महाराष्ट्र

maharashtra

कर्नाटकच्या वऱ्हाडावर काळाचा घाला; क्रूझर ट्रॅव्हल्सवर आदळून 5 जण ठार, तर 15 जण जखमी - Sangli Road Accident

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 18, 2024, 8:05 AM IST

Sangli Road Accident : कर्नाटक राज्यातील वऱ्हाडाच्या क्रूझर कारला सांगलीत भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील 5 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. हे वऱ्हाडी सांगलीतील सावर्डे या गावात लग्नासाठी येत होते, मात्र त्यांच्यावर काळानं घाला घातला.

Sangli Road Accident
संपादित छायाचित्र

सांगली Sangli Road Accident : कर्नाटकच्या वऱ्हाडाची क्रूझर कार खासगी ट्रॅव्हल्सवर आदळून झालेल्या भीषण अपघातात 5 वऱ्हाडी ठार झाले. हा भीषण अपघात विजापूर गुहागर महामार्गावर बुधवारी रात्री जांभूळवाडी परिसरात घडली. क्रूझरनं खासगी ट्रॅव्हल्सला पाठीमागून भीषण धडक दिल्यानं क्रूझरचा पुढचा भाग चक्काचूर झाला. अपघातानंतर क्रूझर गाडीनं पेट घेतल्यानं मोठा हाहाकार उडाला. ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत घटनास्थळावर बचावकार्य केलं.

वऱ्हाडाच्या क्रूझर कारला सांगलीत भीषण अपघात

कर्नाटकच्या वऱ्हाडावर काळाचा घाला :कर्नाटक राज्यातील बागलकोटमधील जमखंडी इथलं वऱ्हाड सांगलीमधील तासगाव तालुक्यातील सावर्डे इथं येत होतं. या लग्नासाठी दोन क्रूझरमधून वऱ्हाडी सांगलीकडं बुधवारी सायंकाळी येत होते. यावेळी जांभूळवाडी गावाजवळ क्रूझरनं खासगी ट्रॅव्हल्सला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात क्रूझर कारचा पुढील भाग चक्काचूर झाला. या भीषण अपघातात क्रूझरमधील 5 जण जागीच ठार झाले. भीषण अपघात झाल्यानंतर वऱ्हाड्यांनी एकच आक्रोश व्यक्त केले.

वऱ्हाडाच्या क्रूझर कारला सांगलीत भीषण अपघात

अपघातातील मृतदेह काढण्यात अडचणी :क्रूझरचा अपघात झाल्यानंतर गाडीचा चक्काचूर झाल्यानं मृतदेह बाहेर काढण्यात मोठ्या अडचणी आल्या. अपघातानंतर क्रूझरनं पेट घेतल्यानं मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होता. मात्र घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाला पाचारण केलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत मृतदेह बाहेर काढून बचावकार्य केलं.

वऱ्हाडाच्या क्रूझर कारला सांगलीत भीषण अपघात

तीन जणांची प्रकृती गंभीर :क्रूझरनं खासगी ट्रॅव्हल्सला पाठीमागून धडक दिल्यानं झालेल्या भीषण अपघातात 5 नागरिकांचा बळी गेला आहे. या अपघातात इतर 10 ते 11 नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. मात्र यातील तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. गंभीर जखमी झालेल्या नागरिकांना प्राथमिक उपचारासाठी ढालगाव आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं होतं. मात्र प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना मिरज इथल्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

लग्नाचा रुखवत विखुरला रस्त्यावर :कर्नाटकच्या बागलकोट जिल्ह्यातून हे वऱ्हाडी सांगलीतील सावर्डे इथं येत होते. यातील नवरीला स्विफ्ट कारनं आणलं जात होतं. तर इतर वऱ्हाडी हे दोन क्रूझर गाड्यांमधून येत होते. अपघातग्रस्त गाडीत 14 ते 15 वऱ्हाडी बसवण्यात आल्याची माहिती घटनास्थळावरील नागरिकांनी दिली आहे. या वऱ्हाड्यांनी आपल्यासोबत लग्नात वापरण्यात येणाऱ्या रुखवताचं सामान आणलं होतं. मात्र अपघातानंतर हा सगळा रुखवत रोडवर विखुरला होता. रात्रीची वेळ असल्यानं मृतदेह पाहून नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. घटनास्थळावर मोठं विदारक चित्र असल्यानं स्थानिक ग्रामस्थांनीही हळहळ व्यक्त केली. अपघातानंतर घटनास्थळावर पोलीस दाखल झाले असून त्यांनी मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवले आहेत.

हेही वाचा :

  1. शिर्डीत पायी पालखीचा भीषण अपघात; एका महिलेचा जागीच मृत्यू तर दोन गंभीर - Palkhi Accident in Shirdi
  2. फतेहपूरमध्ये झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा होरपळून मृत्यू - accident at Fatehpur
  3. सुट्टीच्या दिवशी भरविली शाळा; बस पलटी होऊन सात विद्यार्थ्यांचा मृत्यू - Haryana School Bus Accident

ABOUT THE AUTHOR

...view details