महाराष्ट्र

maharashtra

PSI Success Story :  पाटणच्या सेंट्रींग मजुराचा मुलगा बनला पीएसआय, वडीलांच्या कष्टाचे केले सार्थक

By

Published : Mar 22, 2022, 4:15 PM IST

पाटण तालुक्यातील गारवडे गावचा गौरव शिंदे हा स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक ( son of centering laborer became PSI ) बनला आहे. सेंट्रींगचे काम करून मुलाला चांगले शिक्षण देणार्‍या वडीलांच्या कष्टाचे त्याने चीज केले.

satara latest news
गौरव शिंदे

सातारा - पाटण तालुक्यातील गारवडे गावचा गौरव शिंदे हा स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक ( son of centering laborer became PSI ) बनला आहे. सेंट्रींगचे काम करून मुलाला चांगले शिक्षण देणार्‍या वडीलांच्या कष्टाचे त्याने चीज केले. सेंट्रींग मजुराचा मुलगा फौजदार झाल्याने पाटण तालुक्यातून गौरववर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वडीलांनी मुलाच्या शिक्षणासाठी आणि मुलाने स्पर्धा परीक्षेसाठी घेतलेल्या कष्टाचे सार्थक झाले.

गौरव शिंदे यांची प्रतिक्रिया

वडीलांनी मजुरीतून चालविला कुटुंबाचा उदरनिर्वाह -

गौरवचे वडील सुभाष शिंदे हे सेंट्रींगचे काम करतात. वडीलार्जित तुटपुंज्या शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे अशक्य होते. त्यामुळे त्यांनी सेंट्रींगच्या कामावर जायला सुरूवात केली. पत्नी आणि दोन मुले, अशा चौघांच्या कुटुंबाचा चरितार्थ सेंट्रींग कामातून मिळणाऱ्या मजुरीवर चालवला. आपल्या दोन्ही मुलांना त्यांनी चांगले शिक्षण दिले. गौरव हा स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी कराडमध्ये राहत होता. त्याचा संपूर्ण खर्च वडीलांनी केला.

गौरव शिंदे

मुलाने कष्टाचे चीज केले -

स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन गौरव हा फौजदार बनल्याची बातमी समजताच शिंदे कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही. आपल्या कष्टाचे मुलाने चीज केल्याची प्रतिक्रिया सुभाष शिंदे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. गौरव हा पहिल्यापासूनच मेहनती आणि हुशार होता. बी. ए. नंतर त्याने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरूवात केली. 2019मध्ये त्याने मुख्य परीक्षा दिली होती. दोन वर्षांनी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि गौरव उत्तीर्ण होऊन पीएसआय झाल्याची बातमी कानावर आली. त्याने मिळविलेले यश हे आमच्या कष्टाचे चीज आणि त्याच्या कष्टाचे फळ असल्याचे सुभाष शिंदे म्हणाले.

वडीलांचे कष्ट सार्थकी लागले -

घरची अर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे वडील सेंट्रींगचे काम करू लागले. त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविताना आमच्या शिक्षणाचाही भार पेलला. मी स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागलो. चारवेळा यशाने हुलकावणी दिली. परंतु, पाचव्या प्रयत्नात मला यश मिळाले. माझ्या यशामध्ये वडीलांच्या कष्टाचा मोठा वाटा आहे. सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य मोहन राजमाने, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक कस्तुरे, समन्वयक शिंदे यांनी केलेल्या मार्गदर्शनाचे हे फलित असल्याचे गौरव शिंदे याने सांगितले.

हेही वाचा -जागतिक जल दिन : जलसंधारणासाठी पुन्हा 'जल ही जीवन'च्या चळवळीला गती देण्याची गरज!

ABOUT THE AUTHOR

...view details