मुंबई Vijay wadettiwar On State Government :महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेतील खेचून सत्तेत बसलेले सरकार निवडणुकीपूर्वी जोरदार वसुली करत असल्याचा हल्लाबोल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. राज्याला महायुतीतील तिन्ही नेत्यांनी खड्ड्यात घातलं असल्याची घणाघाती टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी (5 फेब्रुवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.
इजा-बिजा-तिजा सरकार महाराष्ट्राला उद्ध्वस्त करेल :यावेळी बोलत असताना विजय वडेट्टीवार म्हणाले की,"महाराष्ट्राला पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र म्हणून ओळख आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही ओळख बदलली आहे. ठोकेबाज महाराष्ट्र म्हणून ओळख निर्माण झाली. ठाण्यातील घटनेमुळं महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली झुकली आहे. गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेले आरोपांनी सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तींची गरिमा धुळीस मिळवली आहे. गुंडागिरीला राजश्रय मिळत आहे. सत्तेत बसलेल्यांची पोरं कष्टानं उभे झालेले नेत्यांना संपवायला निघाली का? असा प्रश्न उपस्थित होतो. पक्षात गुंडांची स्पेशल भरती या सरकारनं सुरू केलीय. तसंच इजा-बिजा-तिजा सरकार महाराष्ट्राला उद्ध्वस्त करेल", असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
वसुलीबाज सरकार :पुढं ते म्हणाले की, "राज्यातील सरकारमधील कटक पक्षांमध्ये वसुलीसाठी जणू काही स्पर्धा लागली आहे. राज्य अभियंता संघटनेनं मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून संरक्षणाची मागणी केली आहे. या सरकारमध्ये कंत्राटदार सुरक्षित नाहीय. महायुतीतील गुंड आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या वसुलीमुळं त्रस्त होऊन राज्यातील कंत्राटदारांना सरकारकडं संरक्षण मागण्याची वेळ येत आहे. अशा प्रकारची मागणी राज्यात पहिल्यांदा होत आहे. यामुळं राज्यात कायदा आणि सुवस्थेची काय परिस्थिती निर्माण झाली, हे लक्षात येतं. राज्यातील सरकार खोके सरकार असून आता कंत्राटदारांनवर खोके देण्याची वेळ आली आहे. खंडणी मागण्याची नवीन प्रथा महायुती सरकारनं राज्यात आणली आहे."