ETV Bharat / entertainment

EXCLUSIVE INTERVIEW अनुराग कश्यपच्या दोबारामध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या पवेल गुलाटीशी खास बातचित

author img

By

Published : Aug 19, 2022, 9:46 AM IST

पवेल गुलाटी
पवेल गुलाटी

पवेल गुलाटीने दिल्लीत थिएटर केले आहे. त्याने अभिनयाचे धडे नासिरुद्दीन शाह यांच्या हाताखाली गिरविले आहेत. गेली १३ वर्षे तो चांगल्या भूमिकेच्या शोधात होता आणि अनुभव सिन्हा दिग्दर्शित आणि तापसी पन्नू अभिनित थप्पडमध्ये त्याची निवड झाल्यावर त्याने खूप मेहनत घेत आपली भूमिका साकारली. त्याचा दोबारा हा चित्रपट येऊ घातलाय आणि त्यानिमित्त त्याने आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांच्यासोबत संवाद साधला.

मुंबई - बॉलिवूडमध्ये दरररोज शेकडो उत्साही तरुण तरुणी आपले नशीब आजमावयाला मुंबईत येत असतात. त्यातील खूपजण नुसते ग्लॅमरला भाळून आलेले असतात. फारच कमीजण रीतसर मूलभूत प्रशिक्षण घेऊन आलेले असतात ज्यात नाटकांतून काम करणे, कोणाला दिग्दर्शन साहाय्य करणे किंवा एकंदरीत अभिनय कशाही खातात याची जाणीव असणे, यामध्ये हे लोक मोडतात. सामान्य शाहरुख खान जेव्हा बॉलिवूडचा ‘बादशाह’ शाहरुख खान बनला त्यानंतर मुंबईत हिरो बनायला येणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली हे सत्य आहे. परंतु शिकून आलेले अभिनेते कमी असतात आणि त्यात आहे पवेल गुलाटी. परंतु तोदेखील म्हणतो की शाहरुख खान मुळेच मी मुंबईत आलो. त्याने दिल्लीत थिएटर केले आहे. त्याने अभिनयाचे धडे नासिरुद्दीन शाह यांच्या हाताखाली गिरविले आहेत. गेली १३ वर्षे तो चांगल्या भूमिकेच्या शोधात होता आणि अनुभव सिन्हा दिग्दर्शित आणि तापसी पन्नू अभिनित थप्पडमध्ये त्याची निवड झाल्यावर त्याने खूप मेहनत घेत आपली भूमिका साकारली. त्याचा ‘दोबारा’ हा चित्रपट येऊ घातलाय आणि त्यानिमित्त त्याने आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांच्यासोबत संवाद साधला.

पवेल गुलाटी आणि तापसी पन्नू यांची मैत्री आहे आणि तापसी माझी सारखी ‘खेचत’ असते अशी गोड तक्रार तो करतो. ‘तापसी तुझी फेवरीट आहे असं वाटतं कारण ‘थप्पड’ आणि ‘दोबारा’ मध्ये पुन्हा एकदा तुम्ही एकत्र आहोत’, यावर बोलताना पवेलने सांगितले की, “ती माझी फेवरीट आहेच परंतु मी सुद्धा तिचा फेवरीट आहे. आमचे छान ट्युनिंग जुळले आहे. खरं सांगायचं तर आमची छान दोस्ती झाली आहे. आम्ही दोघेही दिल्लीवाले आहोत. आम्ही दोघेही प्रामाणिक आहोत. आमची बॅकग्राऊंड सारखी आहे. आम्ही दोघेही मध्यमवर्गीय कुटुंबांतून आलो आहोत. आम्ही आपापल्या कुटुंबियांबद्दल बऱ्याच गोष्टी एकमेकांसोबत शेअर करतो. दोघांनाही करियरमध्ये स्ट्रगल करावा लागला आहे. तुम्ही जेव्हा शूटिंग करता तेव्हा तुमची अनेकांशी दोस्ती होते, पण ती ठराविक काळापुरती असते. परंतु मी ईश्वराचे धन्यवाद मानतो की तापसी आणि माझी दोस्ती कायम राहिली. मी अनेक गोष्टींमध्ये तिचा सल्ला घेतो. एव्हडं सगळं असलं तरी ती माझी ‘फिरकी’ घेते हे मला फारसं रुचत नाही.’

ईटीव्ही भारत प्रतिनिधी कीर्तिकुमार कदमसोबत पवेल गुलाटी
ईटीव्ही भारत प्रतिनिधी कीर्तिकुमार कदमसोबत पवेल गुलाटी

