महाराष्ट्र

maharashtra

"आता मोदी पंतप्रधान नाहीत, आचारसंहितेचा भंग केल्यामुळं भाजपावर कारवाई व्हावी"; नेमकं काय म्हणाले संजय राऊत? - Lok Sabha election 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 1, 2024, 2:31 PM IST

Sanjay Raut : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आज पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावरुन टीका केलीय. निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यानं मोदी सध्या पंतप्रधान नाहीत, असं त्यांनी म्हटलंय. आचारसंहितेचा भग केल्यानं भाजपावर कारवाई व्हावी, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते राऊत यांनी केली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

Sanjay Raut, Narendra Modi
"आता मोदी पंतप्रधान नाहीत, आचारसंहितेचा भंग केल्यामुळं भाजपावर कारवाई व्हावी"; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

मुंबई Sanjay Raut on Conde of conduct : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. यावरुन शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि मोदी यांच्यावर निशाणा साधलाय. खासदार संजय राऊत म्हणाले, "सरकारी खर्चातून मोदी जर मुंबईत येत असतील तर हा आचारसंहितेचा भंग आहे. यामुळं भाजपावर कारवाई झाली पाहिजे. मात्र, कारवाई शिवसेना, काँग्रेस किंवा अन्य पक्षावर होईल भाजपावर होणार नाही, असं म्हणत संजय राऊतांनी टीका केलीय. "मोदी हे आता पंतप्रधान नाहीत. मोदींच्या दौऱ्याचा खर्च भाजपानं करावा. भाजपा हा देशातील सर्वांत मोठा भ्रष्ट पक्ष आहे. सरकारी पैशातून मोदींचे दौरे सुरू आहेत. भाजपानं आचारसंहितेचं उल्लंघन केलंय. त्यामुळं भाजपावर कारवाई केली पाहिजे, असंही ते म्हणाले.

जॉनी लिव्हरनंतर गुजरात लिव्हर : पुढं बोलताना संजय राऊत म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ-मोठ्यानं सांगत होते की, मी खाणार नाही. खाऊ देणार नाही. भ्रष्टाचारांना सोडणार नाही. मात्र भ्रष्टाचाराचे आरोप असणारे प्रफुल्ल पटेल आणि हसन मुश्रीफ अशी अनेक नावं आहेत. त्यांच्यावर आरोप करून ईडीची चौकशी लावली. मात्र, ते भाजपाच्या वळचणीला गेल्यावर त्यांच्या सर्व फायली बंद केल्या. चौकशी बंद झाली. त्यामुळं मोदींनी भ्रष्टाचाऱ्यांवर काय कारवाई केली हे सांगावं." तसंच मला वाटतं जॉनी लिव्हर हे मनोरंजन करतात. मात्र, आता मोदी हे जॉनी लिव्हरनंतर गुजरात लिव्हर या नावानं भ्रष्टाचारावरुन आमचं मनोरंजन करत आहेत, असा टोला यावेळी संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींना लगावला.

देशात सर्वात भ्रष्ट म्हणजे भाजपा : मोदींच्या मेरठमधील वक्तव्यावरुन राऊत म्हणाले, "मोदी मेरठमधील सभेत सांगत होते की, मी भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही. मात्र मोदी हे भाषण करत असताना त्यांच्या आजूबाजूला कित्येक भ्रष्टाचारी बसले होते. दररोज 5 भ्रष्टाचारी त्यांच्या पक्षात सामील होत आहेत. मग मोदींनी यांच्यावर काय कारवाई केली? असा सवाल यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केला. तसंच इलेक्टोरोल बॉण्डवरती भाजपानं अजून भूमिका स्पष्ट केलेली नाही. भाजपानं यावर आपलं मत मांडावं. कारण यामध्ये सर्वात मोठा भ्रष्टाचार भाजपानं केलाय. त्यांना सर्वाधिक निधी मिळालेला आहे. तेच दुसऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करता आहेत. भाजपा हा सर्वांना मूर्ख बनवत आहे. भाजपा पक्ष हा देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचारी पक्ष आहे."

