ETV Bharat / state

शिर्डी नगराध्यक्षपदासाठी नगरसेवकांमध्ये जोरदार लॉबिंग; विखेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

author img

By

Published : Oct 2, 2020, 2:19 PM IST

Shirdi Nagar Panchayat
शिर्डी नगरपंचायत

शिर्डी नगराध्यक्षपदासाठी नगरसेवकांमध्ये जोरदार लॉबिंग सुरू झाली आहे. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यातून काय मार्ग काढतात? याकडेच शिर्डीकरांचे लक्ष लागले आहे.

शिर्डी : नगरपंचायतच्या विद्यमान नगराध्यक्ष अर्चना कोते यांना दिलेला कार्यकाळ संपल्याने आता नवीन नगराध्यक्षपदाच्या निवडीबाबत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी साई निर्माण ग्रुप आणि नगरसेवकांसमोर जगन्नाथ गोंदकर यांना सव्वा वर्षानंतर नगराध्यक्षपदाचा शब्द दिला होता. विखे दिलेला शब्द पाळणार का, की अन्य नगरसेवकांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ टाकणार, याकडे शिर्डीकरांचे लक्ष लागले आहे.

शिर्डी नगरपंचायतीत विखे यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपाचे पूर्ण बहुमत आहे. गत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत साई निर्माण ग्रुपचे जगन्नाथ गोंदकर यांनी नगराध्यक्षपदावर आपली वर्णी लागावी, यासाठी शक्तिप्रदर्शन केले होते. मात्र, विखे यांनी अर्चनाताई कोते यांना नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर केले. जगन्नाथ गोंदकर व अशोक गोंदकर यांना सव्वा-सव्वा वर्षासाठी नगराध्यक्ष करण्याचा शब्द दिला होता. त्यावेळी विजय कोते यांनी आपल्या नगरसेवकांची समजूत काढल्याने त्यावेळचे बंड काही प्रमाणात शमले होते.

अर्चना कोते यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीला दोन वर्षाचा कालखंड उलटला तरी, यावर कुणी काही बोलायला तयार नाही. त्यामुळे आता अर्चना कोते यांचा राजीनामा घेऊन विखे पाटील यांनी दिलेला शब्द पूर्ण करून जगन्नाथ गोंदकर यांना नगराध्यक्ष करावे, यासाठी आता नगरसेवकांमध्ये जोरदार लॉबिंग सुरू झाली आहे. आमदार विखे यातून काय मार्ग काढतात? याकडेच आता शिर्डीकरांचे लक्ष लागले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.