ETV Bharat / entertainment

Ashok Saraf 76th birthday : मराठी नायकांचा चेहरा मोहरा बदलून टाकणारा सुपरस्टार, अशोक सराफ यांचा 76वा वाढदिवस...

author img

By

Published : Jun 4, 2023, 11:31 AM IST

अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि विनोदीपटांचा काळ सुरू झाला. विनोदाचे बेफाट टायमिंग असलेला असा नट होणे नाही.अशा नटाचा आज 76वा वाढदिवस, त्यानिमित्ताने जाणून घ्या त्यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास...

Ashok Saraf 76th birthday
अशोक सराफ यांचा 76वा वाढदिवस

मुंबई : भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या थोडे दिवस अगोदर एका हरहुन्नरी कलाकाराने जन्म घेतला होता. ४ जून १९४७ साली अशोक सराफ यांचा जन्म झाला आणि १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. हा एक योगायोग असेल परंतु अशोक सराफ यांनी पुढे अनेकांना स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांनी जेव्हा मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला तेव्हा चित्रपटसृष्टी अश्रूंच्या तडाख्यात सापडलेली होती. त्या काळी सामाजिक चित्रपटांना मागणी होती परंतु अशोक सराफ यांच्या कसदार विनोदाने अश्रूंची सद्दी संपली व हास्याला वाट मिळाली.

विनोदी चित्रपटांना स्वातंत्र्य मिळाले. अशोक सराफ अभिनित अनेक विनोदी चित्रपटांनी प्रेक्षकांना रडवणाऱ्या, पाटील आणि त्याचा जाच सारख्या चित्रपटांपासून मुक्त केले. विनोदीपटांचा काळ सुरू झाला. लक्ष्मीकांत बेर्डे याने एकदा सांगितले होते की, जर का अशोक सराफ सिनेमात हिरो म्हणून आले नसते तर मला मराठी चित्रपटांमध्ये कधीच कोणी घेतले नसते. तेही खरे आहे कारण सत्तर ऐंशी पर्यंत मराठी चित्रपटांमध्ये नायक देखणे असायचे आणि विनोदी नट तोंडी लावायला असणाऱ्या लोणच्यासारखा असायचा. परंतु जेव्हा देखणा नसलेला चेहरा घेऊन अशोक सराफ मुख्य भूमिकांत काम करू लागले तेव्हा मराठी चित्रपटांना 'त्या' न्यूनगंडातून स्वातंत्र्य मिळाले.


आंतर बँक नाट्यस्पर्धा : खरंतर अशोक सराफ स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये कामाला होते. त्याकाळी बँकांमध्ये स्पोर्ट्स कोटा, कल्चरल कोटा वगैरे असायचे व त्यातून त्या त्या खेळाडूंना अथवा कलाकारांना नोकरी मिळत असे. अशोक सराफ स्टेट बँक तर्फे नाटक स्पर्धांतून काम करीत असत. त्याकाळी आंतर बँक नाट्यस्पर्धा खूप मानाची समजली जायची. त्यातून अनेक बँकांमधील अनेक उत्तम कलाकार मनोरंजन सृष्टीला लाभले आहेत. अमोल पालेकर, रीमा लागू, विवेक लागू, रमेश पवार, राजा गावडे, सुहास पळशीकर, मंगेश कुलकर्णी, प्रदीप पटवर्धन आणि अनेक उमदे कलाकार उदयास आले. त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे अशोक सराफ.

