महाराष्ट्र

maharashtra

युती सरकारनं आरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचं पाप केलं - नाना पटोले

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 26, 2024, 10:35 PM IST

Budget session : विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशानाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे आज सोमवार (दि. 26 फेब्रुवारी)रोजी झालेल्या चर्चासत्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मराठा आरक्षण या प्रश्नावर जोरदार खडाजंगी झाली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारला अनेक प्रश्न विचारत अडचणीत आणून धारेवर धरले.

फाईल फोटो
फाईल फोटो

नाना पटोले पत्रकारांशी बोलताना

मुंबई :Budget session : अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांचे पडसाद उमटले. मराठा आरक्षण प्रश्नावर या सरकारनं फसवणूक केली आहे. आरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचं पाप या सरकारनं केलं आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ, असं सांगत कुणबी प्रमाणपत्र वाटून ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्याचा आरोप काँग्रेस आमदार आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सरकारवर केला.

दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? : यावेळी बोलताना पटोले म्हणाले की, "महाराष्ट्रात काय सुरू आहे, समजत नाही. हिम्मत असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे-पाटील यांच्यात काय चर्चा झाली? काय बोलणं झालं ते जाहीर करा, अशी मागणी आहे. मराठा आरक्षण मविआ सरकारनं टिकवलं नाही, असा आरोप सरकार करत आहे. पण मविआ सरकार असताना मराठा आरक्षण उपसमितीत एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण, अजित पवारही होते. मग ही लोकंही त्याला जबाबदार नाहीत का?" असा प्रश्नही नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. "आज हेच एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. खापर मात्र मविआ सरकारवर फोडत आहेत," असा घणाघातही पटोलेंनी सरकारवर केला आहे.

वाढत्या ड्रग्जसाठी फडणवीसच जबाबदार : "महाराष्ट्रात ड्रग्जचा काळा बाजार जोरात सुरू आहे. त्यात गृहमंत्रालयाचा मोठा सहभाग दिसत आहे. तरुण पिढीला आणि युवकांना ड्रग्जचं विष देऊन बरबाद केलं जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज कुठून येतं? हे सांगितलं जात नाही. पण गुजरातच्या मुंद्रा बंदरातून येत आहे, एवढे मात्र नक्की. गुजरातमधील मुंद्रा बंदर कोणाचं आहे? हे सर्वांना माहिती आहे. या बंदरात शेकडो-हजारो टन ड्रग्ज अनेकदा सापडले आहे. नाशिकमधील ड्रग्ज प्रकरणही आम्ही उचलून धरलं होतं. तरुणाईमध्ये ड्रग्जचं विष पसरवलं जात आहे. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं पाहिजे, "अशी टीका पटोलेंनी फडणवीसांवर केली.

ट्रिपल इंजिन सरकारने सर्वांनाच रस्त्यावर आणले :पुढे बोलताना पटोले म्हणाले की, "राज्यात अनेक प्रश्न आहेत. सरकारी कर्मचारी रस्त्यावर आहेत. निर्यातबंदी उठवली म्हणून बातम्या पसरवल्या. पण, कांदा अजून सडत आहे. राज्यात सध्या डॉक्टर संपावर आहेत. तरुण मुलं रस्त्यावर आहेत. पेपरफुटीला सरकारी अधिकारी जबाबदार आहेत. याचे पुरावे मुलांनी दिले आहेत. शिंदे-फडणीस-पवारांच्या ट्रिपल इंजिन सरकारने राज्यातील जनतेला रस्त्यावर आणलं आहे. भाजपाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. त्याचेच परिणाम देश भोगत आहे, असा घणाघात नाना पटोलेंनी सरकारवर केला."

झारीतला शुक्राचार्य कोण? "आंतरवली सराटीत सौम्य लाठीचार्जचे आदेश फडणवीसांनी दिले होते. हे त्यांनी मान्य केले. पण जरांगे पाटलांवर लाठीचार्ज करण्याचं कारण काय?, त्यांना उपोषणाला कोणी बसवलं होतं?, महाराष्ट्र पेटवण्याचं काम झालं, त्यावेळी सरकार गप्प का बसलं होतं. या सरकारचा पोलिसांवर दबाव आहे. मागासवर्गीय आयोगावर दबाव होता. या दबावामुळेच आयोगाच्या अध्यक्षासह सदस्यांना राजीनामे द्यावे लागले. शुर्के आयोगातही मेश्राम नावाच्या सदस्यांनी राजीनामा दिला. सरकारचा दबाव प्रत्येक व्यवस्थेवर आहे. खोटे अहवाल सादर करुन निवडणुकीत फायदा उचलण्याचा प्रयत्न आहे," असा हल्लाबोल नाना पटोलेंनी सरकारवर केला.

आम्ही त्यासाठी सरकारला धारेवर धरू : "मराठ्यांची बाजू व्यवस्थित मांडू नका, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच तत्कालीन महाधिवक्ता आशितोष कुंभकोणी यांना सांगितलं होतं. हे कुंभकोणी यांनीदेखील सांगितलं आहे. त्यामुळे झारीतील शुक्राचार्य कोण? हे समोर आलं आहे. आता आरोप प्रत्यारोप, प्रतिउत्तर आणि जाहिरातबाजी बंद करा. जनतेच्या पैशाची उधळपट्टी बंद करा. जनतेला उत्तर द्या. वस्तुस्थिती काय आहे, हे सांगण्याची सरकारची जबाबदारी आहे. आम्ही त्यासाठी सरकारला धारेवर धरू," असं नाना पटोले म्हणाले आहेत.

हेही वाचा :

1२४ दिवसांच्या उपचारानंतर महेश गायकवाड ठणठणीत, कार्यकर्त्यांच्या गराड्यात पोहोचले घरी

2आमरण उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगेंनी पुन्हा साधला फडणवीसांवर निशाणा; म्हणाले...

3शरद पवारांमुळे मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही, 23 मार्चला बारामतीतील निवास्थानी मोर्चा काढणार - नामदेव जाधव

ABOUT THE AUTHOR

...view details