ETV Bharat / bharat

बेरोजगारीचे खापर नेहरू- गांधींवर फोडता येणार नाही, शिवसेनेने भाजपचे टोचले कान

author img

By

Published : Jun 3, 2019, 10:52 AM IST

शिवसेनेने भाजपचे टोचले कान

लोकसभा निवडणुकीपुर्वी शिवसेने भाजपसोबत जात दणदणीत यश मिळवले आहे. मात्र, शिवसेनेची मोदींच्या मंत्रीमंडळात केवळ एका मंत्रीपदावर बोळवण करण्यात आली आहे.

मुंबई - देशातील बेरोजगारीची जबाबदारी नेहरू आणि गांधींवर टाकता येणार नाही. केवळ शब्दांचा खेळ करून बेरोजगारी हटणार नसून नवीन अर्थमंत्र्यांनी मार्ग काढावा. मोदींचे सरकार येत आहे म्हटल्यावर सट्टा बाजार आणि शेअर बाजार उसळला, पण जीडीपी घसरला आणि बेरोजगारीचा दर वाढला हे लक्षण काही चांगले नाही, अशा शब्दात शिवसेनेने सामना वृत्तपत्रातून भाजपचे कान टोचले आहे. त्यामुळे निवडणुका होईपर्यंत गोडीगुलाबीने वागणाऱ्या शिवसेनेने भूमिका बदलली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावली आहे. रोजगार निर्मतीत घसरण झाली असून देशातील बेरोजगारी दराने गेल्या ४५ वर्षातली उच्चांक गाठला आहे. बेरोजगार तरूणांनी 'मोदी है तो मुमकीन है' या मंत्रावर विश्वास ठेवून मोदींना मते दिली आहेत. त्यांना काम देणे आवश्यक आहे. महागाई, घटते उत्पादन आणि बंद पडत चाललेले उद्योग हे सरकारपुढे महत्वाचे आव्हान आहे. शेतकऱ्यांचीही वाईट अवस्था असून एकट्या मराठवाड्यात गेल्या पाच महिन्यात ३१५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. २०१५-१६ मध्ये ३७ लाख नोकऱयांची गरज असताना प्रत्यक्षात १ लाख ४८ हजार लोकांनाच नोकरी मिळाली. केंद्र सरकारच्या नोकर भरतीत ३० ते ४० टक्क्यांनी घट झाली. पंतप्रधानांच्या प्रेरणेने कौशल्य विकास योजना सुरू झाली, त्याचे नेमके काय झाले? असा सवाल सामनातून उपस्थित करण्यात आला.

बीएसएनएल, रेल्वे, नागरी हवाई वाहतूक व्यवसाय, मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योग, केंद्र सरकारचे सार्वजनिक उपक्रम आदींची अवस्था वाईट असून तेथे नोकरभरतीही झालेली नाही. अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत असल्याचे सरकार सांगत असले तरी बेरोजगारीचा दरही वाढला हे मान्य करावे लागेल, असे सामन्यातील संपादकीयातून सांगण्यात आले.

२०१४ ते २०१९ या ५ वर्षात शिवसेना आणि भाजप एकत्र सत्तेत असले तरी नेहमी एकमेकांवर कुरघोडी करण्याची दोघांनीही एकही संधी सोडली नाही. सत्तेला लाथ मारू, राजीनामे खिशात आहे, सत्तेतून बाहेर पडू, अशी वक्तव्ये करत भाजपसोबत शिवसेनेने रडत पडत ५ वर्षे संसार केला. सामना वृत्तपत्रातून मोदींसह भाजपवर प्रचंड टीका शिवसेनेने केली होती. हे निजामाचे सरकार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीपुर्वी पुन्हा एकत्र येत शिवसेने भाजपसोबत जात दणदणीत यश मिळवले आहे. मात्र, शिवसेनेची मोदींच्या मंत्रीमंडळात केवळ एका मंत्रीपदावर बोळवण करण्यात आली.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप येत्या निवडणुकीत निम्म्या निम्म्या जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. भाजप शिवसेना यांच्यातील "तू तू मै मै" वादामुळे शिवसनेला सोशल मिडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.