ETV Bharat / state

Maratha Andolan : शांततेत सुरू असलेलं मराठा आंदोलन कसं झालं हिंसक? मराठा क्रांती मोर्चा समन्वयक म्हणतात...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2023, 6:02 PM IST

Maratha Andolan
मराठा आंदोलन

Maratha Andolan : 2016 पासून मराठा आंदोलनाला अतिशय शांततेत सुरूवात झाली होती. त्यानंतर मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. याबद्दल सविस्तर आपण या रिपोर्टमधून जाणून घेवू या. (maratha reservation)

मराठा आंदोलनावर प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Maratha Andolan : गेल्या काही वर्षांमध्ये मराठा आरक्षण मुद्दा थंडावला, असं वाटत असताना वडीगोद्री येथे मनोज पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणामुळं पुन्हा एकदा आंदोलन सुरू झालंय. 9 ऑगस्ट क्रांती दिन म्हणून ओळखला जातो. या दिवशी समाजासाठी आंदोलन म्हणून 2016 मध्ये पहिला मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर शांततेच्या मार्गाने लाखोंच्या संख्येनं 58 मोर्चे काढण्यात आले. मात्र, नंतर हळूहळू आंदोलनाची पद्धत बदलली, शांतपणे सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झालं. (maratha andolan latest news)

कोपर्डी घटनेनंतर मोर्चे : 2016 साली कोपर्डीमध्ये युवतीवर झालेल्या अत्याचारानंतर आंदोलनाची हाक देण्यात आली. 9 ऑगस्ट 2016 रोजी पहिला मराठा क्रांती मोर्चा छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकातून काढण्यात आला होता. या मोर्चात पहिल्यांदाच लाखो लोकांनी एकत्र येऊन शांततेत कुठल्याही घोषणा न देता मोर्चा काढून वेगळा आदर्श निर्माण केला. याचप्रमाणं हळूहळू वेगवेगळ्या ठिकाणी 'एक मराठा, लाख मराठा' अशा घोषणा देत मोठ्या संख्येनं मराठा बांधवांना घेऊन 58 मोर्चे राज्यभरात निघाले. शेवटचा मोर्चा मुंबईमध्ये काढण्यात आला होता. 25 ते 30 लाख लोकांनी यात सहभाग घेत आपल्या वेगवेगळ्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्या. (Maratha Andolan news)


मुलींनी केले नेतृत्व : 'मराठा क्रांती मोर्चा' या नावानं पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगर शहरातून आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनाला कोणतंही नेतृत्व नव्हतं. तरीही शिस्तीत आणि शांततेत मोर्चे निघाले होते. मोर्चाचा समारोप होत असताना युवती त्यांच्या भावना व्यक्त करत होत्या. शांत, मात्र आक्रमक पद्धतीचं भाषण करून सरकार दरबारी समाजाच्या अडचणी मांडण्याचं काम करण्यात आलं. यात राजकीय पक्षांशी संबंध असलेले नेते देखील साधारण आंदोलन म्हणून वावरत होते. त्यामुळे आंदोलन करण्याची वेगळी पद्धत समाजात रुळली. या आंदोलनाची नोंद सर्व स्तरातून घेतली गेली. म्हणून मराठा नाही तर इतर समाजाचे नागरिक देखील यात सहभागी होत होते. मराठा समाजाला आरक्षणासह इतर मागण्या या आंदोलनामधून समोर आणल्या गेल्या. मात्र शांत आणि संयमी असलेल्या आंदोलनाची दखल सरकार दरबारी न घेतल्यामुळं आंदोलन हिंसक पद्धतीकडे वळले.


कोणत्याही राजकीय नेत्यांचे नेतृत्व केले अमान्य : मराठा आरक्षण, शिक्षण आणि नोकरी यांच्यासह इतर मागण्यांना घेऊन मराठा समाजाने लाखोंचे मोर्चे काढले. मात्र या मोर्चाचं नेतृत्व कोणाकडेही नव्हतं. जागोजागी आयोजनाची घोषणा झाल्यानंतर, समाजातील नागरिक स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरत होते. काही राजकीय नेत्यांकडे याचं नेतृत्व जाईल का? अशी भीती वाटत होती. त्यावेळी छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे नेतृत्व देण्याबाबत चर्चा समोर आल्या. मात्र कोणाचंही नेतृत्व नको, अशी भूमिका अनेकांनी घेतली. त्यामुळे आजही या आंदोलनाला कोणतंही एक नेतृत्व मिळालं नाही. आज आंदोलनात सहभागी प्रत्येकजण समन्वयक म्हणून वावरतो. शांततेतील मोर्चे, त्यानंतर हिंसक आंदोलन ते न्यायालयीन लढाई, असा प्रवास या आंदोलनाच्या माध्यमातून सुरू झाला. तरी, आजही न्याय मिळत नाही. राज्यात प्रत्येक पक्ष सत्तेत येऊन गेला मात्र, फक्त आश्वासन मिळालं. त्यामुळेच समाज आक्रमक झाल्याचं सामाजिक अभ्यासकांचा म्हणणं आहे. (Maratha Andolan know in detail)



