ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : असाही दुर्विलास! एकेकाळच्या विश्वविजेता कर्णधाराला सामना पाहण्यासाठी घ्यावी लागेल तुरुंग अधिकाऱ्यांची परवानगी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2023, 2:43 PM IST

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023

Cricket World Cup : ५ ऑक्टोबरपासून भारतात क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. योगायोगानं याच दिवशी पाकिस्तानचे एकमेव विश्वचषक विजेते कर्णधार इम्रान खान यांचा वाढदिवसही आहे. मात्र त्या दिवशी ते टीव्ही स्टुडिओमध्ये बसून क्रिकेटवर बोलण्याऐवजी तुरुंगात सामना पाहण्यासाठी परवानगी मिळण्याची वाट पाहत असतील. वाचा ईटीव्ही भारतचे खुर्शीद वाणी यांचा हा खास रिपोर्ट..

मुंबई Cricket World Cup : जगभरातील क्रिकेटप्रेमी ५ ऑक्टोबरची आतुरतेनं वाट पाहत आहेत. याला कारणही तसंच आहे. या दिवशी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यानं विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होईल.

५ ऑक्टोबरला इम्रान खान यांचा वाढदिवस : मात्र काही हाडाच्या क्रिकेटप्रेमींना ही तारीख आणखी एका कारणामुळे लक्षात असेल. याच दिवशी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तानचे एकमेव विश्वविजेते कर्णधार इम्रान खान यांचा वाढदिवस आहे. ५ ऑक्टोबरला ते ७१ वर्षांचे होतील. विडंबना अशी आहे की, या दिवशी ते टीव्ही स्टुडिओमध्ये बसून क्रिकेटवर गप्पा मारण्याऐवजी रावळपिंडी येथील तुरुंगात बसून सामना पाहण्यासाठी परवानगी मिळण्याची वाट पाहत असतील!

इम्रान खान सध्या तुरुंगात आहेत : दिग्गज क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या नेतृत्वात पाकिस्ताननं १९९२ चा क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. हा या देशानं जिंकलेला आत्तापर्यंतचा एकमेव विश्वचषक. इम्रान खान यांना २७ सप्टेंबर रोजी अटॉक येथून अदियाला तुरुंगात हलवण्यात आलं. ५ ऑगस्ट रोजी अटक झाल्यानंतर त्यांनी तेथे काही आठवडे घालवले होते. इम्रान खान यांच्यावर ऑगस्ट २०१८ ते मार्च २०२२ या कालावधीत पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून मिळालेल्या भेटवस्तूंच्या विक्रीतून कमावलेल्या पैशांची अफरातफर करण्याचा आरोप आहे. या प्रकरणात ते सध्या तुरुंगाची हवा खात आहेत.

इम्रान खान यांना मुभा मिळण्याची शक्यता नाही : साधारणपणे, पाकिस्तानात सत्ता कोणाचीही असो, देशावर राज्य तेथील सैन्यचं करतं. सुरवातीला इम्रान खान यांना पाकिस्तानी सैन्याचा पूर्ण पाठिंबा होता. मात्र कालांतरानं ते सैन्याचे कट्टर शत्रू बनले. त्यामुळे या विश्वचषकादरम्यान त्यांना कोणतीही मुभा मिळण्याची सुतरामही शक्यता नाही. त्यातच पाकिस्तानमधील सत्तेनं इम्रान खान यांचं नाव वापरण्याविरोधात देशातील माध्यमांना सक्त आदेश जारी केले आहेत.

क्रिकेट प्रवासाच्या व्हिडिओतून वगळलं : या आदेशाचा असा प्रभाव आहे की, देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (पीसीबी) देशाच्या क्रिकेट प्रवासाची आठवण म्हणून एक व्हिडिओ जारी केला होता. मात्र या व्हिडिओतून इम्रान खान यांची १९९२ च्या विश्वचषक विजयाची दृश्यं वगळण्यात आली. त्यानंतर दिग्गज वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याच्यासह मोठ्या संख्येनं चाहत्यांनी याचा निषेध केल्यानं पीसीबीला यात सुधारणा करणं भाग पडलं. इतकं सर्व होऊनही इम्रान खान यांची वर्ल्डकपची क्रिस्टल बॉल ट्रॉफी उचलणारी प्रतिमा कधीच पुसली जाणार नाही.

कारकिर्दीच्या शिखरावर निवृत्तीची घोषणा : १९८७ मध्ये विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीच्या पुढे जाण्यात अपयशी ठरल्यानंतर इम्रान खान यांनी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. विशेष म्हणजे, तेव्हा ते त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर होते. मात्र तत्कालीन लष्करी शासक जनरल झिया-उल-हक यांनी एका जाहीर सभेत त्यांना त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास प्रवृत्त केलं. अखेरीस इम्रान खान यांनी आपला निर्णय बदलला आणि त्यानंतर जे घडलं ते ऐतिहासिक होतं. झिया-उल-हक यांनी क्रिकेटप्रेमी नवाझ शरीफ यांनाही राजकारणात येण्यास प्रवृत्त केलं. ऑगस्ट १९८८ मध्ये एका गूढ विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्यानंतर इम्रान खान राजकारणात आले. राजकारणातील त्यांचा दर्जा त्यांच्या चॅम्पियन प्रतिमेमुळे आणखी वाढला.

इम्रान खान यांच्या क्रिकेट कारकिर्दीतले काही महत्त्वाचे टप्पे :

  • पदार्पण - इम्रान खाननं ३ जून १९७१ रोजी एजबॅस्टन येथं इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
  • कोणकोणत्या संघांचं प्रतिनिधित्व केलं : पाकिस्तान, दाऊद क्लब लाहोर, न्यू साउथ वेल्स, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स, ससेक्स, वूस्टरशायर
  • शेवटचा सामना : विरुद्ध श्रीलंका, फैसलाबाद २ जानेवारी १९९२
  • एकदिवसीय पदार्पण : नॉटिंगहॅम येथे इंग्लंड विरुद्ध, ३१ ऑगस्ट १९७४
  • शेवटचा सामना : मेलबर्न येथे इंग्लंड विरुद्ध, २५ मार्च १९९२

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 : विश्वचषकात कोणत्या संघाचं पारडं जड? कोणता खेळाडू ठरू शकतो 'ट्रम्प कार्ड'? जाणून घ्या प्रत्येक संघाबद्दल सविस्तरपणे
  2. Cricket World Cup : १९७५ पासून २०१९ विश्वचषकातील कामगिरी; प्रत्येक विश्वचषकात टीम इंडियाची कामगिरी कशी होती? जाणून घ्या सोप्या शब्दात
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.