महाराष्ट्र

maharashtra

अक्कलकोट तालुक्यातील सांगवी गाव महापुरात उद्ध्वस्त; मुख्यमंत्री ठाकरे करणार पाहणी

By

Published : Oct 18, 2020, 9:01 PM IST

अक्कलकोट तालुक्याला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामध्ये सांगवी गाव पाण्याखाली गेल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. जवळपास ११३ कुटुंबे या पुराच्या तडाख्यात सापडली. तर ११ घरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचा प्रकार घडला आहे. सोमवारी मुख्यमंत्री ठाकरे पाहणी दौरा करणार आहेत. त्यावेळी सांगवीकरांना मदत करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

Sangvi_village
सांगवी गाव महापुरात

सोलापूर- जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका अक्कलकोट तालुक्यालाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. या अतिवृष्टीमुळे बोरी नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्यातील सांगवी गावातील अनेकांचे संसार पाण्याखाली गेले. त्यामुळे जवळपास ११३ कुटुंबे या पुराच्या तडाख्यात सापडली. तर ११ घरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचा प्रकार घडला आहे. एवढेच नाहीतर शेतातील ऊस, मका, भाजीपाला आदी पिकेही नष्ट झाली आहेत. आता सोमवारी मुख्यमंत्री ठाकरे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याकरिता अक्कलकोट दौऱ्यावर आहेत. त्यावेळी सांगवी ग्रामस्थांना सहाय्यता निधी मिळावी, अशी मागणी केली जाणार आहे.

सांगवी गाव महापुरात उद्ध्वस्त

14 आणि 15 ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगवी गावावर मोठा जलप्रलय आला. बोरी नदी शेजारी हे गाव असल्याने बोरी नदीला आलेल्या पुरात हे गाव पाण्याखाली गेले. रातोरात सांगवी मधील ग्रामस्थांनी एका शाळेचा आधार घेतला. मात्र, पाण्याची पातळी वाढून बोरीच्या पुराने शाळेलाही आपल्या कक्षेत घेतले. त्यानंतर ग्रामस्थांनी हातामध्ये जे साहित्य मिळेल ते साहित्य घेऊन अंधारात धावत शाळे बाहेर पडून सुरक्षित ठिकाण गाठले आणि ती काळरात्र जागून काढली.

सलग 18 तास पाऊस झाल्याने बघता बघता नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाढले. अवघ्या अर्ध्या तासात नदीच्या पुराचे पाणी गावात शिरले. घराबाहेर बांधलेली जनावरे वाहू जाताना ग्रामस्थांची एकच धावपळ उडाली. पत्र्यांची शेडची घरे तरंगत वाहून गेली तर गावातील पक्के बांधकाम असणाऱ्या घरांची पडझड झाली. संसरपयोगी साहित्य देखील नदी मध्ये वाहून गेले आहे. येथील ग्रामस्थांवर जलसंकट आल्याने आजूबाजूच्या सामाजिक संघटना व प्रशासनाने अन्न व पाण्याची मदत केली आहे.

सांगवी गाव महापुरात उद्ध्वस्त
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अक्कलकोट दौरा-

सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अक्कलकोट तालुक्यातील पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. सांगवी, रामपूर, बोरी उमरगे या गावांची ते पाहणी करणार आहेत. ही गावे बोरी नदी काठावर असल्याने मोठे नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबाची संसार रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे मुखमंत्र्यांनी या पूरग्रस्तांना निधी द्यावा किंवा शासनाकडून मदत जाहीर करावी, अशी आस गावकरी किंवा ग्रामस्थ लाऊन बसले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details