ETV Bharat / state

Shasan Aaplya Dari : 'शासन आपल्या दारी' आणि विद्यार्थी वाऱ्यावरी! कार्यक्रमासाठी बसगाड्या सोडल्याने परीक्षा बुडल्या

author img

By

Published : Aug 17, 2023, 7:23 PM IST

Updated : Aug 17, 2023, 7:36 PM IST

अहमदनगर जिल्ह्यात अलीकडेच शिर्डी काकडी विमानतळ परिसरात 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम घेण्यात आला. येथे नागरिकांची गर्दी व्हावी यासाठी प्रशासनाने संगमनेर बस स्थानकातून 63 बसेस पाठवल्या. ज्यामुळे शाळकरी विद्यार्थांची गैरसोय झाली. या घटनेचा संगमनेर एनएसयुआयने तीव्र निषेध केला आहे. एसटी बस उपलब्ध नसल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षाही बुडल्या.

Shasan Aapya Dari program
विद्यार्थ्यांची गैरसोय

अहमदनगर : जिल्ह्यात सरकारच्या वतीने शिर्डी काकडी विमानतळ येथे झालेल्या 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाला नागरिकांची उपस्थिती व्हावी म्हणून प्रशासनाने पराकोटीचे प्रयत्न केले. एवढेच नाही तर शासनाने विद्यार्थ्यांची गैरसोय करत संगमनेर बस स्थानकातून 63 बसेस पाठवल्या. या घटनेचा संगमनेर एनएसयुआयने तीव्र निषेध केला आहे. ही कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी असल्याची टीका प्रदेश काँग्रेसचे सचिव सचिन गुंजाळ यांनी केली आहे.

Shasan Aapya Dari program
बससेवा बंद ठेवण्याविषयी आगार व्यवस्थापकाने लावलेला हाच तो फलक

नागरिकांना हजेरीची सक्ती : सध्या महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने शेतकरी व सर्वसामान्य माणूस हवालदिल झाला आहे. राजकारणात सत्तेसाठी होत असलेल्या तडजोडीवर सामान्य माणसाची तीव्र नाराजी आहे. हा कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्यात होत असल्याने या कार्यक्रमाला नागरिकांची उपस्थिती राहणार नाही, याची जाणीव सत्ताधारी व प्रशासनाला होती. कार्यक्रमाला जास्त गर्दी दिसावी, याकरता प्रशासनाने काकडी येथे झालेल्या 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमासाठी नागरिकांना हजेरीची सक्ती केली. जिल्ह्यातून नागरिकांची उपस्थिती राहावी, याकरता गावोगावी शासकीय कर्मचारी व ग्रामपंचायत सदस्यांना हजर ठेवण्याचे सक्त आदेश दिले गेले.


विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय : कार्यक्रमस्थळी नागरिकांना आणण्यासाठी सर्व बस स्थानकांमधून बसेस कार्यक्रमासाठी वापरल्या गेल्या. यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थी विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची मोठी गैरसोय झाली. याची पर्वा मात्र शासनाने किंवा प्रशासनाने केली नाही. संगमनेर बस स्थानकातून 63 बसेस कार्यक्रमासाठी देण्यात आल्या आणि बसस्थानक प्रशासनाने याबाबत फलक लावला की, आम्ही गाड्या या कार्यक्रमाला पाठवत आहोत. याबाबत ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी होती. बस उपलब्ध नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा बुडल्या.

'ही' तर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी : प्रशासनाच्या या बेजबाबदारपणाचा 'एनएसयुआय'चे अध्यक्ष गौरव डोंगरे, निखिल पापडेजा, शेखर सोसे, हैदर अली, वैष्णव मुर्तडक यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध केला. प्रदेश काँग्रेसचे सचिव सचिन गुंजाळ यांनी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होत असून या पैशांची कर्मचाऱ्यांकडून वसुली शासन करीत असल्याची खरमरीत टीका केली आहे. शासनाच्या एखाद्या कार्यक्रमासाठी ज्यादा बसेस सोडण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही सामान्य नागरिकांचे हित डावलून शासकीय कार्यक्रमस्थळी अतिरिक्त एसटी बसेस सोडण्यात आल्याचे समोर आले आहे, असेही सांगण्यात आले.

हेही वाचा:

  1. Shasan Aapya Dari : शासन आपल्या दारी अभियानांतर्गत पस्तीस लाख लाभार्थींना फायदा - मुख्यमंत्री
  2. Shashan Aaplya Dari : साताऱ्यात ‘शासन आपल्या दारी’ राज्यस्तरीय अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार शुभारंभ; फडणवीसांचीही उपस्थिती
  3. Shasan Aplya Dari : नांदेडमध्ये 25 जूनला येणार शासन आपल्या दारी; मुख्यमंत्र्यांची बैलगाडीने होणार एन्ट्री, देवेंद्र फडणवीसांची राहणार हजेरी
Last Updated :Aug 17, 2023, 7:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.