ETV Bharat / city

आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत महाघोटाळा.. आरोग्य मंत्र्यांपासून सचिवाची थर्ड पार्टी मार्फत चौकशी करा - दरेकर

author img

By

Published : Sep 25, 2021, 6:46 PM IST

pravin darekar
pravin darekar

आरोग्य विभागाची परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने लाखो विद्यार्थ्यांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागलंय. राज्याच्या आरोग्य विभागाची भरती परीक्षेचा गोंधळ चव्हाट्यावर आल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भरती प्रक्रियेत महाघोटाळा झाला असून यामध्ये आरोग्य मंत्र्यांपासून सचिवांपर्यंत सर्व सहभागी आहेत. या सर्वांची थर्ड पार्टीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.

मुंबई - राज्याच्या आरोग्य विभागाची भरती परीक्षेचा गोंधळ चव्हाट्यावर आल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भरती प्रक्रियेत महाघोटाळा झाला असून यामध्ये आरोग्य मंत्र्यांपासून सचिवांपर्यंत सर्व सहभागी आहेत. या सर्वांची थर्ड पार्टीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे. शासनाने या प्रकरणाची दखल न घेतल्यास विद्यार्थ्यांना घेऊन तीव्र आंदोलन छेडू ,असा इशारा भाजप प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. राज्यात आरोग्य भरतीवरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे.

'त्या' कंपन्या काळ्या यादीतील -

राज्यातील आरोग्य विभागाच्या गट 'क' व 'ड' पदासाठी आज व उद्या होणारी परीक्षा अचानक रद्द झाल्या. लाखो विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊन मनस्ताप सहन करावा लागला. या प्रकरणाची विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दखल घेत, भरती महाघोटाळ्याचा पर्दाफाश केला. न्यास कम्युनिकेशन प्रा. लि. कंपनीला आरोग्य विभागाने भरती प्रक्रियेचे कंत्राट दिले. दहा वेळा यासाठी शुध्दीपत्रकात आणि अटी-शर्तीत बदल केला, असा गंभार आरोप दरेकर यांनी केला. फेब्रुवारी, २०२१ मधील परीक्षेपूर्वी आरोग्य विभागाच्या भरती परीक्षा एम.पी.एस.सी. मार्फत घेण्याचे ठरले होते. परंतु, सत्तेतील वरिष्ठ पातळीवरून हालचाली झाल्या आणि आघाडी सरकारने घाईघाईने काळ्या यादीतील दोन कंपन्यांना परीक्षेची जबाबदारी दिली. ३ पैकी २ कंपन्या काळया यादीतील आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने त्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.

हे ही वाचा -उस्मानाबादमध्ये शेतात काम करत होता शेतकरी, आकाशातून पडला सोनेरी रंगाचा दगड



शिवसेना गप्प का?

महापरीक्षा पोर्टल रद्द करून २१ जानेवारी रोजी शासन निर्णय निर्गमित केला होता. ४ मार्च ला सुधारणा करून मेसर्स न्यास कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे नाव समाविष्ट केले. परीक्षेचे कंत्राट दिलेल्या पाच कंपन्यांपैकी मेसर्स टेक अप लिमिटेड ही महापरिक्षा परिषद, पुणे यांनी ब्लॅकलिस्ट केली होती. एक कंपनी उत्तर प्रदेशमध्ये ब्लॅक लिस्ट केली आहे. अशा प्रकारे गतिशील सरकारने या कंपन्यांना कंत्राट देण्यासाठी अनेक नियम धाब्यावर बसवले आहेत, असा आरोप दरेकर यांनी केला. मराठी भाषेची सक्ती असतानाही, इंग्रजी माध्यमांत परीक्षा घेण्यात आल्या. मराठी भाषेचा कळवळा असलेली व सत्तेत सहभागी असणारी शिवसेना आता गप्प का, असा प्रश्न दरेकर यांनी केला.

हे ही वाचा - धक्कादायक; वाळूची तस्करी करणाऱ्या टेम्पोने कॉन्स्टेबलला चिरडले

खासगी कंपन्यांमार्फतचा अध्यादेश आजच रद्द करा -

परीक्षा एमपीएससीमार्फत होणार नाहीत, तोपर्यंत आरोग्यमंत्री यांनी तारीख जाहीर करू नये. न्यास कंपनीने राज्य शासनातील इतर विभागामधील भरतीचे सुद्धा कंत्राट घेतले, ते सुद्धा तात्काळ रद्द करावेत. सर्व परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्याचे नियोजन करावे. नुकतेच झालेल्या नीट परीक्षेत डमी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून परीक्षा घेतली. या परीक्षेची चौकशी करावी, बोगस व काळ्या यादीतील कंपन्यांची निवड करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब व क च्या पदांच्या भरती खासगी कंपन्यांमार्फत करण्याचा अध्यादेश आजच रद्द करावा, अशी मागणी दरेकर यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.