महाराष्ट्र

maharashtra

Koyna Seismological Station : कोयना भूकंप मापन केंद्रावर तुर्की, सीरियातील भूकंपाच्या अचूक नोंदी

By

Published : Feb 9, 2023, 7:51 PM IST

तुर्की, सीरियात झालेल्या प्रलयकारी भूकंपाच्या अचूक नोंदी कोयना धरण प्रकल्पाच्या भूकंप मापन केंद्रावर देखील झाल्या आहेत. यानिमित्ताने कोयना भूकंप मापन केंद्राची कार्यक्षमता, उपयुक्तता देखील अधोरेखित झाली आहे.

Koyna Seismological Station
Koyna Seismological Station

सातारा : तुर्की आणि सीरियात झालेल्या प्रलयकारी भूकंपाच्या अचूक नोंदी कोयना धरण प्रकल्पाच्या भूकंप मापन केंद्रावर देखील झाल्या आहेत. सोमवारी (दि. 6) 7.8 आणि 6.7 रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपांची नोंद भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 6.55 वाजता आणि 2 वाजता भूकंप मापन केंद्रावर झाली आहे. यानिमित्ताने कोयना भूकंप मापन केंद्राची कार्यक्षमता आणि उपयुक्तता देखील अधोरेखित झाली आहे.

तुर्की, सीरियात भूकंप :तुर्की आणि सीरिया ही दोन्ही देश सोमवारी (दि. 6) शक्तीशाली भूकंपाने हादरले. इमारती पत्त्यासारख्या कोसळून मोठ्या प्रमाणात जीवीत हानी झाली. या विध्वंसकारी भूकंपाने संपूर्ण जग हादरले. सुमारे साडे चार हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या तुर्की आणि सीरियातील या भूकंपाच्या अचूक नोंदी सातार्‍यातील कोयना धरणाच्या भूकंप मापन केंद्रावर झाल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण असलेल्या कोयना धरणाचा परिसर हा भूकंप प्रवण क्षेत्र मानला जातो. त्यामुळे धरण पूर्ण झाल्यापासून याठिकाणी भूकंप मापन केंद्र कार्यान्वित आहे.

शेकडो भूकंपाच्या नोंदी :कोयना धरण परिसरात भूकंपाची मालिका सुरू असते. काही भूकंप जाणवतात तर अतिसौम्य भूकंप जाणवतही नाहीत. अशा भूकंपाची संख्या वर्षभरात हजारोंच्या पटीत असते. मागील वर्षाच्या अगदी सुरूवातीलाच दि. 8 जानेवारी 2022 रोजी 2.9 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला होता. त्यानंतर दि. 1 फेब्रुवारीला 3.2 रिश्टर स्केल तर दि. 22 जुलै रोजी भूकंपाचा तिसरा सौम्य धक्का आणि 22 ऑक्टोबर रोजी 2.8 रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला होता.

2021 मध्ये 128 धक्क्यांची नोंद :कोयना धरण परिसरात 2021 सालात सौम्य आणि अति सौम्य भूकंपाची मालिकाच सुरू होती. भूकंप मापन केंद्रावर 2021 मध्ये तब्बल 128 भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली होती. त्यामध्ये 3 रिश्टर स्केलच्या 119 आणि 3 ते 4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या च्या 9 धक्क्यांचा समावेश होता. भूकंपाचा धक्का तीव्र, सौम्य, अतिसौम्य असला तरी प्रत्येक धक्क्याची नोंद केंद्रावर होते. न जाणवणार्‍या भूकंपाची संख्या यामध्ये मोठी असते. भूकंप प्रवण क्षेत्र असल्याने कोयना धरण परिसरातील भूगर्भात सतत हाचाली सुरू असतात. त्याची अचूक नोंद कोयनेतील भूकंप मापन केंद्रावर होत असते.

केंद्राची उपयुक्तता सिध्द :कोयना धरण प्रकल्पात असलेल्या भूकंप मापन केंद्रावर हजारो किलोमीटरवर असणार्‍या तुर्की आणि सीरियातील भूकंपाच्या अचूक नोंदी झाल्यामुळे या भूकंप मापन केंद्राच्या अचूकतेबरोबरच त्याची उपयुक्तता देखील सिध्द झाली आहे. वारणा, कोयना खोर्‍यातील भूकंपाच्या नोंदींबरोबरच तीव्रतेच्या भूकंपाची याठिकाणी अचूक नोंद होत असल्याने कोयना भूकंप मापन केंद्राचे महत्व अधोरेखित झाले आहे.

हेही वाचा -PM Narendra Modi Rajya Sabha Speech : शरद पवारांचंही सरकार पाडलं! मोदींनी वाचला काँग्रेसचा इतिहास

ABOUT THE AUTHOR

...view details