ETV Bharat / city

नवरात्री विशेष : 'असा' पार पाडतो अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव; पाहा काय आहे परंपरा..

author img

By

Published : Oct 6, 2021, 3:43 PM IST

Updated : Oct 6, 2021, 4:00 PM IST

असा' पार पाडतो अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव;
असा' पार पाडतो अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव;

घटस्थापनेनंतर करवीर निवासिनी अंबाबाईची दररोज विविध रुपात अलंकारिक पूजा बांधण्यात येते. अंबाबाईची ही पूजा पाहण्यासाठी तसेच अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी कोल्हापूरात येत असतात. घटस्थापना झाल्यानंतर दुपारी साडे बारा वाजता आरती होते त्यानंतर ही पूजा बांधण्यात येते. अंबाबाईची विविध रूपातील पूजा अगदी डोळ्यात साठवून ठेवावी अशीच असते. त्यामुळे याला एक वेगळं महत्व आहे.

कोल्हापूर - उद्यापासून (गुरुवार) शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिरातदेखील दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी पार पडतो. यंदाच्या नवरात्रोस्तवाची सर्व तयारी आता पूर्ण झाली असून प्रत्येकजण घटस्थापनेची आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान, करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरात कशा पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा होतो? काय आहेत परंपरा? याबाबत आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...

असा पार पाडतो अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव -

मंदिर आणि मूर्ती अभ्यासक प्रसन्न मालेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी अश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थातच घटस्थापनेला सकाळी साडे आठ वाजता अंबाबाईची महापूजा पार पडते. त्यानंतर अंबाबाईच्या समोरच गाभाऱ्यात श्रीपूजक, इतर महत्वाच्या व्यक्ती आणि देवस्थान पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घटस्थापना केली जाते. या घटस्थापनेला अंबाबाईची उत्सवमूर्ती सनई ताशांच्या गजरात घटाच्या शेजारी विराजमान होते आणि ज्या उत्सवाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात त्या नवरात्रोत्सवाला सुरुवात होते.

अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव
अंबाबाई मंदिरातील नवरात्रोत्सव
घटस्थापनेनंतर अंबाबाईची दररोज विविध अलंकारिक पूजा -


घटस्थापनेनंतर करवीर निवासिनी अंबाबाईची दररोज विविध रुपात अलंकारिक पूजा बांधण्यात येते. अंबाबाईची ही पूजा पाहण्यासाठी तसेच अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी कोल्हापूरात येत असतात. घटस्थापना झाल्यानंतर दुपारी साडे बारा वाजता आरती होते त्यानंतर ही पूजा बांधण्यात येते. अंबाबाईची विविध रूपातील पूजा अगदी डोळ्यात साठवून ठेवावी अशीच असते. त्यामुळे याला एक वेगळं महत्व आहे. प्रतिपदेदिवशी बैठी अलंकार पूजा, पंचमी दिवशी गजारूढ, अष्टमी दिवशी महिषासुरमर्दिनी रुपात परंपरागत पूजा बांधण्यात येत असते. इतर दिवशी विविध रुपात पूजा बांधली जाते.

दररोज अंबाबाईचा पालखी सोहळा -

फुलांची उधळण, भालदार-चोपदारांसह देवस्थानच्या मंडळींच्या लवाजम्यासह दररोज रात्री अंबाबाईचा पालखी सोहळा पार पडत असतो. अगदी मंगलमय वातावरणात तसेच अंबाबाईच्या जयघोषात देवीची सुवर्ण पालखी मंदिर आवारातून फिरून पुन्हा गाभाऱ्यात विराजमान होत असते. दररोजच्या या पालखी सोहळ्याला हजारोंच्या संख्येने भाविक हजर असतात. प्रतिपदापासून सप्तमीपर्यंत पालखी सोहळा पार पाडतो. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर अनेक बंधने असून केवळ मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच हा सोहळा पार पडणार आहे.

