महाराष्ट्र

maharashtra

मेळघाटात कोलकास हत्ती सफारी; कोलकासला पर्यटकांची पसंती, इंदिरा गांधींनाही घातली होती भुरळ

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 6, 2024, 12:52 PM IST

Updated : Mar 6, 2024, 2:20 PM IST

Kolkas Elephant Safari In Melghat : कोलकास इथली हत्ती सफारी ही पर्यटकांना मोठी भुरळ घालते. मेळघाटात येणाऱ्या पर्यटकांना हत्तीवर बसून जंगल सफारी करता येते. कोलकास इथं माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही भेट देऊन इथं मुक्काम केला होता.

Kolkas Elephant Safari In Melghat
मेळघाटात कोलकास हत्ती सफारी

मेळघाटात कोलकास हत्ती सफारी

अमरावती Kolkas Elephant Safari In Melghat : हत्ती पहायचा, हत्तीवर बसायचं आणि हत्तीवरुन जंगलाची सफारी करायची कोणाला हौस सगळ्यांना असते. मात्र हत्तीवर बसण्याचं स्वप्न अपूर्ण असेल त्यांच्यासाठी अमरावती जिल्ह्यात मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात येणारं कोलकास हे एकमेव हत्ती सफारीचं ठिकाण आहे. हत्तीवर बसून हलत-डुलत जंगल पाहण्याचा आगळावेगळा आनंद घेण्यासाठी मेळघाटातील कोलकास हे ठिकाण पर्यटकांचं खास पसंतीचं आहे.

मेळघाटात कोलकास हत्ती सफारी

चार पैकी एक हत्ती सेवानिवृत्त :कोलकास इथं जयश्री, सुंदरमला, लक्ष्मी आणि चंपाकली हे चार हत्ती आहेत. यापैकी जयश्री ही 80 वर्षाची झाली असून ती पर्यटकांना जंगल सफारीच्या सेवेतून निवृत्त झाली आहे. "या ठिकाणी दहा किलो कणिक त्यामध्ये अर्धा किलो गूळ, अर्धा किलो तेल आणि अर्धा किलो मीठ टाकून एका मोठ्या कोपरामध्ये मोठी पोळी केली जाते आणि ती रोज एका हत्तीला दिली जाते. एकूण चार हत्तींच्यासाठी अशीच व्यवस्था केली जाते. एका हत्तीवर महिन्याला 25 हजार पाचशे रुपये खर्च येतो," अशी माहिती व्याघ्र प्रकल्पाच्या वतीनं या हत्तींच्या व्यवस्थापनासाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी शेखलाल धाराशिंबे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

मेळघाटात कोलकास हत्ती सफारी

प्रत्येक ऋतूत वेगळा अनुभव :कोलकास इथं सकाळी नऊ ते बारा आणि दुपारी तीन ते सायंकाळी पाच वाजतापर्यंत एका हत्तीवर चार जणांना सफारीसाठी नेले जाते. अर्धा तासाच्या या जंगल सफारी दरम्यान घनदाट जंगलातून हत्ती सफारीचा आनंद पर्यटक घेतात. आता उन्हाळ्यात पानगळ झाल्यामुळं हत्ती सफारीचा आगळावेगळा फील येतो. जंगल ओसाड असल्यामुळं चितळ, रानगवे आणि नशीब बलवत्तर असेल तर वाघाचं दर्शन देखील या हत्ती सफारीदरम्यान पर्यटकांना घडते. पावसाळ्यात हत्ती सफारीचा सर्वाधिक आनंद पर्यटक लुटतात. जंगलात काही ठिकाणी मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी आणि चिखल राहत असल्यामुळे अशा भागातून हत्ती गेला तर हत्तीवर बसणारे पर्यटक कधी आडवे होतात तर चिखलात फसलेला पाय हत्ती बाहेर काढतो, त्यावेळी एका बाजूनं खालून वर झटक्यानं येण्याचा थरारक अनुभव देखील पर्यटकांना येतो.