अशोक सराफ यांच्या जीवनातील टर्निंग पॉइंट : एके वर्षी आंतरबँक नाट्यस्पर्धेमध्ये अशोक सराफ आणि रमेश पवार अभिनित 'म्ह्या' नावाची एकांकिका सादर केली होती. बेफाट विनोदी एकांकिका होती आणि ती बघण्यासाठी साहित्य संघ सभागृहात मुंगी शिरायलाही जागा नव्हती. सतत हशे आणि टाळ्या पडत होत्या. त्या दिवशी 'अ स्टार वॉज बॉर्न'. अशोक सराफ यांच्या जीवनातील तो एक टर्निंग पॉइंट होता. काही दिवसांपूर्वी आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांची अशोक सराफ यांच्यासोबत एका फिल्म पार्टीत भेट घडली होती. त्यांना त्यांची म्ह्या बघितली होती असे सांगितल्यावर ते त्यांना म्हणाले होते की, ज्यांनी म्ह्या एकांकिकेचा ओरोजिनल शो पाहिला आहे ते खूप लकी आहेत. तो एकमेकाद्वितीय प्रयोग होता आणि तसा पुढे कधीच झाला नाही. ज्यांनी माझी म्ह्या एकांकिका पाहिलीय त्यांना मी सॅल्यूट करतो. त्यांनी कीर्तिकुमार यांना भर पार्टीत चक्क सॅल्यूट केला.


गेली पाच दशके प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन : त्यानंतर त्यांना उत्तमोत्तम व्यावसायिक नाटके, सिनेमे मिळू लागले. महत्त्वाचे म्हणजे विनोदाचा बादशाह समजल्या जाणाऱ्या दादा कोंडके यांनी त्यांना आपला सिनेमा पांडू हवालदार मध्ये महत्त्वपूर्ण रोल दिला. ही अशोक सराफ यांच्या विनोदी अभिनयाला मिळालेली पावती होती. मराठी आणि हिंदीतही अशोक सराफ यांनी मालिका आणि सिनेमे केले. हम पांच सारख्या हिंदी मालिकेच्या भन्नाट यशाचे श्रेय बरेचशे अशोक सराफ यांना जाते. गेली पाच दशके प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करीत अशोक सराफ यांनी वयाची पंचाहत्तरी गाठलीय परंतु हा अवलिया कलाकार अजूनही प्रेक्षकांना चित्रपट आणि नाटकांतून मनोरंजित करतोय. सध्या त्यांचे निर्मिती सावंत यांच्यासोबतचे ‘व्हॅक्युम क्लिनर' हे नाटक रंगभूमीवर गर्दी खेचतेय.


फिल्मफेअर मराठी बेस्ट ॲक्टर : सिंघम, जोडी नं १, खुबसुरत, येस बॉस, करण अर्जुन, इत्तेफाक, गुप्त, कोयला, प्यार किया तो डरना क्या, एक डाव भुताचा, धूम धडाका, माझा पती करोडपती, इजा बिजा तिजा, चौकट राजा, लपंडाव, साडे माडे तीन, मी शिवाजी पार्क सारख्या अनेक मराठी व हिंदी सिनेमांतून त्यांनी बहुढंगी भूमिका साकारल्या आहेत. नुकताच सुपरहिट ठरलेल्या वेड मधील त्यांची रितेश देशमुख च्या वडिलांची भूमिका खूप भाव खाऊन गेली. राम राम गंगाराम, गोंधळात गोंधळ, गोष्ट धमाल नाम्याची, सूना येती घरा या चित्रपटांतील भूमिकांसाठी अशोक सराफ यांना फिल्मफेअर मराठी बेस्ट ॲक्टर च्या ट्रॉफीज मिळालेल्या आहेत. तसेच पांडू हवालदार साठी महाराष्ट्र शासनाचा खास पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. इतरही अनेक पुरस्कार त्याच्या नावे आहेत. पंचाहत्तरीतही थक्क करणाऱ्या ऊर्जेचा मालक आणि अद्वितीय अभिनेता अशोक सराफ यांना ईटीव्ही भारत मराठीच्या परिवाराकडून ७६व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

हेही वाचा :

  1. Box office collection : विक्की आणि साराची प्रेक्षकांना पसंत पडणार का? पहा 'जरा हटके जरा बचके' बॉक्स ऑफिस कलेक्शन
  2. Vicky Kaushal dedicates song : विक्की कौशलने पत्नी कॅटरिना कैफला इंस्टाग्राम स्टोरीवर एक गाणे केले समर्पित
  3. Kriti Sanon News : क्रिती सॅननने डिस्कोला मारली मिठी, चाहते म्हणाले..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.