ETV Bharat / state

अंबादास दानवे यांच्या व्हॅनिटी व्हॅनचं चंद्रकांत खैरेंच्या हस्ते उद्घाटन, आम्ही वेगळे नसल्याचा सूर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 29, 2023, 9:53 PM IST

Chandrakant Khaire
चंद्रकांत खैरे व्हॅनिटी व्हॅनचं उद्घाटन करताना

Chandrakant Khaire : माजी शिवसेना (ठाकरे गट) खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व्हॅनिटी व्हॅनचं आज उद्घाटन करण्यात आलं.

चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर Chandrakant Khaire : लोकसभा निवडणुका जवळ येत आल्यानं ठाकरे गटाची उमेदवारी कोणाला मिळणार, याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे तसंच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे 'या' दोघांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, त्यांच्यातील वैमनस्य जिल्ह्यातील जनतेला नवं नाहीय. मात्र, दानवे यांच्या व्हॅनिटी व्हॅनचं खैरे यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानं पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. त्यावर दोन्ही नेत्यांनी स्पष्टीकरण दिलंय. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असं माजी शिवसेना खासदार (ठाकरे गट) चंद्रकांत खैरे यांनी म्हटलंय. आगमी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार कोण असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना दोघांनीही उद्धव ठाकरेंकडं बोट दाखवत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. तर, दुसरीकडं दानवे यांनी खैरेंना ज्येष्ठत्वाचा मार्ग दाखवला, असं शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी म्हटलंय.

खैरेंच्या हस्ते व्हॅनिटी व्हॅनचं पूजन : विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पक्षाच्या विस्तारासाठी व्हॅनिटी व्हॅन घेतलीय. या गाडीचं पूजन माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आलं. एकीकडं दोघांमध्ये लोकसभा उमेदवारीवरून सुरू असलेली रस्सीखेच आणि त्यातच दोघं एकत्र आल्यानं पुन्हा एकदा चर्चां सुरू झाल्याय. मराठवाड्यात ठाकरे गटाची ताकद मोठी आहे. वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना 'या' गाडीचा उपयोग व्हावा म्हणून ही गाडी घेतल्याचं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं. अनेक ठिकाणी दौरा करताना गावांमध्ये काही सोयी सुविधा आढळून येत नाहीत. जेवण करायचं असेल किंवा स्वच्छतागृहाची गरज असल्यास अनेक वेळा अडचण निर्माण होते. त्यामुळं गाडी तयार करून घेतली, असून पक्षाच्या प्रत्येकाला त्याचा उपयोग होईल. विशेषतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दौऱ्यावर आल्यावर त्यांच्यासाठी 'ही' गाडी उपयुक्त ठरेल, असं मत अंबादास दानवे यांनी व्यक्त केलं.

दोघं एकत्र आल्यानं चर्चा : माजी खासदार चंद्रकांत खैरे तसंच विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यातील वाद नवीन नाहीत. खैरे खासदार असताना दानवे जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्यातील मानापमान नाट्य अनेकवेळा जगजाहीर आहेत. इतकंच नाही, तर 2019मध्ये खैरे यांच्या पराभवाचं खापर देखील दानवे यांच्यावर काही जणांनी फोडण्याचा प्रयत्न केला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दोघंही प्रबळ दावेदार मानले जातात. काही दिवसांपासून उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत समाज माध्यमांवर चर्चा रंगली होती. त्यातच दांवेंच्या व्हॅनचं उद्घाटन खैरेंनी केल्यानं तर्कवितर्क सुरू आहेत.

आमच्यात वाद नाही : व्हॅनचं लोकार्पण चर्चेत असतानाच आमच्यात कधीही वाद झाला नसल्याचं दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केलं. आम्ही दोघंही पक्षासाठी काम करत आहेत. पक्षाकडं आम्ही उमेदवारी मागितलेली नाही, मात्र पक्षानं आदेश दिल्यास ती आम्ही स्वीकारू. खैरे ज्येष्ठ नेते असून कधी कधी ते रागवतात. मात्र, नंतर समजूत काढतात. त्यांचा स्वभाव आपल्याला नवीन नाही. त्यामुळं त्यांच्याशी कोणताही वाद नाही, असं मत अंबादास दानवे यांनी व्यक्त केलं. तर, दुसरीकडं मातोश्रीवरून येणारा आदेश सर्वस्व आहे, उद्धव साहेबांनी दिलेला आदेश मान्य केला जाईल, अंबादास दानवेंशी कोणताही वाद नसल्याचं खैरेंनी स्पष्ट केलंय.

शिरसाट यांची टिका : दानवेंनी घेतलेल्या व्हॅनिटी व्हॅनची पूजा खैरे यांच्या हस्ते झाल्यावर, इतर पक्षांनी देखील त्यावर भाष्य करायला सुरुवात केली आहे. दानवे-खैरे एकत्र आल्यास आम्हाला आनंदच आहे, अशी मिश्किल टीका शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाठ यांनी केली आहे. खैरे यांनी समजूत काढल्यानं एखाद्या वेळेस त्यांच्यातील वाद शमले असतील. मात्र, गाडी कोणी घेतली ते पहा, दानवेंनी खैरेंना ज्येष्ठत्व दाखवलं. त्यांची जोरदार तयारी सुरू आहे. आता माझी गाडी, त्यात मीच बसणार असं होऊ शकत, असं शिरसाट म्हणाले.

हेही वाचा -

  1. लोकसभेसाठी महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम, शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये धुसफुस
  2. प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर दिसणार का महाराष्ट्राचा चित्ररथ? प्रशासनानं दिलं 'हे' उत्तर
  3. INDIA आघाडी तुटण्याच्या मार्गावर? शिवसेना महाराष्ट्रात २३ जागांवर ठाम, ममता बॅनर्जींचा बंगालमध्ये एकला चलोचा नारा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.