निवडणूक आयोगानं मोदींना बिल पाठवलं पाहिजे : मोदींवर निशाणा साधताना राऊत म्हणाले, "देशात किंवा राज्यात जेव्हा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतात, तेव्हा राज्यातील मुख्यमंत्री हा कार्यवाहक म्हणून असतो. देशातील पंतप्रधान देखील कार्यवाहक पंतप्रधान असतो. परंतु, सध्या निवडणूक जाहीर झाल्यानंतरही पंतप्रधान मोदी हे सरकारी यंत्रणांचा वापर करत आहेत. दौऱ्यासाठी सरकारी हेलिकॉप्टर, पोलीस, सुरक्षा यंत्रणा याचा वापर करत आहेत. त्यामुळं सरकारी यंत्रणांचा वापर केल्यामुळं जेवढा खर्च झाला आहे. त्याचं निवडणूक आयोगानं त्यांना बिल पाठवावं." तसंच मोदींच्या एका दौऱ्याचा 25 कोटी एवढा खर्च आहे. जर पंतप्रधान नसतानाही सरकारी यंत्रणाचा असा गैरवापर आणि सरकारी पैशाचा वापर होत असेल तर हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे, असं राऊत म्हणाले. तसंच आचारसंहितेचा भंग केला म्हणून भाजपावर कारवाई झाली पाहिजे," अशी मागणी सुद्धा यावेळी राऊत यांनी केली.

मुंबईत काय विकायचं ठेवलं : मुंबईला येऊन मोदी काय करणार? मुंबईतील जमिनी शोधणार आहेत का? त्या कुठे आणि किती बाकी आहेत. हे पाहणार आहेत का? मागील काही दिवसांत मोदी आणि अमित शाहा यांनी मुंबई विकली आहे. धारावी विकली आहे. त्यांचे मित्र गौतम अदानी यांना धारावीचा भूखंड विकला आहे. मुंबईतील अनेक भूखंड विकले आहेत. मुंबईतील अनेक उद्योग गुजरातला पळवले. त्यामुळं अजून काय इथून विकायचे बाकी मोदींनी ठेवले आहे? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. "मुंबईत मोदी येऊन दहा सभा घेत आहेत. दहा काय किंवा शंभर सभा घेऊ दे. परंतु, मुंबईतील जनतेनं ठरवलं आहे की, आता भाजपाला तडीपार करायचं आहे," अशी टीका संजय राऊत यांनी भाजपावर केलीय.

तुम्हाला शिवसेनेला मुजरे घालावे लागतील : ठाकरे गट हे दिल्लीत जाऊन मुजरे घालत आहे, अशी टीका भाजपानं तुमच्यावर केलीय, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला असता, "भाजपा हे कुठे आणि कोणाला मुजरे घालत आहे, ते मला माहित नाही. मात्र, आता त्यांना एक दिवस शिवसेनेला मुजरा घालावा लागणार एवढे नक्की आहे," असं राऊत म्हणाले. तसंच देवेंद्र फडणवीस आणि भाजपानं मणिपूरला जावं. कश्मीरला जावं. मणिपुरातील ज्या महिलांवर अत्याचार होत आहे. अन्याय होत आहे. तिथं जाऊन तिथली परिस्थिती पाहावी. आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चानं तुम्हाला तिकडे पाठवतो. तुमची तयारी आहे का? उगाच वाटेल ते बोलू नका," असं आव्हान संजय राऊतांनी भाजपाला दिलंय.

हेही वाचा :

  1. 'संजय, कितना झूठ बोलोगे?'; प्रकाश आंबेडकरांचा ट्विट करून राऊतांवर हल्लाबोल - Prakash Ambedkar On Sanjay Raut
  2. शिवसेना उद्धव ठाकरे गट राज्यात लढवणार लोकसभेच्या 22 जागा, जागावाटपात सांगलीचं मैदानही मोकळं - Shiv Sena Uddhav Thackeray

ABOUT THE AUTHOR

...view details