हत्तींना आंघोळ घालण्याचीही पर्यटकांना संधी :हत्ती सफारीसाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वतीनं चार व्यक्तींसाठी आठशे रुपये दर आकारण्यात येत आहे. यासोबतच दुपारी अडीच ते तीन दरम्यान लगतच्या सिपना नदीत हत्ती आंघोळीला जातात, त्यावेळी पर्यटकांना हत्तींची आंघोळ घालायची असेल, तर प्रति व्यक्ती 25 रुपये द्यावे लागतात. यासह सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान आपल्या हातानं हत्तीला खाऊ घालायचं असेल, तर पर्यटकांना प्रति व्यक्ती 25 रुपये देऊन हत्तीला आपल्या हातानं भरवण्याची संधी मिळते.

कोलकासचं असं आहे वैशिष्ट्य :मेळघाटातील पर्यटन म्हटलं तर अनेकांच्या चिखलदरा आणि सेमाडोह पेक्षाही कोलकास हे अतिशय आवडीचं ठिकाण आहे. मेळघाटात राहणाऱ्या कोरकू जमातीमध्ये वाघाला कुला असं, म्हणतात तर मातीला कासा म्हटलं जाते. यामुळे मेळघाटातील हा परिसर कुलाचा परिसर आणि इथली मातीही कुलाची माती असल्याचं कोरकू बांधव म्हणतात. यामुळेच खाली दरीतून वाहणारी सिपना नदी आणि उंच भागावर घनदाट जंगल असणारा हा परिसर कुलाकासा या नावानं ओळखल्या जायचा. कुलाकासा या शब्दाचा अपभ्रंश होऊन आज हा परिसर कोलकास या नावानं ओळखला जातो.

कोलकासला इंदिरा गांधींनी दिली होती भेट :फार पूर्वी कोलकास हा परिसर सागवानच्या लाकडांची मोठी बाजारपेठ होती. या ठिकाणी संपूर्ण देशभरातून लाकडांचे व्यापारी यायचे. इंग्रज काळात या ठिकाणी असणाऱ्या छोट्याशा विश्रामगृहाचं 1970 मध्ये नूतनीकरण केल्यावर हिमाचल प्रदेशचे वनमंत्री पद देव तसेच महाराष्ट्राचे वनमंत्री भाऊसाहेब पटेल यांनी या विश्रामगृहाचं उद्घाटन केलं होतं. देशातील पहिल्या नऊ व्याघ्र प्रकल्पात मेळघाटची घोषणा झाल्यावर 1974 मध्ये देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे कोलकासला आले होते. इंदिरा गांधींच्या कोलकास दौऱ्यामुळेच या विश्रामगृहाचे नूतनीकरण करण्यात आलं होतं.

विश्रामगृहाचं असं आहे वैशिष्ट्य :मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अनेक ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण विश्रामगृह असले, तरी कोलकास येथील विश्रामगृह हे मंत्री, अधिकारी आणि पर्यटकांच्या खास आवडीचं आहे. उंचावर असणाऱ्या या विश्रामगृहाच्या लगतच खोल दरी आहे आणि त्यामधून वाहणाऱ्या सिपना नदीच्या पात्राचं मनमोहक दृश्य या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला मोहित करणारं आहे. विविध पक्षी, रानगवे, चितळ, रानकुत्री आणि अनेकदा वाघाचं सहज दर्शन होऊ शकेल, अशा ठिकाणी हे विश्रामगृह उभारण्यात आलं आहे.

हेही वाचा :

  1. रखरखत्या उन्हात काटेसावर झाडावर बहरली शाल्मली; फुलांमध्ये आहेत औषधी गुणधर्म
  2. मेळघाटात व्याघ्र दर्शन; कोलकास- सेमाडोह परिसरात पर्यटकांनी अनुभवला थरार
  3. एकच कुटुंब असणारे गाव! मेळघाटातील घनदाट जंगलात पिली गावात एकच घर, पाहा व्हिडिओ
Last Updated : Mar 6, 2024, 2:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details