महाराष्ट्र

maharashtra

लोकसभा निवडणूक 2024 : वंचितचा नवा गेम प्लान ? अधिकृत उमेदवाराला दिला नाही एबी फॉर्म - Lok Sabha Election 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 25, 2024, 9:29 AM IST

Lok Sabha Election 2024 : वंचित बहुजन आघाडीनं औरंगाबाद लोकसभा मतदार संघात अफसर खान यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला नाही. त्यामुळे उमेदवार असलेले अफसर खान संतप्त झाले आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे.

Lok Sabha Election 2024
अफसर खान

छत्रपती संभाजीनगर Lok Sabha Election 2024 :औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणूक अधिकच रंजक होत चालली आहे. काही दिवसांपूर्वी वंचितच्या वतीनं अफसर खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र निवडणूक अर्ज भरताना अजून एबी फॉर्म देण्यात आला नसल्यानं संतप्त झालेल्या अफसर खान यांनी आता अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. "यामागं नेमकं काय कारण आहे, ऐनवेळी का असं झालं, याचा शोध घेऊन पुढील माहिती देईल," असं देखील त्यांनी सांगितलं. एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी अमरावती इथं आनंदराज आंबेडकर आणि अकोला इथं प्रकाश आंबेडकर यांना दिलेल्या पाठिंबाबद्दल तर ही भूमिका घेतली नाही ना? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अफसर खान यांना दिला नाही एबी फॉर्म : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात वंचितच्या पाठिंबामुळे 2019 च्या निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी खासदारकी मिळवली. मात्र 2024 लोकसभा निवडणुकीत वंचितनं स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. पक्षाची असलेली मोठी ताकद ही एका बाजूला असावी, यासाठी अफसर खान यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यात प्रचाराला देखील सुरुवात करण्यात आली. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा 25 एप्रिल हा शेवटचा दिवस असला, तरी वंचित तर्फे त्यांना एबी फॉर्म देण्यात आला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या अफसर खान यांनी आता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. "पूर्ण तयारी झाली असून, सर्व समाजाचे लोक भक्कमपणे मागं असल्यानं आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार," असं त्यांनी सांगितलं. तर "ऐनवेळी पक्षानं एबी फॉर्म का दिला नाही, याचा सखोल तपास करू आणि नंतर याबाबत माहिती देऊ," असं देखील अफसर खान यांनी सांगितलं.

एमआयएमनं भूमिका घेतल्यानं निर्णय : एमआयएम पक्षाचे उमेदवार इम्तियाज जलील यांचा जिल्ह्यात प्रचार सुरू झाला आहे. त्यासाठी पक्षाचे प्रमुख असदुद्दिन ओवैसी यांनी वैजापूर, कन्नड या ग्रामीण भागासह शहरात प्रचार सभा घेतल्या. यामध्ये वैजापूर येथील पहिल्या सभेत त्यांनी अमरावती इथं आनंदराज आंबेडकर यांना बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली. तर दुसऱ्या दिवशी शहरात झालेल्या शेवटच्या सभेत त्यांनी अकोला इथं प्रकाश आंबेडकर यांना बिनशर्त पाठिंबा देत असून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मतदान करावं, असं आवाहन देखील ओवैसी यांनी केलं. त्यानंतर आता जिल्ह्यात वंचित काय भूमिका घेईल, याबाबत चर्चा सुरू असताना, वंचितचे अधिकृत उमेदवार अफसर खान यांना एबी फॉर्म न दिल्यानं अचानकच छुपा पाठिंबा एमआयएमला मिळाला का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा :

  1. वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध; प्रकाश आंबेडकर म्हणाले 'एनआरसी, सीएए कायदे हिंदूविरोधात' - Lok Sabha Election 2024
  2. वंचितकडून उमेदवार बदलण्याचा धडाका सुरूच! प्रकाश आंबेडकर यांनी 'या' मतदारसंघातील नेत्याची उमेदवारी केली रद्द - LOK SABHA ELECTION 2024
  3. पुन्हा आंबेडकर विरुद्ध गांधी आमने-सामने, वंचित भाजपाची बी टीम असल्याचा तुषार गांधींचा आरोप - Tushar Gandhi Alleges Vanchit

ABOUT THE AUTHOR

...view details