ETV Bharat / state

मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी अखेर निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडलं

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 25, 2023, 5:15 PM IST

Nilwande Dam
Nilwande Dam

Marathwada Water Issue : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास दारणा तसंच निळंवडे धरणातून 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेचा पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे.

निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग

अहमदनगर Marathwada Water Issue : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर काल रात्री नाशिक जिल्ह्यातील, दारणा तसंच अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणातून 100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. या धरणातून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आलं आहे. राहुरी तालुक्यातील मुळा तसंच अकोले तालुक्यातील भंडारदरा, निळवंडे धरणातून जवळपास साडेपाच टीएमसी पाणी जायकवाडीला सोडण्यात आलं आहे.

पाण्यासाठी पोलीस बंदोबस्त : अकोले तालुक्यातील निळवंडे धरणातून सध्या रात्रीच्यावेळी प्रवरा नदीपात्रात 100 क्युसेक पाणी सोडण्यात आलं आहे. यापुढं संगमनेर तालुक्यातील ओझर धरण ओलांडल्यानंतर हे पाणी प्रवरा नदीतून जायकवाडी धरणात पोहचणार आहे. सध्या पाटबंधारे विभागाकडून प्रवरा नदी पात्रातील बंधाऱ्याच्या पाट्या काढण्याचं काम सुरू आहे. जायकवाडीपर्यंत पाणी पोहोचण्यास कोणताही अडथळा येणार नाही. यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

मराठावड्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण : निळवंडे धरणातून जायकवाडीत सोडण्यात आलेलं पाणी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, नेवासा अशा पाच तालुक्यातून प्रवास करणार आहे. त्यानंतर हे पाणी नेवासा तालुक्यातील जायकवाडीच्या बॅक वॉटरला जावून मिळेल. साधारणतः 110 किलोमीटरचा प्रवास करत हे पाणी जायकवाडीला सुमारे 8 दिवसात पोहचण्याची शक्यता आहे. अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील धरणातून जायकवाडीला सोडण्यात आलेल्या पाण्यानं मराठावड्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनामध्ये नाराजी पसरली आहे.

मराठवाड्यात पाणी प्रश्न गंभीर : नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जायकवाडीत पाणी सोडण्यास विरोध केला होता. मात्र, मराठवाड्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी पाण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील कारखान्यांनी दाखल केलेली याचिका अखेर सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली होती. त्यानंतर महापालिकेनं नाशिकच्या जलसंपदा विभागाला पाणी सोडण्याचे आदेश दिले. मराठवाड्यात यंदा अपेक्षित पाऊस न झाल्यानं परिस्थिती गंभीर बनली आहे.

जायकवाडीत केवळ 5 टीएमसी पाणी पोहचणार : या पार्श्वभूमीवर समन्वित पाणी वाटप कायद्यांतर्गत अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील धरणांतून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत वरील धरणातून जायकवाडीसाठी 8.603 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील नाशिक, गंगापूर, गोदावरी-दारणा, मुळा, प्रवरा, निळवंडे या धरणांतून हे पाणी सोडण्यात येणार आहे. मात्र, 8.603 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला असला, तरी प्रत्यक्षात केवळ 5 टीएमसी पाणी जायकवाडी धरणात येणार आहे. त्यामुळं 35 टक्के पाणी वाया जाणार आहे. एकूण 5 टीएमसी पाणी आल्यावर जायकवाडी धरणाची पाणीपातळी 44 ते 45 टक्के वाढणार आहे.

हेही वाचा -

  1. पाणीप्रश्न पेटला! जायकवाडीला पाणी सोडल्यास जलसमाधी घेणार; अहमदनगरमधील शेतकरी आक्रमक
  2. ऐन हिवाळ्यात मराठवाड्यातील पाणीप्रश्न पेटला, हक्काच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचं 'रास्ता रोको' आंदोलन
  3. मराठवाड्यावर झालेला अन्याय दूर करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.