ETV Bharat / city

अखेर बारावी निकालाचा प्रश्न सुटला.. सीबीएसईच्या धर्तीवर होणार मूल्यमापन, 30:30:40 असा फॉर्म्युला जाहीर

author img

By

Published : Jul 2, 2021, 10:35 PM IST

Updated : Jul 2, 2021, 10:44 PM IST

राज्यातील बारावीच्या परीक्षेच्या निकालाचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्यात येणार आहे. सीबीएसई प्रमाणेच हा फॉर्म्युला असणार आहे. दहावीसाठी 30 टक्के, अकरावीसाठी 30 टक्के आणि बारावीसाठी 40 टक्के या सूत्रानुसार विभागणी करण्यात आली आहे.

ee
ee

मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेच्या मुल्यमापनाचे धोरण आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले आहे. सीबीएसईच्या धर्तीवर महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीचे मूल्यमापन करण्यासंदर्भात ३०:३०:४० फॉर्म्युला तयार केला आहे. ज्यामध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल हा दहावी,अकरावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांवर आधारित असणार आहे, तसेच ज्या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षा मूल्यांकन पद्धतीनुसार निकाल मान्य नसेल, अशा विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय सुरु झाल्यावर बारावीची परीक्षा देता येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

सीबीएसईच्या धर्तीवर होणार मूल्यांकन -

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई, बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा आणि परीक्षांचे मूल्यांकनाचे धोरण जाहीर करण्यात आले होते. मात्र, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षा रद्द केली होती. मात्र, बारावीच्या परीक्षांचे मूल्यांकनाचे कसे होणार याबाबत अनेक दिवसांपासून राज्यातील १४ लाख विद्यार्थी वाट पाहत होते. आज अखेर बारावी परीक्षांच्या मुल्यमापनाचे धोरण शालेय शिक्षण विभागाने आज जाहीर केले आहे. ज्यामध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल हा दहावी,अकरावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांवर आधारित असणार आहे. यात दहावीच्या परीक्षेचे ३० टक्के गुण, अकरावीमधील ३० टक्के गुण आणि बारावीतील ४० टक्के गुणांचा समावेश असणार आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
..असा आहे फार्म्युला -
विद्यार्थ्याची दहावीमधील मंडळाच्या परीक्षेतील गुण, इयत्ता अकरावीच्या अंतिम निकालातील गुण व इयत्ता बारावीचे वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन विचारात घेऊन निश्चित करण्यात येणार आहे. लेखी परीक्षेसाठी निर्धारित एकूण गुणांपैकी ३० टक्के गुण इयत्ता दहावीमधील मंडळाच्या परीक्षेतील गुण, ३० टक्के गुण अकरावीच्या अंतिम निकालातील गुण आणि ४० टक्के गुण इयत्ता १२ वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन यानुसार विचारात घेऊन दिले जातील. इयत्ता दहावीसाठी भारांशानुसार प्राप्त गुण निश्चित करताना मंडळाच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण असलेले तीन विषय विचारात घेतले जातील. इयत्ता बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय गुण लक्षात घेतले जाणार आहे.
विद्यार्थ्यांना दुसरा पर्याय -
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा मूल्यांकन पद्धतीनुसार ज्या विद्यार्थ्यांना निकाल मान्य नसेल, अशा विद्यार्थ्यांसाठी कोविड -१९ ची परिस्थिती सर्वसामान्य झाल्यानंतर राज्य मंडळामार्फत प्रचलित पध्दतीनुसार आयोजित केल्या जाणाऱ्या लगतच्या परीक्षांमध्ये श्रेणीसुधार योजनेअंतर्गत लागू होणाऱ्या एक किंवा दोन संधी उपलब्ध असतील. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा श्रेणीसुधार योजनेचे (Class Improvement Scheme) सर्व नियम या विद्यार्थ्यांना लागू असतील.
शिक्षण मंत्र्यांचे निर्देश -
देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला. विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षिता लक्षात घेऊन बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून मुल्यमापन प्रक्रिया शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज जाहीर केली. तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांचे मुल्यमापन करत असताना शालेय/कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर एक परीक्षा समितीची स्थापना करून मूल्यमापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी शाळेने सर्व प्रकारचे अभिलेख व माहिती जतन करून ठेवावी. निकालपत्र तयार करत असताना कोणत्याही प्रकारची खोटी व दिशाभूल करणारी माहिती दिल्यास संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहे.
काही विद्यार्थ्यांमध्ये नाराजी -
बारावीच्या परीक्षा मूल्यांकन पद्धतीनुसार काही विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातवरण आहे. तर काही विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना दहावीत कमी गुण मिळाले आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षांत चांगले गुण मिळावेत म्हणून विद्यार्थ्यांनी खूप परिश्रम करून बारावी परीक्षाची तयारी केली होती. मात्र, आता परीक्षा रद्द झाल्यामुळे आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे मुल्यांकन हे दहावी, अकरावी आणि बारावी या तीन वर्गांच्या गुणवत्तेवर ठरणार असल्याने विद्यार्थ्यांचा बारावीत कमी गुण मिळणार असल्याची भीती व्यक्त केली आहे.
Last Updated :Jul 2, 2021, 10:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.