शांततेत सुरू असलेले मोर्चे झाले हिंसक : शांततेत सुरू असलेल्या मोर्चांची सर्व स्तरातून चर्चा झाली. मात्र, न्याय मिळाला नाही. त्यामुळंच 'ठोक मोर्चा' नावानं पुन्हा आक्रमक आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. सर्वात पहिलं आंदोलन बीड जिल्ह्यातील परळी येथे करण्यात आलं. त्यानंतर जागोजागी ठिय्या आंदोलन सुरू झाली. शहरातील क्रांती चौक भागात हे आंदोलन सुरू असताना कायगाव टोका येथे रास्ता रोको आणि जलसमाधी आंदोलन करण्यात आलं होतं. त्याचवेळी काकासाहेब शिंदे या आंदोलकानं पाण्यात उडी घेत जलसमाधी घेतली होती. तिथून हिंसक आंदोलनं सुरू झाली. काकासाहेब शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात जाळपोळ दगडफेक करण्यात आली. त्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यानंतर काही दिवसांमध्ये मराठा समाजाच्या मागण्यांसाठी 42 युवकांनी आत्महत्या केल्या. बलिदान देणाऱ्या युवकांच्या कुटुंबियांना सर्वोपरी मदत देण्याचं आश्वासन देण्यात आलंय. मात्र आजही ते पूर्ण झालेलं नाही. कोरोनाच्या महामारीमुळे निर्बंध लागले आणि आंदोलनं बंद झाली.(Maratha Kranti Morcha)



मनोज जरांगे यांनी उभे केले पुन्हा आंदोलन : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या गावातील मनोज जरांगे पाटील यांनी मागील काही महिन्यांमध्ये पुन्हा आंदोलनांना सुरुवात केलीय. त्यांनी आधी चक्काजाम आंदोलन केलं. त्यानंतर 90 दिवस ठिय्या आंदोलन केल्यावर आश्वासन मिळालं. मात्र, पुन्हा त्याची पूर्तता झाली नाही, म्हणून पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग त्यांनी अवलंबला. त्याचवेळी लाठीचार्ज आणि गोळीबारासारखी घटना झाली. त्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर दिसून आले. एकेकाळी शांत आणि संयमी पद्धतीनं आंदोलन केलेला समाज आज आक्रमकपणे समोर येतोय. सरकार दरबारी न्याय मिळत नसल्याने युवा पिढी आक्रमकपणे प्रतिसाद देतेय. आता विश्वास नसल्यानं नव्या पिढीचा संयम तुटल्याची भावना मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आणि अभ्यासक डॉ. शिवानंद भामुसे यांनी व्यक्त केलीय. (Coordinator Dr Shivanand Bhamuse)


राजकीय नेत्यांच्या उदासीनतेमुळे संघटना आक्रमक : मराठ्यांना आरक्षण मिळण्याबाबत अण्णासाहेब पाटील यांनी सुमारे 40 वर्षांपूर्वी प्रश्न छेडला होता. त्यानंतर त्यांनी याबाबतीत आंदोलनही उभं केलं होतं. सर्व पक्षांमध्ये मराठा समाजाचे नेते असतानाही या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष झालं. कोणीही न्याय दिला नाही, म्हणूनच मराठा क्रांती मोर्चाची निर्मिती झाली. त्यामुळेच ही संघटना कोणत्याही पक्षीय अभिनिवेशापासून दूर राहिलीय. केवळ मराठ्यांचे आरक्षण आणि त्यांना येणाऱ्या अडचणी याबाबतच या संघटनेनं काम करायचं ठरवलं. ही संघटना मराठा समाजातील नेत्यांच्या राजकीय उदासीनतेमुळं निर्माण झालीय. त्यामुळे पक्षांच्या पलीकडे असलेली ही संघटना आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी प्रतिक्रिया सकल मराठा समाजाचे नेते दत्ताजीराव देसाई (Dattajirao Desai Reaction) यांनी व्यक्त केलीय.

हेही वाचा :

  1. Maratha Reservation History : ४० वर्षांपासून मराठा आरक्षणाचं भिजत घोंगडं, जाणून घ्या आजपर्यंतचा प्रवास
  2. Maratha Reservation Protest : मराठा आंदोलनाचा 'लालपरी'ला फटका; कोट्यवधींचं नुकसान
  3. Maratha Reservation : मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र मिळणार? हैदराबादच्या निजामांचं रेकॉर्ड तपासणार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.