Mahimapur Well : विदर्भात प्रसिद्ध असलेल्या सातमजली पायविहीरीचा थाटच अनोखा; वाचा, विहिरीचे ऐतिहासिक महत्त्व
Published: May 22, 2023, 4:21 PM


Mahimapur Well : विदर्भात प्रसिद्ध असलेल्या सातमजली पायविहीरीचा थाटच अनोखा; वाचा, विहिरीचे ऐतिहासिक महत्त्व
Published: May 22, 2023, 4:21 PM
महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध गडकिल्ले, वास्तू आहेत. त्या पुरातन वास्तूंशी सातवाहनांपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत अनेकांचे नाते आहे. त्यापैकी एक म्हणजे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील महिमापूरची सातमजली पायविहीर आहे. ही विहीर संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे.
अमरावती : यादवकालीन आणि बहामणी कालीन असे दोन मतप्रवाह या विहिरीच्या इतिहासाबाबत आहेत. महिमापुर या गावाच्या मधात ही विहीर आहे. या विहिरीचे संपूर्ण बांधकाम मध्य प्रदेशात आढळणाऱ्या तांबूस रंगाच्या दगडांचे आहे. चौकोनी आकाराची ही विहीर ऐंशी फूट खोल आहे. या विहिरीची रुंदी 40 मीटर इतकी आहे. जिल्ह्यात असणाऱ्या विविध पौराणिक आणि ऐतिहासिक स्थळांपैकी दर्यापूर तालुक्यात महिमापुर या गावातील विहीर ही संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. तळघरात जणू किल्ला बांधला असावा असाच थाट या विहिरीचा पाहायला मिळतो. अनेक पर्यटक इतिहास तसेच स्थापत्यशास्त्राच्या अभ्यासकांसाठी ही विहीर नेहमीच आकर्षणाचे केंद्र ठरत आली आहे.
असे आहे ह्या विहिरीचे वैशिष्ट्य: तळघरात सात मजल्यांची असणाऱ्या या विहिरीत उतरण्यासाठी 88 पायऱ्या आहेत. या पायऱ्या उतरताना आपण एखाद्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारातूनच जात आहोत की, काय असा अनुभव येतो. प्रवेशद्वारांवर दगडात कोरलेली दोन फुल ही सर्वांचे लक्ष वेधतात. पायऱ्यांद्वारे विहिरीत खाली उतरताना विश्रांतीसाठी काही टप्पे आहेत. या विहिरीच्या आत शिरल्यावर विहिरीच्या चारही बाजूंनी फिरता येईल बसता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. विहिरीच्या तळाशी चारही बाजूंनी मोठ्या समान रचना करण्यात आली आहे.
मध्य प्रदेशातून तांबूस दगड : तांबूस रंगाच्या दगडासह काही ठिकाणी या विहिरीच्या बांधकामात काळा दगड देखील वापरण्यात आला आहे. तांबूस दगड हा मध्य प्रदेशातून या ठिकाणी आणण्यात आला. ही संपूर्ण विहीर कातीव दगडात बांधलेली असून नैसर्गिक झऱ्यांसाठी विहिरीला जागोजागी छिद्र सोडण्यात आली आहेत. या विहिरीत अनेक कमानी छोट्या खोल्या सुरक्षित कोणाकडे मागच्या आणि वरच्या बाजूस राहता येईल अशी दालने आहेत. या दालनांमध्ये जाण्यासाठी स्वतंत्र पायऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
पातशाहीत सैन्याच्या पडावाचे ठिकाण: मध्ययुगीन कालखंडामध्ये हसन गंगू उर्फ बहामणशहा याने बहामनी राज्याची स्थापना केली होती. हसन गंगूच्या नंतर विस्तारलेल्या बहामणी साम्राज्याची शकले पडली. 1446 ते 1590 या 144 वर्षाच्या कालखंडात बहामणी साम्राज्याच्या पाच शाह्या निर्माण झाल्या. यामध्ये विजापूरची आदिलशाही, गोवळकोंडाची कुतुबशाही, अहमदनगरची निजामशाही, अचलपूरची इमादशाही आणि बिदरची बरीदशाही अशा पाच शाह्या निर्माण झाल्या. या पाचही शाह्या एकमेकांशी सतत भांडत असत.
