ETV Bharat / city

मुंबईतील पूर जोखीम व उपाययोजना संदर्भात उद्यापासून दोन दिवसीय कार्यशाळा

author img

By

Published : Apr 27, 2022, 9:34 PM IST

Mumbai flood
पूर फाईल फोटो

मुंबई महानगराला देखील पावसाळ्यात अतिवृष्टीप्रसंगी पूरस्थितीचा सामना करावा लागतो. या अनुषंगाने मुंबईतील पूर जोखीम, वेगवेगळ्या घटकांवर त्याचे होणारे परिणाम व संभाव्य उपाययोजना याविषयी विचारविनिमय आणि मार्गदर्शन करण्यासाठी उद्या (२८ एप्रिल) आणि शुक्रवार (२९ एप्रिल) अशा दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई - हवामानातील बदल आणि भौगोलिक व इतर कारणांनी जगभरातील शहरांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे. मुंबई महानगराला देखील पावसाळ्यात अतिवृष्टीप्रसंगी पूरस्थितीचा सामना करावा लागतो. या अनुषंगाने मुंबईतील पूर जोखीम, वेगवेगळ्या घटकांवर त्याचे होणारे परिणाम व संभाव्य उपाययोजना याविषयी विचारविनिमय आणि मार्गदर्शन करण्यासाठी उद्या गुरुवार दिनांक २८ एप्रिल २०२२ आणि शुक्रवार दिनांक २९ एप्रिल २०२२ अशा दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन सह्याद्री राज्य अतिथीगृह (वाळकेश्वर) येथे करण्यात आले आहे.

आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शुभारंभ - राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या दिनांक २८ एप्रिल २०२२ रोजी सकाळी या कार्यशाळेचा शुभारंभ होणार आहे. तर दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी राज्याचे माजी मुख्य सचिव अजोय मेहता आणि माजी महानगरपालिका आयुक्त जयराज फाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होणार आहे. वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया या संस्थेच्या सहकार्याने आयोजित या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये उद्या शुभारंभानंतर मुंबईतील पूर व्यवस्थापनासाठी तांत्रिक अद्ययावतीकरण, पूरस्थितीमुळे मुंबईत संभाव्य धोक्यांचे मूल्यमापन, मुंबईत पूरस्थितीवर मात करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत सत्र होणार आहेत. तर दुसऱया दिवशी मुंबईतील पूर व्यवस्थापनासाठी महानगरपालिकेने हाती घेतलेले उपक्रम, मुंबईकर नागरिकांचे अनुभव, पूर प्रतिबंधक उपाययोजनांसाठी आर्थिक तरतूद व उपाययोजना हे सत्र होणार आहे. त्यानंतर समारोपाचा कार्यक्रम होईल.

मार्गदर्शन व विचारविनिमय - या विविध सत्रांमध्ये पूर व्यवस्थापन, नागरी विकास, प्रशासन या क्षेत्रातील विशेषज्ञ, तज्ज्ञ आणि संबंधित भागधारक सहभागी होणार आहेत. भारतीय तंत्र विज्ञान संस्था, भारतीय हवामान विज्ञान संस्था, राष्ट्रीय किनारी संशोधन केंद्र, पर्यावरण आणि वास्तुरचना विद्यालय, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट, टाटा समाज विज्ञान संस्था, यूथ फॉर युनिटी ऍण्ड व्हालंटरी ऍक्शन, स्टुडिओ पीओडी, डेल्टारेस (नेदरलँड), अर्बन सेंटर, कमला रहेजा विद्यानिधी इन्स्टिट्यूट, पेनसिल्व्हेनिया विद्यापीठ, सी ४० सिटीज, एशियन डेव्हलपमेंट बँक अशा विविध नामांकित संस्थांमधील तज्ज्ञ या दोन दिवसांमध्ये मार्गदर्शन व विचारविनिमय करणार आहेत. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि प्रसारमाध्यमातील नामवंत देखील यामध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) अशोक मेस्त्री यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.