पवेल तापसी बाबत पुढे म्हणाला की, “तापसी कित्येक जणांसाठी रोल मॉडेल आहे. मला तर असं वाटतं की विद्या बालन, कंगना रानौत, दीपिका पदुकोण व आणखी काही बाहेरून येऊन इथे बस्तान बसविलेल्या हिरॉइन्स मध्ये तापसीचे नाव जोडले गेलेय. तिने एक वेगळी वाट चोखाळत इथपर्यंत मजल मारलीय. तिने आतापर्यंत ग्लॅमरवजा भूमिकाही ताकतीने वठविल्या आहेत. ती नक्कीच मला इन्स्पायर करते. तिने अनेक भूमिकांसाठी तगडी शारीरिक मेहनतही घेतलीय भूमिका सशक्तपणे साकारण्यासाठी. तिच्या स्ट्रगल वेळी तिला मार्ग दाखविणारं कोणी नव्हतं त्यामुळेच ती नवीन कलाकारांसाठी मदत करण्यासाठी नेहमी तयार असते. मी स्वतः तिच्यासोबत खूपकाही शेयर करतो. माझे इतरही फ्रेंड्स आहेत परंतु तापसी सोबतचा बॉण्ड नक्कीच स्पेशल आहे. थप्पड ने मला यश चाखायला दिलं परंतु मला अजूनही महत्वाची गोष्ट मिळाली, ती म्हणजे तापसी पन्नूची फ्रेंडशिप.”

दोबाराची भूमिका त्याच्यापर्यंत कशी पोहोचली हे सांगताना पवेल गुलाटी म्हणाला, “मला एक फोन आला. तो होता अनुराग कश्यप सरांचा. त्यांनी मला सांगितलं की मी या या ठिकाणी शूटिंग करीत आहे तर तू रात्री २ वाजता सेटवर येऊन भेट. मला धाकधूक होती की त्यांनी मला कशाला बोलावलंय म्हणून. मी ठरल्या वेळी ठरल्या ठिकाणच्या सेटवर पोहोचलो. त्यांनी मला व्हॅनिटी व्हॅन मध्ये बोलावलं आणि माझ्या हातात एक स्क्रिप्ट दिली. त्यांनी सांगितलं की त्यांनी माझ्या एका शोचा एक एपिसोड बघितला आणि त्यांना माझं काम आवडलं. अनुराग सर म्हणाले, ‘मी एक चित्रपट बनवतोय. हे स्क्रिप्ट आहे. त्यात तापसी पन्नू आहे. आणि तुझा असा असा रोल आहे. आणि तू हा चित्रपट करतोयस’. गेली १३ वर्ष मी जे शब्द ऐकण्यासाठी उत्सुक होतो ते शब्द चक्क अनुराग कश्यप यांच्या तोंडून निघाल्यामुळे मला १६ डिग्री एसी मध्ये घाम फुटला. मी मनात विचार करीत होतो की रोल काय असेल तर मनकवड्या सारखे अनुराग सर म्हणाले, ‘लीड रोल आहे’. मी तर चक्कर येऊन पडण्याच्या मनस्थितीत होतो. आणि हो महत्वाचं म्हणजे मला त्यांनी दोबारा साठी कास्ट केलं ते थप्पड प्रदर्शित होण्याच्या सहा महिने आधी.”

दोबारामध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या पवेल गुलाटीशी खास बातचित
दोबारामध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या पवेल गुलाटीशी खास बातचित

पवेलने खूप आधी ‘युद्ध’ नावाच्या शोमध्ये अमिताभ बच्चन सोबत काम केले होते. त्यांच्यासोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना तो म्हणाला, “अरे, आता मी त्यांच्यासोबत एक पिक्चर करतोय. ‘गुडबाय’. त्यात मी अमिताभ सरांच्या मुलाचा रोल करतोय. युद्ध करताना मी बऱ्यापैकी नर्व्हस होतो परंतु आता कम्फर्ट झोन आलाय. अमिताभ बच्चन म्हणजे अभिनयाची युनिव्हर्सिटी आहे. त्यांची एनर्जी इतकी जबरदस्त आहे की ती माझ्यासारख्या युवा अभिनेत्याला लाजवते. त्यांचा स्वभाव एखाद्या खोडकर मुलासारखा आहे. त्यांच्यासाठी वय हा केवळ आकडा आहे. त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा बरेच काही शिकवून जाते. या वयातही त्यांची एक अभिनेता म्हणून भूक खूप मोठी आहे. ते केबीसी करतात, ते जाहिरातींच्या शूटसाठी बिझी असतात, ते रोज ट्विट करतात, ते संगीत ऐकतात आणि आम्हाला ऐकवतात, सेटवर अथक रिहर्सल करतात आणि न कंटाळता शुटिंगही करतात, ते अनेक शोज बघतात आणि इतक्या साऱ्या गोष्टी एकाचवेळी करीत असतात. त्यामुळे माझ्यामते अमिताभ बच्चन यांच्या घडाळ्यात २४ ऐवजी ३६ तास असावेत. मी तर म्हणतो की ते एकदम ‘आजचे’ अभिनेते आहेत आणि नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे.”

कोणता बायोपिक करायला आवडेल असे विचारल्यावर पवेल म्हणाला, “मला नं जगजीत सिंग यांचा बायोपिक करायचा आहे. मला गायला येत नाही परंतु शिकायला तयार आहे.” एकता कपूर निर्मित, अनुराग कश्यप दिग्दर्शित, तापसी पन्नू आणि पवेल गुलाटी अभिनित ‘दोबारा’ शुक्रवारी १९ ऑगस्ट ला प्रदर्शित होतोय.

हेही वाचा - Nitin Gadkari Meet Amitabh Bacchan नितीन गडकरींनी अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानी घेतली भेट, या विषयावर मागितले समर्थन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.