ETV Bharat / opinion

Asian Games २०२३ : ...तर भारतही चीन, जपानप्रमाणे ढिगानं पदकं जिंकेल, मात्र...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 9, 2023, 5:46 PM IST

Asian Games २०२३
Asian Games २०२३

Asian Games २०२३ : यावर्षीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं चौथं स्थान पटकावलं. चीन, जपान आणि द. कोरियानंतर भारताचा क्रमांक लागतो. या स्पर्धेतील भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतरही अनेक प्रश्न विचारले जात आहेत. लोकांना हे जाणून घ्यायचं आहे की भारत हा चीन किंवा जपानसारखी पदकं का जिंकू शकत नाही? भारतातील पायाभूत क्रीडा सुविधा या देशांप्रमाणे नाहीत का? वाचा 'ईनाडू'चा हा संपादकीय लेख..

हैदराबाद Asian Games २०२३ : चीनमधील हांगझोऊ शहरात आशियाई क्रीडा स्पर्धा नुकतीच झाली. गेल्या ७२ वर्षांपासून आशियाई क्रीडा स्पर्धेच्या भव्य आयोजनाची परंपरा चीननं यंदाही कायम राखली. ही आशियाई स्पर्धा भारतासाठी अनेक अर्थांनी उल्लेखनीय होती. यंदाच्या स्पर्धेत भारतानं आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. भारतानं एकूण १०७ पदकं जिंकली. यामध्ये २८ सुवर्णपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर राहिला.

भारताचं मोठं यश : पदकतालिकेत चीन पहिल्या, जपान दुसऱ्या आणि दक्षिण कोरिया तिसऱ्या स्थानी होता. भारताच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ही मोठी उपलब्धी आहे. आपण आपल्या मागील रेकॉर्डपेक्षा खूप चांगली कामगिरी केली. २०१८ मध्ये इंडोनेशियातील जकार्ता येथे आशियाई क्रीडा स्पर्धा पार पडल्या होत्या. या स्पर्धेत भारतानं एकूण ७० पदकं जिंकली होती. साहजिकच या कामगिरीचं श्रेय त्या खेळाडूंना जातं, ज्यांनी कठीण आव्हानांना तोंड देत देशाला गौरव मिळवून दिला. हा त्यांच्या जिद्द आणि समर्पणाचा विजय आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताची कामगिरी : भारतानं १९५१ साली आशियाई क्रीडा स्पर्धेत पदार्पण केलं. या स्पर्धेत भारताला दुसरं स्थान मिळालं होतं. १९६२ च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं तिसरं स्थान पटकावलं. यंदा भारतानं चौथं स्थान मिळवत शंभरहून अधिक पदकं कमावले. यामध्ये भारतीय तिरंदाज ज्योती आणि ओजस प्रवीण यांचं विशेष योगदान होतं. दोघांनी प्रत्येकी तीन सुवर्णपदकं जिंकली. हे त्यांच्या प्रतिभा आणि समर्पणाचे परिणाम आहेत.

खेळाडूंनी मर्यादित साधनांमध्ये यश संपादन केलं : याशिवाय सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांनी बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचला. तिरंदाजी, कबड्डी, क्रिकेट, बॅडमिंटन, नेमबाजी, अ‍ॅथलेटिक्स आणि इतर खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी सर्वोच्च सांघिक भावना, शिस्त आणि विजयाची धगधग दाखवली. या खेळाडूंनी मर्यादित साधनांमध्ये हे यश संपादन केलं हेही येथे नमूद करणं गरजेचं आहे. देशांतर्गत स्तरावर खेळाडूंना किती सुविधा दिल्या जातात, हे कोणापासूनच लपून राहिलेलं नाही.

इतर देशांच्या तुलनेत भारताची कामगिरी : २०१८ मध्ये जकार्ता येथे चीननं २८९ पदकं जिंकली होती, ज्यात १३२ सुवर्णांचा समावेश होता. हांगझोऊमध्येही चीननं २०१ सुवर्ण पदकांसह ३८३ पदकं जिंकली. आम्ही हे तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगतो. जपानची लोकसंख्या १२ कोटी आहे. तर बिहारची लोकसंख्या १३ कोटी आहे. जपाननं ५२ सुवर्ण पदकांसह १८८ पदकं जिंकली. त्याच प्रकारे सुमारे पाच कोटी लोकसंख्या असलेल्या दक्षिण कोरियानं ४२ सुवर्ण पदकांसह १९० पदकं जिंकली. ओडिशाची लोकसंख्या पाच कोटी आहे. अशाप्रकारे तुम्ही या यशाची स्वतः तुलना करू शकता.

