ETV Bharat / bharat

Shivaji Maharaj Jagdamba Sword : काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगदंब तलवार आणि वाघनखांचा इतिहास, जाणून घ्या सविस्तर माहिती

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 8, 2023, 2:15 PM IST

Updated : Sep 8, 2023, 5:18 PM IST

छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायला वाघनखांचा उपयोग केला होता. छत्रपती शिवरायांची वाघनखं आणि जगदंब तलवार इंग्लंडच्या राणीच्या संग्रहालयात आहेत. लवकरच राज्य सरकार ही वाघनखं आणि जगदंब तलवार भारतात आणणार आहे. मात्र या वाघनखांचा आणि जगदंब तलवारीचा काय इतिहास आहे, याबाबतची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Shivaji Maharaj Jagdamba Sword
संपादित छायाचित्र

हैदराबाद : छत्रपती शिवरायांनी स्वराज्यावर चालून येणाऱ्या क्रूर अफजल खानाचा कोथळा वाघनखांनी काढला. त्यामुळे महाराजांच्या वाघनखांना अनन्यसाधारण महत्व आहे. दुसरीकडं छत्रपती शिवरायांनी आपल्या तलवारीच्या बळावर अनेक शत्रूंना पाणी पाजलं. छत्रपती शिवरायांच्या तलवारीचं तमाम मराठी बांधवांना अप्रूप आहे. मात्र जगदंब तलवार ( Jagdamba Sword ) आणि वाघनखं परदेशात गेली कशी, यावरुन देशात चर्चा झडते. छत्रपती शिवरायांची जगदंब तलवार आणि वाघनखं राज्य सरकार लवकरच भारतात आणणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मात्र जगदंब तलवार आणि वाघनखांचा काय इतिहास आहे, याबाबतची माहिती आपण ईटीव्ही भारतच्या या बातमीतून जाणून घेणार आहोत.

काय आहे जगदंब तलवारीचा इतिहास?: छत्रपती शिवरायांनी वापरलेली एक तलवार सिंधुदुर्ग किल्ल्यावर जतन करुन ठेवण्यात आली आहे. मात्र शत्रपती शिवरायांची जगदंब तलवार ही महाराजांच्या कोणत्याच गडकिल्ल्यावर आढळून येत नव्हती. त्यामुळे शिवरायांच्या जगदंब तलवारीचा शोध घेण्यात येत होता. याच दरम्यान इंग्लंडच्या राणीच्या संग्रहालयात शिवरायांची जगदंब तलवार असल्याचं स्पष्ट झालं. इंग्लंडच्या राणीच्या संग्रहालयाचा 'सी प्युरडॉन क्लार्क' यांनी कॅटलॉग तयार केला. यात जगदंबा तलवार राणीच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये असल्याचं स्पष्ट झालं. मात्र ही तलवार इंग्लंडला गेली कशी, याबाबतचा शोध घेतला असता, मोठी रंजक माहिती समोर आली. ब्रिटनचा युवराज प्रिन्स ऑफ वेल्स भारत भेटीवर आल्यानंतर चौथ्या शिवाजी महाराजांनी वयाच्या अकराव्या वर्षी एक तलवार आणि एक कट्यार त्याला भेट दिल्याची माहिती पुढं आली. मात्र ही भेट ब्रिटनचा युवराज प्रिन्स ऑफ वेल्सनं जबरदस्तीनं घेतल्याचं पुढं आल्याचा दावा काही इतिहास संशोधकांनी केला आहे. ही तलवारच छत्रपती शिवरायांनी वापरलेली जगदंब तलवार असल्याचं इतिहास संशोधकांनी स्पष्ट केलं. मात्र तरीही इंग्लंडकडून ही तलवार त्यांच्याकडं नसल्याचा दावा करण्यात येत होता. जगदंब तलवार इंग्लंडमध्येच असल्याचं आता स्पष्ट झालं असून लवकरच शिवरायांची तलवार भारतात आणण्यात येणार आहे.

काय आहे छत्रपती शिवरायांच्या वाघनखांचा इतिहास? : वाघनखं हे हाताच्या मुठीत लपवण्यासारखं मात्र प्रचंड धोकादायक शस्त्र आहे. वाघनखं वाघाच्या पंजावरील नखासारखच असून त्यांना मूठ आवळल्यावर लपवता येतात. अगदी याची पट्टी दोन अंगठ्या बोटात घातल्यासारखी दिसते. त्याला आतल्या बाजुनं तीक्ष्ण नखं लावलेली असतात. छत्रपती शिवरायांनी याच वाघनखांचा उपयोग करुन स्वराज्यावर चालून आलेल्या अफझल खानाचा वध केला होता. मात्र त्यानंतर छत्रपती शिवरायांची ही वाघनखं इंग्लंडच्या राणीच्या संग्रहालयात असल्याचं स्पष्ट झालं. ही वाघनखं इंग्लंडला गेली कशी, यावर मोठी चर्चा घडत आहे. मात्र मराठा साम्राज्य काळातील अनेक वस्तू इंग्लंडच्या राणीच्या संग्रहालयात असल्याचं स्पष्ट होत गेलं.

इतिहासकार ग्रँड डफ साताऱ्यात : ग्रँड डफ हा इंग्रज अधिकारी मराठ्यांचा इतिहास लेखक म्हणून ओळखला जातो. त्यानं 'हिस्ट्री ऑफ मराठाज' हा ग्रंथ लिहिला आहे. इस्ट इंडिया कंपनीनं ग्रँड डफची 1818 ते 1824 या कालावधीत इस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी म्हणून साताऱ्यात नेमणूक केली होती. त्यामुळे छत्रपती प्रतापसिंह महाराज आणि इस्ट इंडिया कंपनीचे व्यवहार ग्रँड डफ पाहात होता. याच काळात ग्रँड डफनं छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्यासोबत संबंध वाढवून वाघनखं आणि अनेक मौल्यवान वस्तू भेट मिळवून त्या इंग्लंडला नेल्याचं बोललं जातं. त्यानंतर या मौल्यवान वस्तू ग्रँड डफच्या वारसाकडं होत्या. मात्र त्यांनी व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमला हे हत्यार दान केल्याचं बोललं जातं. मात्र व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमच्या वस्तू सूचित ही माहिती अगदी त्रोटक स्वरुपात दिली आहे.

हेही वाचा :

  1. Wagh Nakhe Jagadamba Sword : वाघनखं अन् जगदंबा तलवार लवकरच येणार मायभूमीत; सुधीर मुनगंटीवार जाणार लंडनला
Last Updated : Sep 8, 2023, 5:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.