महाराष्ट्र

maharashtra

Water Issue: धरणांच्या तालुक्यात भीषण पाणी टंचाई; दोनशेहून अधिक योजना केवळ कागदावरच पुर्ण

By

Published : Apr 17, 2023, 10:48 AM IST

राज्यात अनेक भागात उन्हाळयात पाणी टंचाई जाणवत असल्याने गाव आणि वाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूर तालुक्याच्या नशिबी,अनेक वर्षापासून उन्हाळयात भीषण पाणी टंचाई निर्माण होऊन महिलांना पाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटरपर्यत डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करावी लागते.

Water Issue
वाड्यांवर 26 टँकरद्वारे पाणीपुरवठा

धरणांच्या तालुक्यात भीषण पाणी टंचाई

ठाणे :राज्यात उन्हाचा चटका वाढला, त्यामुळे पाण्याची मागणी देखील वाढली आहे.पाणी टंचाईवर उपाय म्हणून पाणी पुरवठा विभागाकडून दरवर्षी लाखो रुपये खर्च करून टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरवठा केले जातो. यंदाही २६ पाण्याच्या टँकरद्वारे १२६ गाव - पाड्याना पाणी पुरवठा सुरु आहे. येत्या दिवसात पाणी टंचाईग्रस्त गाव पाड्याची संख्या तिप्पटीने वाढ होणार आहे.



प्रतिदिनी साडे चार हजार दशलक्ष लिटर पाणी पुरवठा:मुंबई, ठाणे महानगराची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यात यंदा पाऊस चांगला झाला तरीही गावात पाणीटंचाई आहे. तालुक्यातील अनेक गावपाड्यांवरील कूपनलिकांनासह विहिरीने तळ गाठला आहे. त्यामुळे गावपाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून, काही गावपाडे वगळता बहुतांशी गावपाड्यांवर दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. यामुळे महिला भगिनींना पाण्याच्या टँकरची वाट बघावी लागत आहे. भातसा, तानसा व वैतरणा या शहापूर तालुक्यातील मोठ्या जलाशयातून मुंबई, ठाणे या दोन महानगरासाठी प्रतिताशी व प्रतिदिनी साडे चार हजार दशलक्ष लिटर प्रमाणे पाणी पुरवठा पोहचते.



सध्याच्या घडीला २६ टँकर द्वारे पाणी पुरवठा :ज्या शहापूर तालुक्यातुन पाणी पुरवठा केला जातो, तो तालुका मात्र तहानलेलाच आहे. शहापूर तालुक्यात सन २०११ च्या जनगणनेनुसार ३ लाख १४ हजार १०३ इतकी लोकसंख्या आहे. तर २२८ महसुल गावांचा समावेश असुन ११० एवढ्या ग्रामपंचायती आहेत. पाणी टंचाई कृती आराखड्यात दरवर्षी गाव पाड्यासह टँकरची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. यंदा एप्रिल महिन्यात पाणी टंचाई सुरू झाली. कसारा दुर्गम भागातील कोठारे - थ्याचापाड्यासह १२६ गाव पाड्याना सध्याच्या घडीला २६ टँकर मंजूर करून त्याद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. तर मे अखेर टँकरचा आकडा दुप्पटीवर जाणार आहे. तालुक्यातील कसारा, वाशाळा, दांड, शिरोळ, अजनुप, खर्डी आदी परिसरातील अनेक गावपाड्यांवर टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्याची तयारी पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.



२० वर्षापासून कोट्यवधी रूपये खर्च : यंदाच्या संभाव्य पाणी टंचाई कृती आराखड्यानुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे. तसेच विहिरीची खोली करणे व गाळ काढणे, विहिर अधिग्रहण करणे, नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, पूरक नळ, पाणी पुरवठा योजना करणे, दुरुस्ती करणे ह्या कामांचा समावेश असल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. ११० ग्रामपंचायतीमध्ये जल स्वराज्य, भारत निर्माण, राष्ट्रीय पेयजल यांसारख्या लोकवर्गणीतून करण्यात येणाऱ्या दोनशेहून अधिक योजना केवळ कागदावरच पुर्ण झाल्याचे दिसून आले. या योजनांवर गेली २० वर्षापासून कोट्यवधी रूपये खर्च झाले आहेत.


२७६ कोटींच्या भावली पाणीपुरवठा योजना मंजूर : गेल्या वर्षी ठाकरे सरकारने २७६ कोटींच्या भावली पाणीपुरवठा योजनेची निविदा काढल्याने शहापूर तालुक्यातील पाणी टंचाईचा प्रश्न निकाली लागेल. मात्र मार्च २०२४ पर्यंत ही योजना पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या योजनेमुळे कसारा व खर्डी जवळील दुर्गम डोंगर व पठार भागातील गावकऱ्यांना या योजनेचा विशेष फायदा होताना दिसतो. मात्र तोपर्यंत तालुक्यातील आदिवासी बांधव टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. दरवर्षी पाणीटंचाई उपाययोजना करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चाचा आराखडा प्रस्तावित करण्यात येत असला तरी पाणी योजनांबाबतीत ठोस नियोजनाचा अभाव असल्याने पाणी टंचाई कृती आराखड्यात दिवसेंदिवस गाव पाड्यासह टँकरची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.



बहुतांश योजनामध्ये भ्रष्टाचार: विशेष म्हणजे २००८ पासून आतापर्यत २२० हुन अधिक नळपाणी पुरवठा योजनापैकी बहुतांश योजनामध्ये भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकून पडल्या आहेत. त्यामुळे २०२४ पर्यत तरी भावली योजना पूर्ण होऊन तालुका टँकर मुक्त होणार का ? असा सवाल पाणी टंचाईने ग्रासलेल्या गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.


आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन : ग्रामीण भागातील गावपाड्यांना यंदा पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसु लागल्याने प्रशासनाला पाणी पुरवठा करण्यासाठी टँकंरची संख्या दिवसेंदिवस वाढवावी लागत आहे. सद्यस्थितीत १२६ गावपाड्यांना २६ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांनी १६२ गावपाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी परवाणगी दिली असुन प्रशासनाकडुन पाणी जपून वापरा, तसेच आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले जात असल्याची प्रतिक्रिया शहापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भास्कर रेगंडे यांनी दिली.


हेही वाचा:Cold Water Make You Sick सावधान खूप थंड पाणी पिल्याने तुम्ही पडू शकता आजारी उन्हाळ्यात अशी घ्या काळजी

ABOUT THE AUTHOR

...view details