद झाडके, डॉ राकेश जाधव, शिवाजीराव शिरसाट, गोविंदराव देशमुख, नगरसेवक बबन लोमटे, महादेव आदमाने, सीईओ अशोक साबळे,आदी मान्यवर हजर होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.