महाराष्ट्र

maharashtra

नाशिकच्या जागेवर महायुतीमध्ये पुन्हा जुंपली; जागेवर राष्ट्रवादीचा दावा - Lok Sabha Election 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 14, 2024, 8:39 PM IST

Sunil Tatkare Ratnagiri PC : नाशिकच्या जागेवर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दावा आहे. या जागेबाबत निर्णयास्पद चर्चा झालेली आहे. आज किंवा उद्या बैठक होईल आणि नाशिकचा तिढा सुटेल असं अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. ते आज रत्नागिरीतील गुहागरमध्ये बोलत होते.

Sunil Tatkare Ratnagiri PC
सुनील तटकरे

सुनील तटकरे लोकसभा निवडणुकीविषयी बोलताना

रत्नागिरी Sunil Tatkare Ratnagiri PC:सुनीलतटकरे यांनी महायुतीच्या जागा वाटपाबाबत बोलताना सांगितलं की, आज किंवा उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होईल. गरज भासली तर प्रदेशाध्यक्ष म्हणून मी देखील उपस्थित असेन आणि नाशिकचा तिढा नक्की सुटेल. इतर जागांचाही निर्णय त्या ठिकाणी होईल. साताऱ्याच्या जागेबाबत देखील चर्चा झालेली आहे. सामूहिक पत्रकार परिषदेत त्याबाबतचा सर्व खुलासा केला जाईल, असं तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

मी महायुतीचाच उमेदवार - तटकरे :शेकापच्या जयंत पाटील यांनी सुनील तटकरे यांची 2019 ला साथ दिली नसती तर, ते रायगडच्या आणि राज्याच्या राजकारणातून कायमचे हद्दपार झाले असते, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांनी केला होता. याबाबत बोलताना तटकरे म्हणाले की, अलीकडे गीते यांना काय झालंय मला माहीत नाही. 2019 मध्ये काँग्रेस, शेकाप माझ्यासोबत होता, याबाबत दुमत नाही. पण 2019 मध्ये गीतेंसोबत मोदींची ताकद, अखंड शिवसेना त्यांच्या पाठीमागे होती. हद्दपारीची भाषा त्यांच्या तोंडी जास्त शोभते. कारण 2019 मध्ये अनंत गीते यांनी जयंत पाटील यांचं संस्थान खालसा केल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी दर्पोक्ती देखील केली होती असा टोला तटकरे यांनी यावेळी लगावला.

मी जनतेशी संवाद करणारा कार्यकर्ता :सुनील तटकरे पुढे म्हणाले की, भावनेच्या नावावर, धर्माच्या नावावर, समाजाच्या नावावर काहीही न करता ज्यांना निवडणुकीत यश मिळतं त्यांच्या डोक्यात अशा पद्धतीच्या कल्पना असतात. दरम्यान मी जमिनीवर पाय ठेवणारा, थेट जनतेशी संवाद करणारा कार्यकर्ता असल्यानं माझ्या मनातला आत्मविश्वास हा वेगळा आहे. मी महायुतीचा उमेदवार आहे. शिवसेनेची ताकद, भाजपाची ताकद माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे पुन्हा या निवडणुकीत विजय नक्की आहे, असं तटकरे यावेळी म्हणाले.

रोहित पवार भाजपाकडे तिकीट मागायला गेले होते :बारामतीमध्ये भावा-बहिणीच्या कराराबाबत रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा सुनील तटकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. भावा-बहिणीचा कुठला करार झाला आहे, मला माहीत नाही; पण 2019 मध्ये रोहित पवार भाजपाकडे तिकीट मागायला गेले होते. कदाचित तो करार असावा, असा टोला तटकरे यांनी लगावला. तसेच 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून भाजपाकडे जावं यावर रोहित पवार यांची सही होती. त्या कराराची त्यांना आठवण झाली की काय माहीत नाही, असं देखील तटकरे यावेळी म्हणाले. सुनेत्रा पवार यांच्या बाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याविषयी तटकरे म्हणाले की, शरद पवार यांनी जे काही वक्तव्य केलं, त्याबाबतची प्रतिक्रिया मी काही देणार नाही. पण सुनेत्रा वहिनींची प्रतिक्रिया मात्र बोलकी आहे.

हेही वाचा :

  1. 'सलमान खान गोळीबार ते मावळ शेतकरी गोळीबार"; राजकारण्यांनी काढलं सर्वच उकरुन - Pune Lok Sabha Election 2024
  2. धैर्यशील मोहिते पाटलांच्या हातात 'तुतारी'; भाजपाला मोठा धक्का, कसंय माढ्याचं समीकरण? - Dhairyasheel Mohite Patil joins NCP
  3. गेल्या 50-60 वर्षांत काँग्रेसला करता आलं नाही ते मोदींनी केलं - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Lok Sabha Election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details