महाराष्ट्र

maharashtra

लोकसभेच्या तोंडावर अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा, दिवसभरात काय असणार कार्यक्रम?

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 5, 2024, 10:39 AM IST

Updated : Mar 5, 2024, 10:48 AM IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते छत्रपती संभाजीनगर, जालना आणि अकोला जिल्ह्यातील विविध कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. लोकसभेच्या तोंडावर हा दौरा असल्यानं याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे.

Amit Shah Maharashtra Visit updates
Amit Shah Maharashtra Visit updates

अकोला -महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नसताना आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राज्यातील तीन जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या भेटीदरम्यान भाजपा पदाधिकाऱ्यांशी चर्चा, सभा व निवडणुकीनिमित्त पक्षाची रणनीती आखण्याच्या दृष्टीनं आढावा, असा गृहमंत्र्यांचा भरगच्च कार्यक्रम आहे.

गृहमंत्र्यांचा छत्रपती संभाजीनगरमधील दिवसभरातील कार्यक्रम

  • केंद्रीय गृहमंत्री शाह हे छत्रपती संभाजीनगर येथून सकाळी सव्वा दहा वाजता विशेष हेलिकॉप्टरद्वारे अकोला येथे जातील. तिथे विदर्भातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न होईल. यामधे पाचशे पदाधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. विदर्भातील सर्व लोकसभा मतदार संघात निवडणुकीबाबत मार्गदर्शन यावेळी ते करणार आहेत.
  • दुपारी एक ते दोनच्या सुमारास शहा यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा सुरू होईल. यामधे जळगाव येथे नंदुरबार, धुळे जळगाव असे क्लस्टर बाबत एकत्रित युवकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तिथेही युवा कार्यकर्त्यांना पक्षाचे ध्येय धोरण, प्रचारात प्रामुख्याने घेण्यात येणारे मुद्दे याबाबत ते मार्गदर्शन करतील.
  • सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास अमित शाह हे छत्रपती संभाजीनगर शहरात येतील. तिथून साडेसहाच्या सुमारास हॉटेल रामा येथून सभास्थळी निघतील.
  • क्रांतीचौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे सभास्थळी त्यांचं आगमन होईल. त्यानंतर सभा संपल्यानंतर ते विशेष विमानानं मुंबईच्या दिशेनं जाणार आहेत.

गृहमंत्र्यांचा अकोला येथील दिवसभरातील कार्यक्रम

  • अमित शाह हे सकाळी साडेअकरा वाजता हेलिकॉप्टरनं अकोला येथे येणार आहेत. शिवनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करणार आहेत. तेथून लगेच ते हॉटेल जलसा येथे थांबणार आहेत. हॉटेल जलसा येथे दुपारी बारा वाजता पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे. ही बैठक जवळपास दीड तास चालणार आहे. या बैठकीनंतर ते जेवण केल्यानंतर जळगाव येथे जाणार आहेत. जवळपास सव्वादोन वाजता ते अकोला येथून निघणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यात फक्त भाजपा पदाधिकाऱ्यांच्या सोबतच बैठकीचं नियोजन असल्याची माहिती समोर येत आहे.
  • अमित शाह हे बीएसएफ हॅलिकॉप्टरनं दुपारी तीन वाजता जळगावमध्ये पोहोचणार आहेत. दुपारी तीन वाजून २० मिनिटाला सागर पार्क जिल्हापेठ जळगाव येथील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार-विशेष म्हणजे, या दौऱ्यात गृहमंत्री हे अकोला लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातील उमेदवारांबाबत निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विद्यमान खासदार संजय धोत्रे हे गेल्या अडीच वर्षांपासून अस्वस्थ असल्यामुळे त्यांच्याऐवजी अकोला लोकसभा मतदारसंघांमध्ये कोणता भाजपचा चेहरा असावा, या संदर्भात ही बैठक असणार आहे. जिल्ह्यातील भाजपमध्ये असलेल्या गटातटाच्या राजकारणामुळे खुद्द केंद्रीय गृहमंत्री शाह हे येथील उमेदवाराच्या संदर्भामध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे समजते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. गृहमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त तिन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. राज्य राखीव दलही तैनात करण्यात आलं आहे.

हेही वाचा-

  1. मराठा आंदोलक आक्रमक; संभाजीनगरमध्ये अमित शाह यांच्या सभेचं बॅनर फाडलं; आंदोलकांची घोषणाबाजी
  2. गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर; विमानतळावर जंगी स्वागत, सभेला तगडा पोलीस बंदोबस्त
Last Updated : Mar 5, 2024, 10:48 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details