ETV Bharat / bharat

मोदींच्या राज्यात बनावट टोल नाका! दीड वर्षांपासून सुरू लोकांची फसवणूक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 8, 2023, 8:10 PM IST

Fake Toll Plaza
Fake Toll Plaza

Fake Toll Plaza In Gujrat : गुजरातमध्ये बनावट टोल नाका उभारून लोकांची लूट करण्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. येथे हे काम गेल्या दीड वर्षांपासून सर्रास चालू होतं. काय आहे हे प्रकरण, जाणून घेण्यासाठी वाचा पूर्ण बातमी.

गांधीनगर Fake Toll Plaza In Gujrat : विचार करा. तुम्ही हायवेनं गाडी चालवत आहात. वाटेत तुम्हाला एक टोलनाका लागला. तुम्ही तो टोल भरला. मात्र काही काळानंतर तुम्हाला कळलं की तो टोलनाकाचं खोटा होता! धक्का बसला ना? असाच धक्का गुजरातमधील हायवेवर गाडी चालवणाऱ्यांना बसला आहे. ही काही चित्रपटाची स्क्रिप्ट नाही, तर गुजरातमध्ये अशा प्रकारची घटना प्रत्यक्ष घडली आहे. पंतप्रधानांच्या राज्यातच ही घटना घडल्यानं सर्वसामान्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काय आहे प्रकरण : हे प्रकरण गुजरातच्या बामणबोर-कच्छ राष्ट्रीय महामार्गावर उघडकीस आलं. येथील मोरबीजवळ राष्ट्रीय महामार्गाला बायपास करून खासगी जमिनीवर एक खोटा टोल नाका उभारण्यात आला. लोकांना या टोलनाक्याकडे वळवण्यासाठी तेथे निर्धारित रकमेपेक्षा अर्धी रक्कम आकारण्यात येत होती. अशाप्रकारे येथे एका वर्षाहून अधिक काळ सरकारी अधिकारी आणि ये-जा करणाऱ्या सामान्य नागरिकांची फसवणूक करण्यात आली. ज्या जमिनीवर हा टोल नाका उभारण्यात आला, ती जमीन व्हाईट हाऊस सिरेमिक कंपनीच्या मालकीची आहे.

एक वर्षाहून अधिक काळ चालू होता कारभार : बामणबोर-कच्छ राष्ट्रीय महामार्गावर अधिकृत वघासिया टोल प्लाझा आहे. या टोल प्लाझाच्या वास्तविक मार्गावरून काही वाहनं वळवली जात होती. टोलच्या निम्म्या किंमतीचं प्रलोभन दाखवून ट्रकचालक या मार्गाकडे वळत होते. ही बेकायदेशीर कर वसुली चक्क एक वर्षाहून अधिक काळ चालू होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस आणि इतर अधिकारी चौकशीसाठी घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी आता सविस्तर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

जमिनीच्या मालकांविरुद्ध तक्रार दाखल : या भागातील धनाढ्य लोकांचं हे काम असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी व्हाईट हाऊस सिरॅमिक कंपनीच्या मालकांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. अमरशी पटेल, वनराज सिंह झाला, हरविजय सिंह झाला, धर्मेंद्र सिंह झाला आणि युवराज सिंह झाला हे या कंपनीचे मालक आहेत.

हेही वाचा :

  1. बुलडाण्यात आढळले बनावट नोटा छापण्याचे मशीन? मलकापूर पोलिसांनी प्रिंटिंग मशिन्स केल्या जप्त
  2. ऐकावं ते नवलच! चक्क आयएएस अधिकाऱ्यांनीच सहा बनावट कार्यालयं तयार करुन लाटले 18 कोटी रुपये
  3. 33 प्राध्यापकांचे नेट सेट सर्टिफिकेटच बनावट, 'या' विद्यापीठात खळबळ, कुलगुरुंना माहितीच नाही
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.