ETV Bharat / state

ठरलं! मनोज जरांगे पाटलांचं मुंबईत 20 जानेवारीपासून आमरण उपोषण; सरकारला दिला इशारा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 23, 2023, 2:23 PM IST

Updated : Dec 23, 2023, 6:09 PM IST

Maratha Reservation Protest
मराठा आरक्षण आंदोलन

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांची शनिवारी (23 डिसेंबर) बीडमध्ये भव्य इशारा सभा झाली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाबाबत मोठी घोषणा केली आहे. येत्या 20 जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू होणार आहे.

बीड Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या 20 जानेवारीपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू होणार आहे. 20 जानेवारीच्या आंदोलनाच्या तयारीला लागा, मराठ्यांनी जर मुंबईकडे कूच केली तर ते माघारी फिरणार नाहीत. आरक्षण घेतल्याशिवाय मराठे मुंबईतून परत फिरणार नाहीत. देवजरी आडवा आला तरी आम्ही माघारी फिरणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलाय.

सरकार मराठा समाजाला डाग लावण्याचा प्रयत्न करतंय : मराठ्यांच्या एकजुटीचा महाप्रलय बीडमध्ये दिसून आलाय. आपल्याला डाग लावला गेला. शांततेत असलेल्या समाजाला डाग लावला जात आहे. कोणी म्हणतं हॉटेल तर कोणी म्हणतं घर जाळलं. भीणारा हा मराठा नाही. आम्ही काहीही केलं नाही तरीही आमच्यावर गुन्हे दाखल केले. कारण नसतानाही मराठ्यांच्या मुलांना अडकवण्याचं काम सरकारनं केलं, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर केलाय .

छगन भुजबळांवर टीका : मराठ्यांना राज्यात शांतता हवी आहे. आता करोडो, लाखोंच्या संख्येने मराठा एकत्र आलाय. विनाकारण आम्हाला डाग लाऊ नका. याच मराठ्यांनी शांततेचा संदेश दाखवून दिलाय. मराठा कधीच जाळपोळ, तोडफोड करत नाही. ते येवल्याचा येडपाड आहे आणि त्याचंच हे सरकार ऐकत आहे. आमच्या नादी लागू नको असं म्हणालो होते मी याआधीच, मी नमुना बेकार आहे. आताचा तुला पचत नाही तर नंतर कसं होईल? आता जरांगे साहेब म्हणतो. मग आधीच नीट राहायचं होतं, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.

आंदोलन सरकारला जड जाणार : सरकारनं शहानपणाची भूमिका घ्यावी, त्याच्या (छगन भुजबळ) नादी लागू नका. आरक्षणासाठी सरकारनं माझ्या मराठ्यांना तडपू नका व त्यांचा अंतही पाहू नये. सरकारनं नवीन नवीन प्रयोग करणं बंद करावं व थेट आरक्षण द्यावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. सरकारनं आता तरी आता सावध व्हावं आणि मराठा समाजाला आरक्षण द्या. पुढचं होणारं आंदोलन हे तुम्हाला खूप जड जाणार आहे, असा इशाराही जरांगे पाटलांनी दिलाय.

मी मॅनेज होणारा नाही : मराठा समाजाला मी मायबाप मानलं आहे. यांच्यासोबत गद्दारी करणार नाही. गद्दारी करण्यासाठी मी हे आंदोलन केलं नसून, तर या समाजासाठी मी जीवन अर्पण केलंय. तुमच्या एकजुटीची ताकद मी जिवंत असेपर्यंत वाया जाऊ देणार नाही. मी मॅनेज होणारा नाही. हे जमत नाही म्हणून सरकारला आरक्षण द्यावं लागणार आहे. आरक्षण मिळाल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरील आनंद बघायचा, हेच माझं स्वप्न असल्याचं मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले. वेळप्रसंगी बापानं कर्ज काढायचं पण मुलांना शिकवायचं तर आईनंही सोनं विकून लेकरांना शिकवलं. पण आरक्षणानं घात केला. मराठ्यांच्या मुलांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. आता सावध व्हा. हीच संधी आहे आरक्षण मिळवण्याची. आपल्याला आरक्षण 100 टक्के मिळणारच. तो (छगन भुजबळ) जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार असल्याचा उल्लेख मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये केलाय.

सरकार गांभीर्यानं घेत नाही : सरकार मराठ्यांचा अपमान करत आहे. समाजाची फसवणूक करत आहे. सत्तेची गादी मिळवायची आणि त्याचा लाभ भुजबळ यांच्या सारख्यांना द्यायचा. मराठ्यांनी नेत्यांना मोठं करायचे आणि मराठ्यांकडं या नेत्यांनी लक्ष द्यायचं नाही ही पद्धत सध्या सुरू आहे. त्यामुळं आता मराठ्यांनो सावध व्हा. सरकार गांभीर्यानं घेत नाही. सरकारला वटणीवर आणण्याची ताकद मराठ्यांमध्ये आहे. मराठा समाज माझ्या मागं असल्यानं मला कोणाचीही भीती नाही. जातीपेक्षा नेता मोठा नाही. जो आपल्या पाठिशी, तोच आपला नेता असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

हेही वाचा :

  1. गिरीश महाजनांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; आरक्षणासाठी मुदतवाढ गरजेची, मंत्री महाजनांनी केलं स्पष्ट
  2. कुणबी मराठ्यांच्या आतापर्यंत 72 लाख नोंदी सापडल्या आहेत - मनोज जरांगे पाटील
  3. डेडलाईन 24 डिसेंबरच, पुढचं आंदोलन सरकारला परवडणारं नसेल; मनोज जरांगे पाटलांचा इशारा
Last Updated :Dec 23, 2023, 6:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.