असा' पार पाडतो अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव;
पंचमी दिवशी अंबाबाई त्रिंबोलीच्या भेटीला-
दरवर्षी नवरात्रोत्सवाच्या पंचमी दिवशी अंबाबाई आपली प्रिय सखी त्रिंबोलीच्या भेटीला जात असते. सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास अंबाबाई त्रिंबोलीच्या भेटीला जाते. त्यामुळे यादिवशी अंबाबाईची गजारूढ रुपात आकर्षक पूजा बांधण्यात येत असते. अंबाबाई त्रिंबोलीच्या भेटीला गेल्यानंतर तिथे परंपरागत अंबाबाई त्रिंबोलीची भेट होते. त्यानंतर कुमारिकेचे पूजन होते. छत्रपती घराण्यातील व्यक्तींच्या हस्ते कुमारिकेचे पूजन होत असते. त्यानंतर कोहळा फोडण्याचा पारंपरिक कार्यक्रम पार पडतो. त्यानंतर पुन्हा अंबाबाई मंदिरात परत येते. वर्षानुवर्षे अशाच पद्धतीने हा विधी पार पडत आला आहे.
अष्टमीला अंबाबाईची नगर-प्रदक्षिणा -
नवरात्रोत्सवाच्या अष्टमीला अंबाबाईने महिषासुराचा वध केला, त्यामुळेच या दिवशी अंबाबाई नगरप्रदक्षिणा साठी मंदिरातून बाहेर पडते. फुलांनी सजलेल्या वाहनातून देवीची नागरप्रदक्षिणा असते. रात्री आरती नंतर तोफेची सलामी होते त्यानंतर देवीचे वाहन महाद्वारातून बाहेर पडते. नगरप्रदक्षिणेच्या मार्गावर आकर्षक रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या घातल्या जातात. यावेळी डोळे दिपावणारी विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात येत असते. हा नागरप्रदक्षिणेचा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर सुद्धा काही निर्बंध घालण्यात आले आहेत.
दहाव्या दिवशी म्हणजेच दसऱ्यादिवशी अंबाबाई जाते सीमोल्लंघनाला -
दरवर्षी दशमी म्हणजेच दसऱ्यादिवशी अंबाबाई सीमोल्लंघनाला जाते. कोल्हापुरातील दसरा चौक येथे सीमोल्लंघन म्हणजेच सोने लुटण्याचा शाही कार्यक्रम पार पडतो त्याठिकाणी लावजम्यासह अंबाबाईची पालखी जाते. त्याठिकाणी सीमोल्लंघनाचा शाही सोहळा पार पडेल. अशा पद्धतीने नवरात्रोत्सवात विविध उपक्रम आणि परंपरागत चालत आलेल्या पद्धतीनुसार हा मंगलमय सोहळा पार पडत असतो. करवीर नगरीसह महाराष्ट्र आणि देशभरातील भाविक या काळात अंबाबाईच्या दर्शनासाठी येत असतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध -
गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने राज्यभरातील सर्वच धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती. त्यामुळे कोणालाही अंबाबाईचे दर्शन मंदिरात येऊन घेता आले नाही. मात्र उद्या राज्यभरातील सर्वच धार्मिक स्थळे उघणार आहेत. अंबाबाईचे मंदिर सुद्धा भाविकांसाठी उघडणार असल्याने भक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी सर्वांनी ऑनलाईन नोंदी करणे गरजेचे असून ज्यांनी नोंदणी केली आहे त्याच भाविकांना दर्शन घेता येणार आहे. Www.mahalakshmikolhapur.com या संकेतस्थळावर जाऊन भाविकांना नोंदणी करता येणार आहे.

हेही वाचा - NAVRATRA भाविकांना ७ ऑक्टोबरपासून वणीच्या सप्तशृंगीचे मिळणार दर्शन

Last Updated :Oct 6, 2021, 4:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.