चीन पदकतालिकेत अव्वल का राहतो : १९८२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेपासून चीनचं वर्चस्व कायम आहे. भारतानं १९८२ मध्ये आशियाई खेळांचं आयोजन केलं होतं. त्या आधी भारतानं १९५१ मध्ये यजमानपद भूषवलं होतं. चीननं इतकं मोठं यश काही सहज मिळवलं नाही. त्यांनी यासाठी मोठी गुंतवणूक केली आहे. चीननं यासाठी संपूर्ण इको सिस्टीम तयार केली. देशभरात व्यायामशाळा उघडण्यात आल्या. तेथे बालकांची पौगंडावस्थेपासूनच प्रतिभा ओळखली जाते, आणि त्यांचं पालनपोषण केलं जातं. पदकतालिकेत अव्वल राहण्यामागं चीनचं अथक परिश्रम आणि उत्तम नियोजन दडलं आहे. जपानमध्येही लहान वयातच मुलांना खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. प्रत्येक शाळेत खेळासाठी पायाभूत सुविधा आहेत. तसेच विविध ठिकाणी प्रशिक्षण केंद्रं सुरू आहेत. येथील मुलांना लहान वयातच बेसबॉल, गोल्फ, मोटार स्पोर्ट्स आणि टेनिस खेळायला मिळतात. त्यानंतर त्यांची आवड लक्षात घेऊन प्रशिक्षण दिलं जातं.

द. कोरियाची पद्धत : द. कोरियाची पद्धत थोडी वेगळी आहे. चीनचं मॉडेल त्यांनी आपल्या पद्धतीनं राबवलंय. येथे खेळात रस असणाऱ्यांना किशोरवयातच शास्त्रोक्त प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर त्यांना त्या खेळासाठी तयार केलं जातं. येथे प्रत्येक पुरुषानं २८ वर्षांचा होईपर्यंत सैन्यात दीड वर्ष योगदान देणं बंधनकारक आहे. मात्र, आशियाई किंवा ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणाऱ्यांना यापासून सूट दिली जाते. त्यांना वेगळं प्रोत्साहनही मिळतं. संपूर्ण जगात क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम सुविधा कोरियामध्ये दिल्या जातात.

...तर भारताच्या पदकांची संख्या वाढेल : या यशोगाथांमधून असं दिसून येतं की, हे सर्व देश मजबूत पायाभूत क्रीडा सुविधा निर्माण करण्यावर भर देतात. त्यांना समजलंय की खेळामध्ये आत्मविश्वास खूप मोठी भूमिका बजावतो. तसेच हे देशाच्या विकासात देखील प्रतिबिंबित होतं. या दृष्टिकोनामुळे त्यांचं जगभरात कौतुक होत आहे. भारताकडूनही अशाच यशाची अपेक्षा असेल, तर आपल्याला येथेही पायाभूत सुविधांचा विकास करावा लागेल. खेळाडूंना प्रत्येक राज्यात सुविधा आणि प्रोत्साहन द्यावं लागेल. तसेच टॅलेंट ओळखावं लागेल आणि ते कामी आणण्याची व्यवस्था करावी लागेल. एवढ्या मोठ्या देशात प्रतिभेची कमतरता नाही, गरज आहे ती ओळखून त्याला संस्थात्मक आधार देण्याची. अशा सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे पदकांची संख्या तर वाढेलच, शिवाय एकूणच देशात क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल.

हेही वाचा :

  1. Asian Games २०२३ : रँकीरेड्डी-शेट्टी जोडीची ऐतिहासिक कामगिरी, आशियाई गेम्समध्ये जिंकलं पहिलं सुवर्णपदक
  2. Asian Games २०२३ : चक दे इंडिया! आशियाई स्पर्धेत भारताची सुवर्ण कामगिरी, अंतिम सामन्यात जपानचा धुव्वा उडवला
  3. Cricket World Cup 2023 : लहानपणी अभ्यासाऐवजी केली क्रिकेटची निवड, आज विश्वचषक संघातील महत्वाचा खेळाडू आहे इशान किशन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.