Ganesh Festival 2023 : यंदा बाप्पाच्या शाडूच्या मूर्तींची अॅडव्हान्स बुकिंग, एक दिवस आधीच 70 टक्के मूर्ती झाल्या बुक

Ganesh Festival 2023 : यंदा बाप्पाच्या शाडूच्या मूर्तींची अॅडव्हान्स बुकिंग, एक दिवस आधीच 70 टक्के मूर्ती झाल्या बुक
Ganesh Festival 2023 : यंदा गणेश उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे. छत्रपती संभाजीनगरात शाडूच्या मूर्तीची 70 टक्के बुकींग अगोदरच झाली आहे. त्यामुळे भाविकांनी पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्यावर भर दिल्याचं पहायला मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगर Ganesh Festival 2023 : गणेश उत्सवाला सुरुवात होत असून सर्वत्र उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. पर्यावरण पूरक सण साजरा करण्याकडं भाविकांचा कल दिसून येत असल्यानं यंदाचा गणेश उत्सव ( Ganesh Festival ) विशेष मानला जात आहे. त्यामुळेच पीओपी ऐवजी शाडू मातीच्या गणपती मूर्तींना अधिक पसंती नागरिक देत आहेत. इतकंच नाही तर आपल्याला हवा तसा बाप्पा मिळावा यासाठी अॅडव्हान्स बुकिंग करणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. बाजारपेठेत असलेल्या आकर्षक अशा शाडू मातीच्या 60 ते 70 टक्के मूर्तींचं आगाऊ बुकिंग भक्तांनी केल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली आहे.
बाप्पांची देखील झाली अॅडव्हान्स बुकिंग : सण साजरा करताना निसर्गाचा समतोल बिघडणार नाही, याची खबरदारी अनेक गणेश भक्त घेत आहेत. त्यामुळेच शाडू मातीपासून तयार झालेल्या मूर्तीची स्थापना करण्याकडं भाविकांनी पसंती दाखवली आहे. मात्र बाजारपेठांमध्ये मागील वर्षी शाडू मातीच्या मूर्ती लवकर संपल्या होत्या. त्यामुळे ऐनवेळी लाडक्या बाप्पाची आवडती मूर्ती घेता आली नसल्यानं, यंदा बाप्पाची देखील अॅडव्हान्स बुकिंग मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे. आठ दिवसांपूर्वी बाप्पांच्या सुबक मूर्ती बाजारपेठेत दाखल झाल्या आणि जागोजागी दुकानं थाटली गेली. त्यानंतर भक्तांनी आपल्याला आवडेल तशी मूर्ती अॅडव्हान्स बुकिंग करून राखून ठेवली आहे. गणेश स्थापनेच्या 48 तास आधीच 70 टक्के मूर्तींची आगाऊ बुकिंग झाली आहे. यावर्षी मूर्तींच्या किंमतीत तीस टक्क्यांनी महाग झाल्या असल्या, तरी शाडू मातीच्या बाप्पांच्या मूर्तीची मागणी वाढल्याचं व्यावसायिक रोहित फुटाणे यांनी सांगितलं. तर मागील वर्षीचा अनुभव पाहता यंदा खबरदारी घेतल्याची माहिती भाविकांनी दिली आहे.
शाडू मातीच्या मूर्तींची मागणी वाढली : पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी मोहीम चालवली. तर काही संस्थांनी शाळांमधे जाऊन लहान मुलांना शाडू माती किंवा मातीपासून बाप्पाची मूर्ती तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं. पर्यावरण संरक्षणाची माहिती चिमुकल्यांना दिली. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या काही वर्षात शाडू मातीच्या बाप्पांच्या मूर्तींची मागणी वाढली आहे. त्यात यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीपेक्षा शाडू मातीच्या गणेश मूर्तींची मागणी वाढली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये राज्य सरकार सामाजिक संस्था यांनी पीओपीच्या मूर्तींमुळे होणारी हानी याबाबत जनजागृती मोहीम राबवली. त्यामुळेच यंदा अनेक नागरिकांनी सण साजरा करताना खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळालं.
हेही वाचा :
