महाराष्ट्र

maharashtra

Sushilkumar Shinde : सुशीलकुमार शिंदेंच्या मतदारसंघातील गाठी भेटी स्वतःसाठी नव्हे तर मुलीसाठी... शिंदेंची स्पष्टोक्ती

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 25, 2023, 6:45 PM IST

Sushilkumar Shinde : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) याच काँग्रेसच्या उमेदवार असतील, अशी घोषणा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली. सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांनी ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांना अभिवादन केलं. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

MLA Praniti Shinde
प्रणिती सुशीलकुमार शिंदे

प्रतिक्रिया देताना सुशीलकुमार शिंदे

सोलापूरSushilkumar Shinde :माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त (Dhamma Chakra Pravartan Din) मोठी घोषणा केली आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत (Solapur Lok Sabha) काँग्रेसकडून प्रणिती शिंदे (Praniti Shinde) निवडणूक लढणार आहेत. शिंदेंच्या घोषणेनं सोलापूर शहर मध्यच्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी कोणाला द्यायची असा पेच निर्माण झाला आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसच्या एकमेव आमदार म्हणून प्रणिती शिंदेंकडे पाहिलं जातं. जर प्रणिती शिंदे याच काँग्रेसकडून खासदारकीच्या निवडणुकीच्या रिंगणात गेल्या तर काँग्रेसकडून सोलापूर शहर मध्यमध्ये काँग्रेसचा उमेदवार कोण असणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात 'या' नावाची चर्चा: सोलापूर लोकसभेचा उमेदवार म्हणून सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं. काँग्रेस भवन मधून सोलापूर काँग्रेस कमिटीच्या वतीनं राष्ट्रीय काँग्रेसकडे आमदार प्रणिती शिंदे व सुशीलकुमार शिंदे या दोन्ही नावांची शिफारस करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी सुशीलकुमार शिंदे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन (Dr. Babasaheb Ambedkar) करण्यासाठी आले असता, सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबत महत्वपूर्ण विधान केलं. मी अगोदरच सांगितलं आहे, आगामी लोकसभा निवडणुकीचा उमेदवार प्रणिती शिंदे असणार आहेत. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाला पुन्हा एकदा पूर्णविराम मिळाला आहे.



मुलीसाठी वडिलांची कसरत: सुशीलकुमार शिंदे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून अनेकवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. 2014 व 2019 साली दोन वेळा सुशीलकुमार शिंदेंचा भाजपाच्या नवख्या उमेदवारानी पराभव केला. सततचा होत असलेला पराभव व वाढत्या वयोमानानुसार शिंदेंनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली होती. सुशीलकुमार शिंदेंनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात गाठीभेटी वाढवल्यानं विरोधकांत अस्वस्थता पसरली आहे. त्यांच्या गाठीभेटमुळे सुशीलकुमार शिंदे हे लोकसभेची तयारी करत असल्याची चर्चा सुरू झाली होती. पण या गाठीभेटी स्वतःसाठी नव्हे तर मुलगी प्रणिती शिंदेंसाठी असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. हा सर्व खटाटोप किंवा कसरत मुलीसाठी असल्याचं शिंदेनी सांगितलं आहे.

ऐंशी ओलांडलेल्या सुशीलकुमार शिंदेंच्या गाठीभेटी : सुशीलकुमार शिंदे यांनी वयाची ऐंशी ओलांडली आहेत. वयोमानानुसार त्यांची तब्येत साथ देत नाही. ऐंशी ओलांडलेले सुशीलकुमार शिंदे हे एका तरण्याबांड मुलाप्रमाणे सोलापूर लोकसभा मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. शिंदेंनी स्वतः मुलीसाठी कंबर कसली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात त्यांनी गाठीभेटी सुरू केल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी शिंदेंनी मोहोळ मतदारसंघात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राजन पाटील कुटुंबाची भेट घेतली. मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा सोलापूर लोकसभा मतदारसंघात महत्वाचा मानला जातो. ऐंशी ओलांडलेल्या सुशीलकुमार शिंदेंच्या वाढत्या गाठीभेटीमुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विरोधकांत धडकी भरली आहे.

हेही वाचा -

  1. Solapur News: राज्यात गलिच्छ राजकारण सुरू; प्रणिती शिंदे यांची भाजपवर सडकून टीका
  2. Praniti Shinde Loksabha : काँग्रेसचा मोठा निर्णय! सोलापूर लोकसभेची उमेदवारी प्रणिती शिंदे यांनाच द्यावी
  3. Praniti Shinde On Setu Offices: सेतू कार्यालयातून सामान्य जनतेची होणारी लूट थांबवा : प्रणिती शिंदे

ABOUT THE AUTHOR

...view details