हा आहे विहीरीचा प्रमुख हेतू: अचलपूरची निमाजशाही आणि हैदराबादच्या गोवळकोंडाची कुतुबशाही यांच्या मधल्या प्रवासाच्या दोन मार्गांपैकी एक मार्ग हा अमरावती जिल्ह्यातील सावळापूर कोल्हापूर महिमापूर येथून हैदराबादकडे जायचा. दुसरा मार्ग अचलपूर ह्या राजधानी तून पाथर्डी माहूर चंद्रपूर आणि मध्य प्रदेशातील बैतूल पर्यंत जायचा. या मार्गाने सुलतान आणि त्याचे सैन्य जात असताना सैन्याचा पडाव असणाऱ्या ठिकाणी अनेक विहिरी बांधण्यात आल्या त्यापैकी एक विहीर ही महिमापूरची आहे. अशी माहिती इतिहास अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर संतोष बनसोडे यांनी दिली. सैन्याला सहजपणे पाणी उपलब्ध होणे हा प्रमुख हेतू या विहिरी मागे होता. त्या काळात सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक विहिरीत तैनात असायचे. यामुळेच या विहिरीत झोपण्यासाठी राहण्यासाठी व्यवस्था केली असल्याचे आढळते.
विहीर 900 वर्षे जुनी असल्याचे मत: खरंतर महिमापुर येथील विहीर नेमकी यादवकालीन की, बहामणी कालीन असे इतिहास अभ्यासकांचे दोन मतप्रवाह आहेत. काही इतिहासकारांच्या मते महिमा पुर येथील विहीर 800 ते 900 वर्ष जुनी आहे. देवगिरीच्या यादवांच्या काळातील ही विहीर असल्याचे काही संशोधकांचे मत आहे. देवगिरीच्या यादवांच्या राजधानीचे ठिकाण हे दौलताबाद होते. त्यांच्या राज्याची सीमा सातपुडा पर्वतरांगेपासून तापी नदीच्या खोऱ्यापर्यंत पसरली होती. यादवांच्या काळात देवगिरी ते अचलपूर पर्यंत बारा विहिरी बांधण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक विहीर ही महिमापुर येथील पायविहीर असल्याचे काही इतिहास अभ्यासकांचे मत असल्याची माहिती संतोष बनसोडे यांनी दिली.
इतिहासकारांच्या मते महिमा पुर येथील विहीर 800 ते 900 वर्ष जुनी आहे. यादवांच्या काळात देवगिरी ते अचलपूर पर्यंत बारा विहिरी बांधण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक विहीर ही महिमापुर येथील पायविहीर आहे. - प्रा. डॉ. संतोष बनसोड, इतिहास अभ्यासक
विहिरीचे पाणी होते औषधयुक्त: या विहिरीचे बांधकाम केल्यामुळे कालांतराने विहिरीच्या परिसरात लोक वस्ती निर्माण झाली. आज जवळपास 100 घर महिमापूर या गावात आहेत. आता उन्हाळ्यात ही विहीर कोरडी पडली असली तरी, सात मजल्यांच्या या विहिरीत पूर्वी पाण्याची पातळी ही दुसऱ्या मजल्यापर्यंत होती. परिसरातील ग्रामस्थ याच विहिरीतून पाणी भरत असत. या विहिरीत बाबर नावाची वनस्पती होती, या वनस्पतीमुळे विहिरीचे पाणी औषधीयुक्त बनले होते. त्यामुळे या विहिरीचे पाणी पिल्याने डायरिया, पोटाचे आजार यासारखे कोणतेही विकार होत नव्हते. मात्र कालांतराने या विहिरीतील पाणी शुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडरचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेल्यामुळे, या विहिरीतील वनस्पती नष्ट झाल्या. या विहिरीचे ऐतिहासिक महत्त्व फार मोठे आहे. आज देखील ही भव्य विहीर आपली ओळख जपून आहे. यामुळेच या विहिरीला भेट देण्यासाठी वर्षभरात देशभरातून अनेक पर्यटक तसेच इतिहास आणि स्थापत्यशास्त्राचे विद्यार्थी भेट देतात.
हेही वाचा -
