ETV Bharat / state

शिवसेना उद्धव ठाकरे गट राज्यात लढवणार लोकसभेच्या 22 जागा, जागावाटपात सांगलीचं मैदानही मोकळं - Shiv Sena Uddhav Thackeray

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 27, 2024, 3:12 PM IST

आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने 22 जागा लढवण्याचं ठरवलंय. यापैकी 17 उमेदवारांची घोषणा आज करण्यात आली. उर्वरीत 5 उमेदवारांची घोषणा येत्या दोन दिवसांत केली जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा एकमेव उमेदवार म्हणून सांगलीतून चंद्रहार पाटील यांची निवड केल्याचं उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.

Shiv Sena Uddhav Thackeray group
उद्धव ठाकरे गट

मुंबई - शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे ( उबाठा ) गटाने लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या १७ उमेदवारांची घोषणा आज केली आहे. यामध्ये सांगली तसेच मुंबई उत्तर पश्चिम च्या जागेवर ठाकरे गटाने उमेदवार दिल्यानं काँग्रेस नाराज आहे. परंतु आमच्यात कुठलीही नाराजी नसून हे सर्व एकमताने ठरवलेलं असल्याचं उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. उमेदवारांची यादी घोषित झाल्यानंतर ते माध्यमांशी मुंबईत बोलत होते.


काँग्रेस व आमच्यात कुठलाही वाद नाही

याप्रसंगी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून लोकसभेसाठी १७ उमेदवारांच्या नावांची घोषणा आज करण्यात आली आहे. एकूण २२ जागा शिवसेना लढणार आहे. पुढील पाच नावे येत्या दोन दिवसात जाहीर केले जातील. हातकणंगले येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीच्या पाठिंबा मागितला आहे. त्याबाबत आम्ही बसून विचार करू. रामटेकची जागा आम्ही सातत्याने लढत आहोत व जिंकत आहोत त्या जागेवर काँग्रेस पक्षानं आपला उमेदवार घोषित केला व जाहीरही केला, परंतु आम्ही त्यावर आपत्ती घेतली नाही. त्या बदल्यात आम्ही ईशान्य मुंबईची जागा घेतली."



बाळासाहेब आंबेडकर यांच्यासाठी अजूनही दारं उघडी

सांगलीच्या जागेवर काँग्रेसने दावा केला होता परंतु या जागेवर शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. या विषयावर बोलताना संजय राऊत म्हणाले की,
"चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी मिरज मध्ये पहिली प्रचार सभा घेतली. त्या सभेत त्यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली. कोल्हापूर ही आमची हक्काची जागा होती. परंतु छत्रपती शाहू महाराज यांचे नाव पुढे आल्याबरोबर ते काँग्रेसच्या चिन्हावर लढताहेत हे सांगितल्यानंतर आम्ही त्यामध्ये कुठलाही वादविवाद न करता ती जागा काँग्रेससाठी सोडली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे एखादी जागा असावी व ती विजयी होणारी जागा असावी म्हणून आम्ही सांगलीच्या जागेची मागणी केली व तो विषय आता संपलेला आहे. तसेच आम्ही अजूनही बाळासाहेब आंबेडकर यांच्या निर्णयासाठी थांबलेलो आहोत. आम्ही त्यांना पाच जागांचा प्रस्ताव कालपर्यंत दिला आहे. अजूनही त्यांच्याशी चर्चा होऊ शकते, अशी आमच्या तिन्ही पक्षाची भूमिका आहे. देशाच्या लढाईत प्रकाश आंबेडकर हे आमच्या बरोबर असावेत ही संपूर्ण तमाम महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे. प्रत्येक जागा ही संघर्षाची असते. लढण्याची जिद्द व उमेद असेल तर आपण प्रत्येक जागा जिंकू शकतो. अकोल्यासह चार जागा आम्ही प्रकाश आंबेडकर यांना सोडलेल्या आहेत. त्या जागा आम्ही जिंकू या जिद्दीने आम्ही उतरणार आहोत."



पंतप्रधानांबद्दल कुठलेही आक्षेपार्ह विधान केलं नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्या बाबत संजय राऊत यांच्याविरुद्ध भाजप नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. या विषयावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "मी कुठलेही आक्षेपार्ह विधान सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विषयी केलेलं नाही आहे. दिल्लीचा कारभार हा तूगली पद्धतीचा आहे किंवा औरंगजेब पद्धतीचा आहे असं म्हणणं यात आक्षपार्ह काय आहे. कोणी याला हिटलरशाही म्हणतो. पण आम्ही महाराष्ट्रात आहोत आम्ही औरंगजेबाचा कारभार म्हणतो. त्यात आक्षेपार्ह काय आहे?", असे संजय राऊत म्हणाले आहेत.



मुंबई ईशान्यमध्ये अमोल कीर्तीकरच

शिवसेना उबाठा गटाचे नेते व मुंबई उत्तर पश्चिममधून शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना ईडीने खिचडी घोटाळ्या संदर्भात समन्स पाठवले आहे. या विषयावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "अमोल कीर्तिकर यांच्या पाठीशी संपूर्ण शिवसेना ठामपणे उभी राहणार. तिथे त्यांचीच उमेदवारी कायम राहील. मुंबई ईशान्यची जागा आम्हीच जिंकू", असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच जे दिल्लीत केजरीवाल यांच्याबाबत होत आहे तेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत होत आहे. तुम्ही कितीही ईडी, सीबीआय किंवा आणखीन काही लावा ही तुमची सर्व हत्यारं भविष्यामध्ये बोथट ठरणार आहेत. केजरीवाल मुख्यमंत्री म्हणून अजूनही तुरुंगातून काम करत आहेत व त्यांची लोकप्रियता अजून जास्त झाली आहे, असेही राऊत म्हणाले.

हेही वाचा -

ईडीच्या नोटीससह लोकसभेची उमेदवारी एकाच दिवशी, ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकर यांच्या घरी तपास संस्थांकडून झाडाझडती - Amol Kirtikar

प्रकाश आंबेडकरांच्या भेटीनंतर मनोज जरांगे म्हणाले 'आता आम्हाला सत्तेत जायचंय'; लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय भूकंप होणार? - Manoj Jarange Patil

संजय राऊतांविरुद्ध भाजपाची निवडणूक आयोगाकडं तक्रार; पंतप्रधान मोदींसंदर्भातलं विधान भोवण्याची शक्यता - BJP complains against Sanjay Raut

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.