ETV Bharat / state

विकसित भारत संकल्प यात्रेचा संभाजीनगरमध्ये शुभारंभ

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 25, 2023, 10:29 PM IST

BJP Vikasit Bharat Sankalp Yatra
BJP Vikasit Bharat Sankalp Yatra

Vikasit Bharat Sankalp Yatra : विविध कल्याणकारी योजनाबाबत जनजागृती करण्यासाठी भाजपा देशव्यापी "विकसित भारत संकल्प यात्रा" राबवत आहे. देशातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये ही यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी दिली आहे.

डॉ भागवत कराड यांची प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर Vikasit Bharat Sankalp Yatra : भाजपा पुन्हा एकदा रथ यात्रा काढत आहे. यंदा या रथामध्ये सरकारी योजनांची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून एल.ई.डी टिव्ही असलेल्या ट्रक प्रत्येक ग्रामपंचायतीत फिरवण्यात येणार आहे. सलग दोन महिने केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकापर्यंत पोहोचतील, असा विश्वास केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भगवत कराड यांनी आज व्यक्त केला. ते आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.

सर्व विधानसभा मतदार संघात फिरणार रथ : भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित, वंचित लाभार्थींपर्यंत पोहोचावेत, यासाठी केंद्र शासनाच्या वतीनं विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम आखण्यात आली आहे. या यात्रेंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय आवारात डॉ कराड यांच्या हस्ते चित्ररथांना हिरवी झेंडी दाखवून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यासाठी 7 एलईडी व्हॅन आल्या आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी एक व्हॅन असून, त्याद्वारे शासकीय योजनांची माहिती जनतेला देणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, पूर्वी लाभ मिळालेले लाभार्थी यांच्या उपस्थितीत या व्हॅनचं स्वागत केलं जाईल. या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थींपर्यंत पोहोचवली जाणार आहे. तसंच नागरिकांना योजनांचा फायदा घ्यायचा असेल, तर त्याबाबत नोंदणी केली जाणार असून योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थींपर्यंत पोहोचवला जाईल. माहितीचा प्रसार, योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद - वैयक्तिक यशकथा, अनुभव कथन, सरकारी योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधणे असं नियोजन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी दिली.

योजनांची माहिती देण्यासाठी यात्रा : केंद्राच्या योजना गावागावात माहिती पोहचाव्यात यासाठी जिल्हा ते गावपातळीवर चित्ररथाद्वारे जिंगल्स, पोस्टर्स, छायाचित्रे, ध्वनी-चित्रफिती, पथनाट्य, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रचार –प्रसिद्धी करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर मोहीम यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असतो. त्यासाठी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामसेवक, तलाठी यांचाही सहभाग घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत, आरोग्य विमा योजनाचा प्रत्येक गावात प्रसार प्रचार करण्यात येत आहे. 28 नोव्हेंबर ते 26 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील 871 ग्रामपंचायतींमध्ये या व्हॅन फिरणार आहेत.

निवडणुकीचा संबंध नाही : लोकसभा किंवा विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात्रा काढली जात आहे. मात्र, निवडणुका आणि रथ यात्रेचा काहीच संबंध नाही. विविध योजनाची माहिती देण्यासाठी ही यात्रा असल्याचं मत केंद्रीय अर्थरज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी व्यक्त केलंय.

हेही वाचा -

  1. संजय राऊत यांच्याकडून पुन्हा 'मकाऊ अस्त्र', व्हिडिओ शेअर करत भाजपाला दिला 'हा' इशारा
  2. संजय राऊतांविरुद्ध 'ते' वक्तव्य करणं नितेश राणेंना अंगलट; माझगाव दंडाधिकाऱ्यांनी काढलं जामीनपात्र वॉरंट
  3. 'फोटोवरुन भाजपाचीच हिट विकेट', संजय राऊत पुन्हा गरजले
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.