ETV Bharat / city

अरे बाप रे... मालवाहू टेम्पोला आग लागून मृत्यू झाल्याचा बनाव उघड; अनैतिक संबंधातून झाला खून

author img

By

Published : Oct 21, 2021, 9:21 AM IST

आरोपीला अटक
आरोपीला अटक

एका मालवाहू टेम्पोला आग लागून त्यात एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना 12 ऑक्टोबरच्या मध्यरात्री घडली होती. सदर व्यक्तीचा टेम्पोच्या आगीत जळून मृत्यु झाला नसून त्याला जाळण्यात आल्याचे कटकारस्थान लक्षात येताच जळीतकांडाचा यशस्वी तपास करीत रसायनी पोलिसांनी खून करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहे.

रायगड - मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मालवाहू टेम्पोला आग लागून त्यात एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना 12 ऑक्टोबरच्या मध्यरात्री घडली होती. सदर व्यक्तीचा टेम्पोच्या आगीत जळून मृत्यु झाला नसून त्याला जाळण्यात आल्याचे कटकारस्थान लक्षात येताच जळीतकांडाचा यशस्वी तपास करीत रसायनी पोलिसांनी खून करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहे. तर एकजण फरार असल्याचे समजते. सदर तपासात हा खून अनैतिक संबंधाच्या संशयावरून झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

मालवाहू टेम्पोला आग लागून मृत्यू झाल्याचा बनाव उघड

कुटुंबीयांनी व्यक्त केला संशय -

मंगळवारी 12 ऑक्टोबर रोजी रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या एका माल भरलेल्या टेम्पोला आग लागल्याची माहिती मिळताच पोलिसांसह रेस्क्यू टीम, अग्निशमन दल, अपघातग्रस्तांच्या मदतीला तेथे पोहचले. आग आटोक्यात आणल्यानंतर लक्षात आले की टेम्पोच्या केबिनमध्ये एका व्यक्तीचा जळून अक्षरशः कोळसा झाला आहे. त्या मृतदेहाची ओळख पटवणे मोठे जिकरीचे काम होते. शेवटी गाडीच्या मालकाचा शोध घेतला असता मृत व्यक्ती हा सदाशिव संभाजी चिकाळे (रा. पुनावळे, ता मुळाशी, जि. पुणे) येथील असल्याचे पोलिसांना समजले. मयताची बातमी जेव्हा त्याच्या कुटूंबांला दिली तर त्यांनी सदाशिवचा खून झाला असेल असा संशय व्यक्त केला. त्याचे एका व्यक्ती बरोबर भांडण होते असे सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवत सत्यता पडताळून पाहण्यासाठी रायगड पोलीस अधीक्षक अनिल दुधे यांच्या आदेशानुसार खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांनी सहा.पोलीस निरीक्षक बालवडकर, पीएसआय काळे, पोलीस नाईक विशाल झावरे, मंगेश लांगे, राहुल भडाळे यांच्या दोन टीम तयार केल्या आणि तपास पूर्ण केला.

...असा केला तपास -

सदर मार्गावरील घटनास्थळापर्यंतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा एक कार त्याच्या टेम्पोचा पाठलाग करीत असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. त्यानुसार घरच्यांनी ज्याच्यावर संशय व्यक्त केला होता, त्यास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेण्याचे ठरवले असता ती व्यक्ती घटनेनंतर गायब होती. तेव्हा त्याच्या मोबाईल लोकेशननुसार त्याला देहूमधून अटक करण्यात आली व त्यावेळी त्याच्या समवेत आणखी एक त्याचा साथीदार सापडला. सदर हत्याकांडात त्याच्यासह आणखी दोन साथीदार होते असे समजले असून एकजण अद्याप फरार आहे.

अनैतिक सबंध ठरले कारणीभूत -

सदर व्यक्तीच्या पत्नीचे आणि सदाशिवचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता व त्यावरून या दोघांनमध्ये भांडणही झाले होते. शेवटी त्याने सदाशिवचा कायमचा काटा काढायचे ठरवले. त्यानुसार तो सदाशिववर पाळत ठेऊन होता. मंगळवारी सदाशिव भिवंडीला टेम्पो घेऊन गेला आहे असे त्याला समजताच दोन साथीदारांना बरोबर घेऊन त्याने सदाशिवचा पाठलाग केला. कळंबोली येथून एका कारने सदाशिवच्या टेम्पोचा त्याने पाठलाग करीत रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्यावर त्याने आपली कार सदाशिवाच्या टेम्पोसमोर आडवी घालीत त्याला टेम्पो बाजूला घ्यायला लावला व त्याला बेदम मारहाण करीत बेशुद्ध केले व टेम्पोला आग लावून ते तिघे तेथून पसार झाल्याची माहिती मिळाली आहे. गुन्ह्यात रसायनी पोलिस ठाण्यात भा.द.वी कलम 302, 201, 435, 506, 34 प्रमाणे गुन्हा नोंदवला असून दोघांना अटक करून एका फरारी आरोपीच्या शोधात रसायनी पोलीस आहेत. सदर गुन्हयाची सत्यता पडताळण्यासाठी खालापूरचे पोलिस निरिक्षक अनिल विभुते, खोपोलीचे पोलिस निरिक्षक शिरीष पवार यांनीही तपासात मदत केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.