ETV Bharat / state

लोकसभेसाठी महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम, शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये धुसफुस

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 29, 2023, 5:13 PM IST

Seat Allocation Rift : लोकसभा 2024 च्या निवडणुकीसाठी अवघ्या काही महिन्यांचा कालावधी उरलेला असताना जागा वाटपाच्या मुद्द्यावरून महायुतीतील शिंदे आणि अजित पवार गटात जुंपली आहे. (Shinde Group) एकीकडे भाजपा मिशन 45 चे टार्गेट ठरवून चालत आहे. (Ajit Pawar Group) अशातच जागा वाटपाचा प्रश्न न सुटल्यास दोन्ही गट टोकाची भूमिका घेत असल्याचं बोललं जात आहे.

Seat Allocation Rift
देवेंद्र फडणवीस

जागा वाटपाच्या मुद्द्यावर बोलताना वैजनाथ वाघमारे

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अवघ्या काही महिन्यांचा अवधी शिल्लक असताना जागा वाटपावरून महायुतीमध्ये मोठा संघर्ष पेटला आहे. भाजपाने राज्यात मिशन ४५ टार्गेट केलं असताना अजित पवार गट आणि शिंदे गटानेसुद्धा लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या परीने जागांची मागणी केल्याने लोकसभा निवडणुकीचा जागा वाटपाचा तिढा कायम आहे. (Lok Sabha Election 2024) जागा वाटपाचा तिढा हा दिल्लीत सोडवला जाईल असं भाजपाच्या वरिष्ठांकडून सांगण्यात आलं असलं तरी प्रमाणापेक्षा कमी जागा पदरात पडल्यास शिंदे गट त्याचबरोबर अजित पवार गट वेगळी भूमिका घेतील का? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात जरी महायुती असली तरीसुद्धा आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त खासदार कसे निवडून येतील याकडे प्रत्येक पक्षाचा कल असणार आहे.


नेमक्या कोण किती जागा लढवणार - शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपा सोबत जात राज्यात सत्ता स्थापन केली. अशा परिस्थितीत राज्यात शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत नाही तोच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार गटाने एन्ट्री करून राज्यातील सत्तेत आपलीही भागीदारी नमूद केली. आता अशा परिस्थितीत २०२४ लोकसभा निवडणुका तोंडावर असताना जागा वाटपावरून तिन्ही पक्षांमध्ये मतभेद सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने 'मिशन ४५'चे टार्गेट आखले असून त्या दृष्टिकोनातून त्यांनी राज्यभर तयारी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री तसंच भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे स्वतः फेब्रुवारी महिन्यापासून प्रत्येक लोकसभा मतदारसंघ पिंजून काढणार आहेत. यादरम्यान त्यांच्या जोडीला शिंदे गट तसंच अजित पवार गटाचे मोठे नेतेसुद्धा उपस्थित राहणार आहेत. किंबहुना काही मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिन्ही नेते प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. हे सर्व आतापर्यंत ठरलं असलं तरीसुद्धा नेमक्या कोण किती जागा लढवणार? यावरून मोठ्या प्रमाणामध्ये अंतर्गत पेच निर्माण झाला आहे.


भाजपासाठी फार मोठी डोकेदुखी : लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत राज्यातील एकूण ४८ जागांपैकी भाजपाने 23 जागांवर विजय मिळवला होता. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने १८ जागांवर विजय मिळवला होता. तसंच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ५ जागांवर विजय संपादित केला होता. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर आताच्या घडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत १२ खासदार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्यासोबत रायगडचे सुनील तटकरे हे एकमेव खासदार आहेत. अशा परिस्थितीमध्ये भाजपा किमान २५ जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. यामध्ये ३ ते ४ जागांची वाढही होऊ शकते. तर शिंदे गटाकडून लोकसभेसाठी १९ जागांची मागणी केली जात आहे. अशा परिस्थितीमध्ये अजित पवार यांच्या गटाला जेमतेम ४ ते ५ जागा मिळण्याची शक्यता आहे. यावरून अजित पवार गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस्सीखेच सुरू आहे. यांच्यातील जागा वाटपाचा तिढा कशा पद्धतीनं सोडवता येईल, ही शिंदे किंवा पवार यांना नाही तर भाजपासाठी फार मोठी डोकेदुखी ठरली आहे.


शिंदे-पवार गटात ठिणगी पडण्यास सुरुवात : जागा वाटपावरून महायुतीमध्ये ठिणगी पडण्यास सुरुवात झाली आहे. जितक्या जागा शिंदे गटाला दिल्या जातील, तितक्याच जागा अजित पवार गटालासुद्धा मिळायला हव्यात अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली आहे. त्याचं प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी भुजबळांना प्रतिउत्तर देत भुजबळांनी आपलं मत त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडे मांडावं. प्रत्येक गोष्ट अशी सार्वजनिक करू नये. नाहीतर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा थेट इशाराच दिला आहे. यावरून आता एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये जागा वाटपावरून धुसफूस सुरू झाल्याचं दिसून येत आहे. वास्तविक राज्यात शिंदे फडणवीस सरकारची गाडी व्यवस्थित चालली असताना चालत्या गाडीत अजित पवार यांना घ्यायची काही आवश्यकता होती का? असा प्रश्नही आता शिंदे तसंच भाजपा गटातील नेत्यांना पडला आहे. अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले नसते तर जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला नसता आणि ही परिस्थिती उद्‌भवली नसती. अशीही चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये रंगू लागली आहे.


काँग्रेस-राष्ट्रवादीला किती जागा देणार - महायुतीतील लोकसभेच्या जागा वाटपावरून उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनीसुद्धा महायुतीवर टीका केली आहे. उद्याच्या घडीला शिंदे गट त्याचबरोबर अजित पवार गटाच्या उमेदवारांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. कारण ते त्यांच्या पायाशी जाऊन बसले आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना शिंदे गटाचे प्रवक्ते, वैजनाथ वाघमारे यांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की, महायुतीमध्ये तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा एकमेकांशी चांगला सलोखा असून हे तिन्ही नेते समोपचाराने निर्णय घेतील. त्याविषयी संजय राऊत यांना चिंता करण्याची गरज नाही. त्यांनी अगोदर त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये काय सुरू आहे ते पाहावं. एकीकडे उद्धव ठाकरे लोकसभेसाठी २३ जागांची मागणी करत असताना तितक्याच जागा वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना देणार आहेत. तर मग काँग्रेस आणि राष्ट्रवादीला किती जागा देणार? असा सवालही वाघमारे यांनी केला आहे. आमच्या ताटात वाकून बघण्यापेक्षा तुम्ही तुमची चिंता करावी, असा सल्लाही वाघमारे यांनी संजय राऊत यांना दिला आहे.

हेही वाचा:

  1. शिवसेना महाराष्ट्रात २३ जागांवर ठाम, ममता बॅनर्जींचा बंगालमध्ये एकला चलोचा नारा; INDIA आघाडी तुटण्याच्या मार्गावर?
  2. जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांचा राजीनामा, नितीश कुमार यांच्या हाती पुन्हा पक्षाची धुरा
  3. कचऱ्याच्या डंपरनं चिरडले बहीण भाऊ; संतप्त जमावाने पेटवला डंपर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.