ETV Bharat / sports

U19 Women World Cup : भारतीय महिला संघाकडे इतिहास रचण्याची संधी, आज इंग्लंड विरुद्ध अंतिम सामना

author img

By

Published : Jan 29, 2023, 7:11 AM IST

U19 Women World Cup
अंडर 19 महिला टी20 विश्वचषक

कर्णधार शेफाली वर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाकडे इतिहास रचण्याची संधी आहे. आज दक्षिण आफ्रिकेच्या पॉचेफस्ट्रुम येथे पहिल्या अंडर-19 महिला टी20 विश्वचषकाचा अंतिम सामन्यात भारताची लढत इंग्लंडशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.15 वाजता हा सामना सुरु होणार आहे.

पोचेफस्ट्रूम : पहिला अंडर-19 महिला टी20 विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत खेळला जात आहे. दोन आठवड्यांच्या रोमांचक सामन्यांनंतर भारत अंतिम फेरीत पोहोचला आहे. रविवारी (२९ जानेवारी) विजेतेपदाच्या लढतीत भारतीय संघाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. रविवारी पॉचेफस्ट्रुम येथील जेबी मार्क्स ओव्हल येथे हा सामना रंगणार आहे. रविवारी भारताकडे महिला क्रिकेटच्या इतिहासातील पहिली विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.

भारत इतिहास घडवू शकतो : भारतीय अंडर-19 महिला संघासाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. आज शेफाली वर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडे इतिहास रचण्याची आणि देशासाठी पहिला विश्वचषक जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. कर्णधार शेफाली वर्मा रविवारी पॉचेफस्ट्रूम येथे प्रथमच आयसीसी अंडर 19 महिला टी20 विश्वचषक फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताचे नेतृत्व करणार आहे. सुपर सिक्समध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव वगळता इंग्लंडने अद्याप एकही सामना गमावलेला नाही. त्यांनी दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर तीन धावांनी केलेल्या अविश्वसनीय विजय मिळवला होता. या विजयाने इंग्लंड संघाने दाखवून दिले की ते मैदानावरील खडतर परिस्थितीतही दबाव हाताळू शकतात आणि संयम राखू शकतात.

दोन्ही संघांकडे दर्जेदार खेळाडू : भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांकडे उपकर्णधार श्वेता सेहरावत आणि कर्णधार ग्रेस स्क्रिव्हन्सच्या रूपाने मजबूत सलामीवीर आहेत. श्वेता फलंदाजांमध्ये भारताची मुख्य आधारस्तंभ आहे. तिने आपल्या स्ट्रोक प्लेने सर्वांना प्रभावित केले आहे. तिने या विश्वचषकात 115.50 च्या सरासरीने 231 धावा केल्या आहेत आणि ती स्पर्धेत फक्त दोनदा बाद झाली आहे. दुसरीकडे ग्रेसने बॅटिंगमध्ये सातत्य राखले आहे. ती 53.80 च्या सरासरीने 269 धावा करत स्पर्धेत सर्वाधिक धावा करणऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. तसेच तिने तिच्या ऑफ स्पिनच्या बळावर 7.16 च्या इकॉनॉमीने 6 विकेट्स घेतल्या आहेत. पार्श्वी चोप्रा आणि हॅना बेकर यांच्या रूपाने भारत आणि इंग्लंडकडे दर्जेदार लेगस्पिनर आहेत जे फलंदाजांना ब्रेक लावू शकतात.

शेफाली वर्मा कडून अपेक्षा : अष्टपैलू रायना मॅकडोनाल्ड-गेच्या नेतृत्वाखालील इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांना अडचणीत आणण्यासाठी भारताला कर्णधार शेफाली वर्माच्या जलद खेळीची देखील आवश्यकता असेल. गतवर्षी रायनाने इंग्लंड सिलेक्ट इलेव्हनकडून सीनियर भारतीय संघाविरुद्ध खेळताना 6 बळी घेतले होते. तिने त्यावेळी शेफालीलाही बाद केले होते. महिला विश्वचषक स्पर्धेतील उद्घाटन विजेते होण्याचे लक्ष्य इंग्लंडचे असेल, तर भारत महिला क्रिकेटमध्ये त्यांचे पहिले विश्वविजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल.

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे : भारत : शेफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत (उपकर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), जी त्रिशा, सौम्या तिवारी, सोनिया मेहदिया, एस यशश्री, हर्षिता बसू (विकेट कीपर), सोनम यादव, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पार्श्वी चोप्रा, तीतस साधू, फलक नाझ आणि शबनम एमडी. इंग्लंड : एली अँडरसन, हॅना बेकर, जोसी ग्रोव्ह्स, लिबर्टी हीप, नियाम हॉलंड, रायना मॅकडोनाल्ड-गे, एम्मा मार्लो, चॅरिस पॉवेली, डेविना पेरिन, लिझी स्कॉट, ग्रेस स्क्रिव्हन्स (सी), सोफिया स्मेल, सेरेन स्मेल, अलेक्सा स्टोनहाउस आणि मॅडी वॉर्ड.

हेही वाचा : IND vs AUS 1st Test : या दिवसापासून मिळतील पहिल्या टेस्टचे तिकीटे; जाणून घ्या किंमत, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी शेड्यूल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.