महाराष्ट्र

maharashtra

नितीन गडकरींनी नागपूर लोकसभेसाठी महायुतीकडून भरला उमेदवारी अर्ज, 5 लाखांनी विजयी होण्याचा गडकरींना विश्वास - Nitin Gadkari filed nomination

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 27, 2024, 4:34 PM IST

Updated : Mar 27, 2024, 5:39 PM IST

Nitin Gadkari filed nomination : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांनी आज आपला लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मोठ्या प्रमाणात समर्थकांची गर्दी होती. तसंच, आमचा नक्की विजय होईल असा दावाही उपस्थित नेत्यांनी केला.

नितीन गडकरी अन् राजू पारवे यांनी महायुतीकडून उमेदवारी अर्ज भरला
नितीन गडकरी अन् राजू पारवे यांनी महायुतीकडून उमेदवारी अर्ज भरला

नितीन गडकरी लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना

नागपूर :Nitin Gadkari filed nomination: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे (Raju Parve Ramtek Lok Sabha) हे आहेत. या दोघांनी आज बुधवार (दि.27) मार्च नामांकन दाखल केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते खासदार प्रफुल पटेल, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती. यावेळी सुरुवातीला संविधान चौकात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला नितीन गडकरी (Nitin Gadkari Lok Sabha candidate) यांनी अभिवादन केलं. यावेळी, संविधान चौकात 'कहो दिल से नितीनजी फिर से', अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रांमधील संघटनांनी नितीन गडकरी यांचं ठिकठिकाणी स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

21083029

'नितीन गडकरी हे नागपूरचे नव्हे तर देशाचे वैभव' : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचण्यापूर्वी आकाशवाणी चौकात सभा झाली. या सभेनं कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारला. महिलांनी फुगडी खेळून तर युवकांनी गाण्यांच्या तालावर ठेका धरून आनंद व्यक्त केला. या सभेला रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, आमदार आशीष जयस्वाल, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, भाजपाचे ज्येष्ठ नेते संजय भेंडे आदींची उपस्थिती होती. खासदार प्रफुल पटेल यांनी नितीन गडकरी हे नागपूरचे नव्हे तर देशाचे वैभव असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढले.

नितीन गडकरी लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना

5 लाखांचं मताधिक्य द्या : नितीन गडकरी म्हणाले, माझे कार्यकर्तेच मला लढण्याची ऊर्जा देतात. गेल्या दहा वर्षांमध्ये 1 लाख कोटी रुपयांची कामं नागपूर लोकसभा मतदारसंघात झालीत. पण या कामांचं श्रेय माझं किंवा देवेंद्रजींचं नसून हजारो कार्यकर्त्यांचं आहे. निवडणुकीत विजय निश्चित आहे. 75 टक्के मतदानासह 5 लाख मतांनी मला निवडून द्या असंही गडकरी यावेळी म्हणाले आहेत.

नितीन गडकरी लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना

हे केवळ ट्रेलर आहे : यंदा नितीन गडकरी रेकॉर्डब्रेक मतं मिळवून विक्रम प्रस्थापित करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, गडकरींनी गेल्या दहा वर्षांमध्ये जे काम केलं आहे, ते केवळ ट्रेलर आहे. पुढील पाच वर्षांत महाराष्ट्र आणि देश आणखी बदललेला असेल.' या निवडणुकीत विरोधकांचे बारा वाजविल्याशिवाय राहणार नाहीत, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

Last Updated :Mar 27, 2024, 5:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details