ETV Bharat / state

बीडमध्ये देवस्थानच्या जमिनी नावे करून देणारे रॅकेट सक्रिय; पालकमंत्र्यांनी घेतली दखल

author img

By

Published : May 31, 2021, 8:32 PM IST

जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालय

मागील सात वर्षात बीड जिल्ह्यातील शेकडो देवस्थानच्या जमिनी परस्पर नावे करून लाटण्याचा गोरख धंदा प्रशासनातील काही बड्या अधिकाऱ्यांनीच सुरू केलेला आहे. याबाबत अनेक तक्रारी असताना देखील तक्रारदारांचे साधे म्हणणे देखील अधिकारी ऐकून घेत नाहीत. मात्र आता या प्रकरणात उशिरा का होईना बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी लक्ष घातले आहे.

बीड - मागील सात वर्षात बीड जिल्ह्यातील शेकडो देवस्थानच्या जमिनी परस्पर नावे करून लाटण्याचा गोरख धंदा प्रशासनातील काही बड्या अधिकाऱ्यांनीच सुरू केलेला आहे. याबाबत अनेक तक्रारी असताना देखील तक्रारदारांचे साधे म्हणणे देखील अधिकारी ऐकून घेत नाहीत. मात्र आता या प्रकरणात उशिरा का होईना बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी लक्ष घातले आहे. असे प्रकार यापूर्वी झाले असतील किंवा आता होत असतील तर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

अधिकार्‍यांची चौकशी करण्यासाठी समिती

बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या देवस्थानची शेकडो एकर जमीन आहे. या जमिनीचा मालकी हक्क कायद्याने शासनाकडे आहे. मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. जिल्ह्यात देवस्थानच्या शेकडो एकर जमीन जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून लाटण्याचा गोरखधंदा करणारे रॅकेट बीडमध्ये सक्रिय आहे. याबाबत अनेक तक्रारी झाल्यानंतर प्रशासन व पालकमंत्री धनंजय मुंडे खडबडून जागे झाले. अखेर त्यांनी देवस्थानच्या जमिनी लाटणाऱ्या व अशा प्रकरणात मदत करणाऱ्या अधिकार्‍यांची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली आहे.

नेमके काय आहे प्रकरण?
2015 ते 2021 या काळात बीड जिल्ह्यातील विविध देवस्थानांच्या जमिनी, ईनामी जमिनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून परस्पर नावावर करून घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, यासंबंधी चौकशी समिती नेमून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, असे निर्देश बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. बीड तालुक्यातील नामलगाव येथील श्री गणपती मंदिराची 26 एकर जमीन परस्पर नावे करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या संबंधीचे फेरफार निकाल तात्काळ थांबविण्यात यावेत असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

'सर्वच बाबींची सखोल चौकशी करावी'

जिल्हाधिकारी कार्यालयातील भुसुधार विभागाने जिल्ह्यातील खालसा झालेल्या इनामी जमिनी व देवस्थानच्या जमिनीचे सर्व निकाल, फेरफार व अन्य दस्तावेज, संबंधित जमिनी विक्री करण्यासाठी देण्यात आलेल्या परवानग्या या सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात यावी. देवस्थानच्या जमिनी व इनामी जमिनी खालसा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी कोणती पद्धत वापरली तसेच कागदोपत्री हेराफेरी करण्यात आली आहे का? या सर्वच बाबींची सखोल चौकशी करण्यात यावी, असेही मुंडे यांनी म्हटले आहे.

'दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी'

दरम्यान, देवस्थानच्या जमिनी व इनामी जमिनी कुण्या एखाद्या अधिकाऱ्याशी संगनमत करून बेकायदेशीररीत्या खालसा दाखवून त्या परस्पर नावे करून घेणे ही बाब गंभीर असून, या प्रकरणी तात्काळ चौकशी करण्यात यावी, तसेच यामध्ये दोषी आढळलेल्या सर्वांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असून, यासंबंधी विभागीय आयुक्त श्री सुनील केंद्रेकर यांच्याशी देखील चर्चा करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - खासदार संभाजीराजेंची हेरगिरी नेमकं कोणतं सरकार करतंय?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.